सुशील थोरात, साम टीव्ही
अहिल्यानगर : शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दुर्देवी घटना अहिल्यानगर शहरातील ब्राह्मणतळे परिसरात गुरुवारी (ता. १०) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेनं संपूर्ण शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अमजद जावेद शेख (वय 13) आणि साद अन्सारी (वय 15) अशी मृत मुलांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थी शहरातील भिंगार आलमगीर परिसरातील रहिवासी होते. गुरुवारी सकाळी दोघेही नियमित शाळेत गेले. शाळा सुटल्यानंतर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अमजद आणि साद आपल्या मित्रांसोबत भिंगार परिसरात असलेल्या ब्रह्मतळ येथील तलावात पोहण्यासाठी गेले. यावेळी काही मुले पोहण्यासाठी पाण्यात उतरली.
अहमद आणि साद यांनी देखील पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, पोहता येत नसल्याने दोघेही बुडू लागले. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्यासोबत असलेल्या इतर मुलांनी आरडाओरड केली. मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तलावाच्या दिशेने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
स्थानिकांनी पाण्यात उड्या घेत अहमद आणि साद यांची शोधाशोध घेतली. मात्र, तलावात पाणी जास्त प्रमाणात असल्याने दोन्ही मुलांचा थांगपत्ता लागला नाही. अखेर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने अल्पवयीन मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अहमद हा भिंगार येथील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत तर अमजत हा भिंगार हायस्कूलमध्ये शिकत होता. दोघेही जीवलग मित्र होते, त्यांचा अचानक पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.