महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काहीच दिवस उरले आहेत. निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी सोमवारी (11 नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा मोठा दावा केला.
20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडी 175 जागा जिंकेल, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी केला आहे. अशातच भंडारा येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यानं त्याच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त गावात मिठाईचं वाटप केल. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनं ही मिठाई वाटप म्हणजे, मतदारांना प्रलोभन असल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला दिली. यावरून भरारी पथकानं मिठाईचं सर्व साहित्य जप्त केलं.
यामुळे भंडाऱ्याच्या तुमसर विधानसभेतील मांडेसर या गावात काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपसात भिडले. दोन्ही राष्ट्रवादीच्या समर्थकांनी एकमेकांविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार मोहाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, शरद पवार गटाचे उमेदवार चरण वाघमारे हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर आली आहे. रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे शेकडो कार्यकर्ते मोहाडी पोलीस ठाण्यात पोहोचल्यानं काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षकांसह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मोहाडी पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आल्यानंतर प्रकरण शांत झालं.
Written By: Dhanshri Shintre.