
आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल झाले.
मुंबई राजभवनातील शपथविधी सोहळ्यात त्यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
देवव्रत यांना अध्यापन, प्रशासन व सामाजिक उपक्रमांचा मोठा अनुभव आहे.
Acharya Devvrat sworn in as 22nd Governor of Maharashtra in Sanskrit oath : गुजरात राज्याचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल आहेत.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्याला विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, कौशल विकास, उद्योजकता, रोजगार व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव (राजशिष्टाचार) मनीषा म्हैसकर व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला मुख्य सचिव राजेशकुमार यांनी देवव्रत यांच्या नियुक्तीसंदर्भातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेली अधिसूचना वाचून दाखवली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व राज्यगीताने झाली तर सांगता राष्ट्रगीताने झाली. शपथविधीनंतर राज्यपालांना भारतीय नौदलातर्फे मानवंदना देण्यात आली.
राज्यपाल देवव्रत यांचा अल्प परिचय :
नाव : आचार्य देवव्रत, राज्यपाल, गुजरात
वडिलांचे नाव : लहरी सिंह
जन्मदिनांक : १८ जानेवारी १९५९
पत्ता : राजभवन, सेक्टर–२०, गांधीनगर – ३८२०२०, गुजरात
शैक्षणिक पात्रता
• पदवीधर, पदव्युत्तर (इतिहास आणि हिंदी), बी.एड.
• योगशास्त्रातील डिप्लोमा
• नैसर्गिक चिकित्साशास्त्र व योगिक सायन्समध्ये डॉक्टरेट
अनुभव
• अध्यापन व प्रशासन क्षेत्रात ४५ वर्षांचा अनुभव.
• १२ ऑगस्ट २०१५ ते २१ जुलै २०१९ या काळात हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून कार्य.
या कालावधीत नैसर्गिक शेती, गोसंवर्धन, "बेटी बचाओ-बेटी पढाओ", सामाजिक ऐक्य, व्यसनमुक्ती, वृक्षलागवड व जलसंवर्धन अशा कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली.
• २२ जुलै २०१९ पासून गुजरातचे राज्यपाल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरात तसेच इतर राज्यांमध्ये नैसर्गिक शेतीचा मोठ्या प्रमाणात प्रसार. गुजरातमध्येच ५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी रासायनिक शेती सोडून नैसर्गिक शेतीचा स्वीकार केला.
• दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.