राजेश भोस्तेकर
रायगड: ग्रामीण भागातील जीवनवाहिनी असलेली लाल परी ही काळानुरूप बदललेली आहे. प्रवाशांचा सेवेसाठी वातानुकूलित आणि आरामदायी प्रवास व्हावा यासाठी राज्य परिवहन विभागाने लाल परीमध्ये बदल करून विविध रुपात रस्त्यावर बसेस धावत आहे. त्यातच आता हीच लाल परी इलेक्ट्रिक होणार असल्याने प्रवाशांचा प्रवास आणखीनच सुखकारक, आरामदायी आणि वातानुकूलित होणार आहे. रायगड जिल्ह्यात (Raigad District) राज्य परिवहन विभागाच्या (MSRTC) ताफ्यात काही दिवसात 57 इलेक्ट्रिक एसटी बसेस दाखल होणार आहेत. शासनानेही पर्यावरण पूरक आणि प्रदूषण विरहित वाहनांना चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत आणत असल्याने राज्य परिवहन विभागाला प्रदूषण रोखण्यात आणि इंधन बचतीसह आर्थिक फायदाही होणार आहे.
वाढत असलेले इंधन दर, त्यातच होणारे वाहनांचे कर्कश आवाज, वायू प्रदूषण, यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनाचा बोलबाला सुरू झाला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानेही आता आपल्या एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक वाहन घेण्याचा निर्णय घेतला. रायगड विभागाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बस येणार असून अद्याप प्रस्तावित आहेत. प्रवासी संख्या जास्त असणाऱ्या मार्गावर या बस धावणार आहेत. रायगड जिल्ह्यातून मुबंई, बोरिवली उपनगर व पनवेल या मार्गावर ही बससेवा दिली जाणार आहे. या बसची महामंडळातील कर्मचाऱ्यांसोबतच प्रवाशांनाही उत्सुकता लागून राहिली आहे. इलेक्ट्रीक बस बाबत एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातून विभागीय कार्यालयातून माहिती मागविण्यात आली आहे. त्यानुसार आता या बसची खरेदी, चार्जिंग स्टेशन निर्मिती उभारावे लागणार असल्याने सहा महिन्यांचा कालावधी किंवा त्यापेक्षाही अधिक कालावधी ही बस रस्त्यावर धावण्यास लागू शकते. रायगड विभागातून 57 इलेक्ट्रीक बसेसचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
विजेवर धावणाऱ्या बससाठी चार्जिंग सेंटरची निर्मिती हे महत्वाचे आव्हान राहणार आहे. मात्र सध्या ही योजना अजून प्राथमिक स्तरावरच असल्याने त्यामुळे नेमके चार्जिंग स्टेशन कुठे राहणार याबाबत निश्चत नाही. चार्जिंग स्टेशन बाबत रायगड विभागातील अधिकाऱ्यांची चाचपणी सुरु आहे. रायगड विभागातील विविध आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन उघडले जाणार आहे. ज्या प्रमाणे गाड्यांचे डिझेल जसे आगारातच मिळते त्याच पद्धतीने चार्जिंगही आगरातच केले जाणार आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, पेण, रोहा, श्रीवर्धन, माणगांव, कर्जत, महाड या आठ आगारात 472 बसेस उपलब्ध आहेत. या बसेस ना दररोज 25 हजार लिटर डिझेल लागते. उत्पन्नाचा बहुतांश भाग हा डिझेल साठी खर्च होत आहे. 472 बसपैकी यातील 57 बस या पहिल्या टप्प्यात विजेवर चालविण्यात येणार आहेत. प्रमुख व जादा फेऱ्या असणाऱ्या पनवेल, मुंबई, बोरिवली मार्गावर या बस धावणार असल्याने मोठ्या प्रमाणात होणारा डिझेलच्या खर्चाची बचत होणार आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.