Maharashatra Election 2024: कोल्हापूर लोकसभेचा आखाडा कोण मारणार? शाहू महाराज छत्रपती की संजय मंडलिक

Kolhapur Lok Sabha Election 2024 News: कोल्हापूर लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावर शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक हे त्यांचे प्रतिस्पर्धी असतील, त्यामुळे या दोघांमध्ये काटे की टक्कर होणार आहे.
Kolhapur Lok Sabha Election 2024: Shahu Maharaj Chhatrapati Vs Sanjay Mandlik Know who will won in Kolhapur Election
Kolhapur Lok Sabha Election 2024: Shahu Maharaj Chhatrapati Vs Sanjay Mandlik Know who will won in Kolhapur Election Saam Tv

(रणजीत माजगावकर , कोल्हापूर)

Shahu Maharaj Chhatrapati Vs Sanjay Mandalik:

अनेक राजकीय उलथापालथीनंतर अखेर कोल्हापूर लोकसभेचे चित्र आता स्पष्ट झालंय. महाविकास आघाडीकडून काँग्रेस चिन्हावर शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी तर महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभेची निवडणूक आता रंगतदार होणार आहे. कोल्हापूरकर आता शाहू महाराज यांना साथ देणार की संजय मंडलिक यांना साथ देणार हे मात्र निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे, हे पाहू.

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावर शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक हे त्यांचे प्रतिस्पर्धी असतील, त्यामुळे या दोघांमध्ये काटे की टक्कर होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला त्याच पद्धतीने उत्तर देण्यासाठी राज्यातल्या विविध मतदारसंघांमध्ये तुल्यबळाचा उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसलीय. त्यापैकीच एक कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून सुरुवातीला माजी खासदार संभाजी राजे यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र महाविकास आघाडीकडून त्यांचे वडील शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यासंदर्भात निर्णय झाला. काँग्रेसच्या चिन्हावर शाहू महाराज यांनी निवडणूक लढवावी असं महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरलं. शाहू महाराजांची उमेदवारी जाहीर ही झाली.

शाहू महाराजांना जास्तीत जास्त मताधिक्याने विजयी करण्यासाठी स्वतः काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी कंबर कसलीय. त्यांच्यासोबत माजी खासदार युवराज संभाजीराजे, युवराज मालोजीराजे यांच्यासह शरद पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शिवसैनिक महाराजांसाठी या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत.

कोण आहेत शाहू महाराज छत्रपती

शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या गादीचे वारसदार आहेत. तर संस्था का खालसा झाल्यानंतर कोल्हापुरात करवीर अधिपती अशी ओळख आहे. शेवटचे छत्रपती शहाजी महाराज यांनी आत्ताच्या शाहू महाराज छत्रपती यांना नागपूरकर भोसले या यांच्याकडून दत्तक घेतलं. शाहू महाराजांना दत्तक घेतल्यानंतर कोल्हापुरात हे दत्तक प्रकरण खूपच गाजलं होतं.

१९७० च्या दरम्यान महाराज दत्तक आल्यानंतर आणि शहाजी महाराजांच्या निधनानंतर १९८४ ला सध्याचे शाहू महाराज छत्रपती गादीवर आले. १९९५ ला युती सरकारच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना शाहू महाराज छत्रपती यांच्यासह कोल्हापुरातील अनेक मोठी घराणी शिवसेनेमध्ये गेले होते.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची देखील शाहू महाराज छत्रपती यांच्याशी जवळीक आहे आणि यातूनच १९९९ ला राष्ट्रवादीमधून शाहू महाराज छत्रपती यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह करण्यात आला होता. मात्र यावेळेस शाहू महाराजांनी त्याला स्पष्ट नकार दिला होता.यानंतर शाहू महाराज छत्रपती कोणत्याही एका राजकीय व्यासपीठावर नसले तरी कोल्हापूर सर्व राजकीय पक्ष संघटनांकडून त्यांचा तितकाच आदर केला जातो.

महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांच्या विजयासाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रचार यंत्रणा राबवली जात असताना त्यांच्या समोर महायुतीचं मोठं आव्हान ही असल्याचं दिसून येत आहे. शिंदे गटाकडून विद्यमान खासदार संजय मांडलिक हे शाहू महाराज यांच्याविरुद्ध कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. आपण विद्यमान खासदार असल्याने आणि मतदारसंघातील शेवटच्या मतदारापर्यंत आपला संपर्क असल्याने मतदार आपल्या कामांच्या जोरावर पुन्हा मलाच खासदार करताल, असा विश्वास संजय मांडलिक यांना आहे.

संजय मंडलिक यांना पुन्हा शिंदे गटाकडून उमेदवारी मिळेल की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात होती. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्वे करू या ठिकाणी भाजप उमेदवार देणार असल्याच्या हालचाली दिसून येत होत्या. मात्र राजकीय प्रतिष्ठापणाला लावून संजय मांडलिक यांनी पुन्हा या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी शिंदे गटाकडून आपली उमेदवारी निश्चित करून घेतलेली आहे.

कोण आहेत संजय मंडलिक

संजय मंडलिक कोल्हापूरचे माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे चिरंजीव आहेत. सुरुवातीला शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत सदाशिव मंडलिक होते. मात्र नंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत खासदार होण्याचा बहुमान मिळवला होता. सदाशिवराव मंडलिक यांच्या मृत्यूनंतर संजय मंडलिक यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून २०१९ ची निवडणूक लढवली. २०१९ च्या निवडणुकीत संजय मांडलिकविरुद्ध खासदार धनंजय महाडिक अशी लढत झाली होती. २०१९ च्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी धनंजय महाडिक यांचा दारुण पराभव करत खासदार झाले होते.

संजय मांडलिक यांनी शिवसेनेकडून उमेदवारी घेत २०१९ ची निवडणूक लढवली होती. यामध्ये ते विजयी झाले. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपची सत्ता आली. मात्र अडीच वर्षानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाल्याने शिवसेना ही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेली आणि भाजपने स्वतः मांडला. अडीच वर्षात सरकार कोसळलं तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं यावेळी अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेला सोडून गेले

याच कालावधीत संजय मंडलिक यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलं सुरुवातीच्या अडीच वर्षात कोरोनामुळे कुठलाच निधी मतदार संघासाठी उपलब्ध झाला नाही त्यामुळे आपण मतदार संघात काम करू शकलो नाही मात्र शिंदे गटात गेल्याने मागील अडीच वर्षात कोट्यावधी रुपयांची काम मतदारसंघात केली असून यामुळे आपल्या मतदारसंघाची पुनर्बांधणी करण्याची संधी मिळाल्याचे संजय मंडलिक सांगतात या निवडणुकीत माझ्यासमोर कोण उभा आहे याचा कुठलाही फरक आपल्याला पडत नसून आपण केलेल्या कामाच्या जोरावर जनता आपणाला पुन्हा खासदार करेल असा विश्वास संजय मंडलिक व्यक्त करताना दिसत आहेत.

संजय मंडलिक हे महायुतीचे घटक आहेत. तसेच राष्ट्रवादीतून फुटून अजित पवार गटाने भाजपसोबत जाणं पसंत केल्याने सध्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, भारतीय जनता पार्टीचे नेते समरजीत सिंह घाटगे, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे दिग्गज नेते सध्या संजय मंडलिक यांच्या पाठीमागे उभे आहेत.

कोल्हापूर लोकसभा

1. लोकसभा मतदारसंघाचं नाव - कोल्हापूर

2. एकूण क्षेत्र - कोल्हापूर शहरासह, करवीर, कागल, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, राधानगरी, भुदरगड या तालुक्यांचा मतदारसंघात समावेश

3. मतदार संख्या - १२ लाख ५८ हजार ९८६

4. स्त्री - ५ लाख ९५ हजार ४२१

5. पुरुष -६ लाख ६३ हजार ५६५

6. सध्याचे खासदार/ सध्याचा पक्ष - संजय मंडलिक (शिवसेना शिंदे गट)

7. मागच्या निवडणुकीतील प्रमुख उमेदवार - संजय मंडलिक (शिवसेना) - ७ लाख ४९ हजार ०८५

धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) - ४ लाख ७८ हजार ५१७

अरुणा माळी (वंचित बहुजन आघाडी) - ६३ हजार ४३९

8. मागील निवडणूक निकालात लक्षात आलेली वैशिष्ट्य - धनंजय महाडिक आघाडीचे उमेदवार असून सुद्धा त्यांच्या विरोधात सतेज पाटील यांनी उघडपणे आपलं ठरलंय म्हणत प्रचार केला. तर मुश्रीफ यांनी छुप्या पद्धतीने मांडलिकांच्या विजयासाठी हातभार लावल्याची चर्चा

9. मागील निवडणुकीत यश-अपयशात कारक-मारक ठरलेली कारणं - सतेज पाटील यांचे आपलं ठरलंय हे ब्रीद वाक्यच आणि शरद पवरांनी मी बी ध्यानात ठेवलंय याला नागरिकांनी प्रतिसाद दिला नाहीये.

शाहू महाराज छत्रपती आणि संजय मांडलिक यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केलेली आहे. एका बाजूला भारतीय जनता पार्टीच्या वतीने मान गादीला मत मोदींना असा प्रचार सुरू केला असून दुसऱ्या बाजूला जनता नाराज म्हणून महाराज अशा पद्धतीची टॅगलाईन करत शाहू महाराज यांचा प्रचार सुरू केलेला आहे.

संजय मंडलिक यांच्या बद्दल मतदारसंघात कमालीची नाराजी असल्यानच शाहू महाराज यांना मतदार पसंती देत असल्याचं महाविकास आघाडीकडून सांगण्यात येत आहे. दोन्ही बाजूला जरी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असली तरीही निवडणुकीमध्ये मतदार राजा नेमकं कोणाला कौल देतोॉ? हे मात्र निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Kolhapur Lok Sabha Election 2024: Shahu Maharaj Chhatrapati Vs Sanjay Mandlik Know who will won in Kolhapur Election
Lok Sabha Election: काँग्रेसने 17 उमेदवारांची यादी केली जाहीर, कोण कोणत्या दिग्गजांना मिळाली संधी, जाणून घ्या

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com