लोकसभा निवडणुकीचे सर्वत्र वारे वाहू लागले असून, धुळे लोकसभा मतदार संघावर कुणाच वर्चस्व असणार आणि धुळे लोकसभेवर खासदार म्हणून कोण निवडून येणार याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलं आहे. विद्यमान खासदार सुभाष भामरे यांना भाजप तर्फे तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली असून, भामरे हॅट्रिक करतील का, यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे कसे असतील समीकरणे याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
उत्तर महाराष्ट्रातील धुळे लोकसभा हा महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ मानला जातो. धुळे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा येतात. त्यामध्ये धुळे जिल्ह्यातील तीन तर नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभांचा सहभाग आहे. धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण व शिंदखेडा या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या सहा पैकी तीन विधानसभा महायुतीकडे आहेत, तर दोन एमआयएमकडे, तसेच एक काँग्रेसकडे आहे. धुळे लोकसभा मतदारसंघांमध्ये 2014 व 2019 अशा सलग दोन वेळा भाजपाचे सुभाष भामरे निवडून आले आहेत. तर 2024 मध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपतर्फे भामरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र अद्याप महाविकास आघाडी तर्फे उमेदवारी घोषित करण्यात आली नसल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था बघावयास मिळत आहे. (Latest Marathi News)
2019 मध्ये काँग्रेसचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी भाजपचे सुभाष भामरे यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी कुणाल पाटील यांना 384290 इतकी मते मिळाली होती. तर सुभाष भामरे यांना 613533 इतकी मते मिळाली होती. तर या दोघांच्या खालोखाल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नबी अहमद यांना 39449 इतकी मते मिळाली होती.
यावेळी एमआयएम पक्षाने देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात धुळे मतदार संघासाठी उडी मारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. धुळे शहर विधानसभा आणि मालेगाव विधानसभा या मतदारसंघांमध्ये एम आय एम पक्षाचे आमदार असल्यामुळे, या दोन्ही ठिकाणी एम आय एम पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये तिरंगी सामना बघावयास मिळण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर सलग तीन वेळा काँग्रेस उमेदवार पराभूत झाला असल्यामुळे, यंदा धुळे लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतील ठाकरे गट शिवसेनेला सोडण्यात यावा, अशी मागणी देखील सध्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांतर्फे करण्यात येत आहे
दर वेळेप्रमाणे याही वेळा लोकसभा निवडणुकीमध्ये पाणी प्रश्न, बेरोजगारी, व जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पांचा अभाव हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रबिंदू स्थानी राहतील,जिल्ह्यात मोठे प्रकल्प नसल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर पिण्याचा पाण्याचा देखील मोठा गंभीर प्रश्न आहे, परंतु विद्यमान खासदार सुभाष भामरे यांनी आपण जवळपास दहा वर्षात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला असल्याचे म्हणत, पुढे देखील धुळे जिल्ह्यात नारपार प्रकल्प आणण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचे भामरे यांनी स्पष्ट केले आहे. यंदा मात्र राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल झाले असून आता या सर्व फेरबदलाचा फायदा नेमका कुणाला होणार आणि फटका कुणाला बसणार हे बघणं अवचित्याचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.