Thane Lok Sabha Constituency : शिवसेनेचा गड कोण सर करणार? CM शिंदेंच्या होम पीचवर ठाकरेंची फिल्डिंग?

Thane Lok Sabha Constituency History : 2019 साली राजन विचारे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. यावेळी मात्र NCP ने आपला उमेदवार बदलला. संजीव नाईक यांच्याऐवजी एनसीपीकडून आनंद परांजपेंना तिकीट देण्यात आलं.
Thane Lok Sabha Constituency
Thane Lok Sabha ConstituencySaam TV

चिन्मय जगताप / तुषार ओव्हाळ

Thane Lok Sabha :

ठाणे लोकसभा मतदारसंघ मुंबई प्रांतात मोडणाऱ्या महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनही ठाणे लोकसभा मतदारसंघ ओळखला जातो. मात्र 2022 मध्ये शिवसेना फुटली आणि शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. राष्ट्रवादीतही तेच झालं, म्हणूनच ठाण्यात मतांची विभागणी निश्चित आहे, असं जाणकार सांगतायत. त्यामुळे, जाणून घेऊया काय आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाचा आतापर्यंतचा राजकीय इतिहास.

Thane Lok Sabha Constituency
Thane Politics : महायुतीकडून ठाणे लोकसभेच्या उमेदवाराची धुळवडीला घोषणा होणार, कोणाला मिळणार संधी?

सुरुवातीला ठाण्याचा भूगोल जाणून घेऊयात. ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत.

मीरा भाईंदर

ओवळा

कोपरी

ठाणे

ऐरोली

बेलापूर

ठाणे लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात मोडतो. 2014 मध्ये ठाणे लोकसभेत कोण जिंकलं आणि 2019 मध्ये कोण जिंकलं? आणि किती मतांनी जिंकलं? याची उत्तरे जाणून घेऊ.

2014 साली राजन विचारे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात संजीव नाईक यांनी NCP कडुन निवडणूक लढवली. ज्यात तब्बल २ लाख ८० हजार ९४४ हजार मतांच्या फरकाने राजन विचारे विजयी झाले.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत काय झालं?

2019 साली राजन विचारे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. यावेळी मात्र NCP ने आपला उमेदवार बदलला. संजीव नाईक यांच्याऐवजी एनसीपीकडून आनंद परांजपेंना तिकीट देण्यात आलं. ठाण्यातून आनंद परांजपे यांनी NCP कडून निवडणूक लढवली. पण सलग दुसऱ्यांना राजन विचारेंनी ठाण्याच्या गड राखला. एनसीपी उमेदवाराचा पुन्हा एकदा राजन विचारेंनी पराभव केला. आनंद परांजपे लोकसभेत पडले आणि राजन विचारे तब्बल ४ लाख १२ हजार १४५ मतं जास्त घेत ठाण्यात पुन्हा एकदा जिंकून आले.

आता २०१४ साली आणि २०१९ साली कोणत्या पक्षाला ठाण्यात किती टक्के मतदान झालं? त्याची आकडेवारी पाहू. ठाण्यात प्रामुख्यानं मागच्या दोन लोकसभा निवडणुकींमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत पाहायला मिळाली होती. या दोन्ही लढतीत शिवसेना जिंकली असली, तरी दोन्ही पक्षांचा नेमका वोटशेअर किती होता ते जाणून घेऊ.

२०१४ साली शिवसेनेला 56.5 टक्के मतं मिळाली होती. 2019 मध्ये पाहिलं तर 63.3 टक्के इतकी मतं मिळाली. म्हणजेच आत्तापर्यंत शिवसेनेला अर्ध्याहून अधिक म्हणजेच ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळालीत. त्यात २०१९ मध्ये तर फर्स्ट क्लास मतं म्हणजे ६० टक्क्यांहून अधिक मतं शिवसेनेने ठाण्यात काढल्याचं लोकसभेत पाहायला मिळालंय. या आकडेवारीवरुनच ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला का मानला जातो? हे आणखी वेगळं सांगाची गरज नाहीये.

ठाणे लोकसभेत एकूण 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 2019 ला कोणत्या पक्षाची किती ताकद होती, ते जाणून घेऊ.

२०१४ मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व विधानसभा मतदारसंघ हे शिवसेनेच्या ताब्यात होते. म्हणजेच सहाही विधानसभा मतदार संघात शिवसेनेचेच आमदार असल्याचं डेटा सांगतोय. तर २०१९ मध्ये ठाण्यात वेगळं चित्र होतं. इथं भाजपचे चार आमदार होते. तर शिवसेनेचे दोन आमदार होते. असं असलं तरी लोकसभेत मात्र शिवसेनेचाच दबदबा होता.

पण यातून एक गोष्ट स्पष्टपणे अधोरेखित होताना दिसते, ती म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघ हा युतीला कौल दोणारा असल्याचं दिसून येतं. २०१४ मध्येही तेच दिसलंय आणि २०१९मध्येही तेच दिसतं. पण आता 2024 मध्ये वेगळं चित्र आहे. कारण 2019 नंतर महाराष्ट्राने 4 राजकीय भूकंप पाहिले आहेत, याचे पडसाद लोकसभा मतदारसंघातही पहायला मिळालेत.

त्यात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे असल्यामुळे ठाणे लोकसभा मतदार संघाच्या राजकारणावर सगळ्यांचंच लक्ष आहे. अशात शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फूट पडलीये. शिवाय गेली दोन वर्ष ज्या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली, त्या मतदारसंघात आता शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादीही महायुतीत एकत्र आलीये. तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र आलीये. अशावेळी गेल्या दोन निवडणुकांमध्ये ज्या ठाण्याने युतीला कौल दिला होता, त्या ठाण्यातला मतदार आता कुणाच्या बाजूने उभा राहतो, हे पाहणं फार इंटरेस्टिंग असणार आहे.

अशा सगळ्या राजकीय रणधुमाळीत २०२४ मध्ये म्हणजे आताच्या घडीला ठाण्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी कोणत्या मतदारसंघात कुणाची ताकद नेमकी कितीये? ठाण्यात आता कोण नेमकं कोणत्या गटात आहे? कुणी बंडखोरी केलीय? याचाही डेटा जाणून घेऊ.

2024 मध्ये कुणाची किती ताकद?

ठाणे लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये शिवसेनेचे दोन आमदार आहेत तर भारतीय जनता पक्षाचे चार आमदार आहेत. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ हा ठाणे लोकसभेमध्ये येतो. याचबरोबर ओवळा माझीवडा हा मतदारसंघ प्रताप सरनाईक यांचा आहे. मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन ह्या आहेत. ठाणे शहरचे आमदार संजय केळकर आहेत. ऐरोली चे आमदार गणेश नाईक आहेत तर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आहेत.

यावरुन असं दिसतं की निवडून आलेले सर्व आमदार हे महायुती सोबत आहेत. म्हणजेच एकनाथ शिंदे अजित पवार आणि भारतीय जनता पक्षासोबत आहेत. या मतदारसंघांमध्ये शरद पवार गट उद्धव ठाकरे गट किंवा काँग्रेस यांचा एकही आमदार नाही. यामुळे आमदारांची ताकद बघता. ठाण्याची लोकसभा निवडणूक महायुतीसाठी सोपी जाण्याची शक्यता जास्त आहे, असं तूर्तास आकडेवारीवरुन दिसतंय.

असं जरी असलं तरी शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या मतांमध्ये चांगलीच फूट पडली आहे. त्याचं कारण काय? तर ठाण्याचे विद्यमान खासदार हे राजन विचारे आहेत. ठाण्याच्या शिंदेंनी जरी ठाकरेंची साथ सोडली असली, तरी राजन विचारे हे अजूनतरी ठाकरे गटातच आहेत.

दुसरीकडे एकनाथ शिंदेंप्रमाणेच राजन विचारे हे जुने शिवसैनिक आहेत. राजन विचारेंना मानणारा एक वर्ग ठाण्यामध्ये आहे. तर शिवसेनेचा किंवा ठाणेकरांचा असाही वर्ग आहे ज्यांना एकनाथ शिंदे यांनी निवडलेला बंडखोरीचा मार्ग आवडला नाहीये.

हे लोक ठाकरेंसोबत एकनिष्ठ आहेत. गणेश नाईक यांच्या विरोधातही काही प्रमाणामध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. यामुळे होणारी ही निवडणूक अतिशय चुरशीची असणार आहे आणि ऐन निवडणुकीमध्ये नक्की मतदार राजा कोणाच्या पारड्यात मत टाकतो हे पाहणं अतिशय उत्सुकतेच असणार आहे. या सगळ्याशिवाय ठाणे लोकसभा मतदार संघात शिवसेनेच्या शाखांवर झालेला हायवोल्टेज ड्रामा आठवून पाहिला. तर ठाण्याची लढत रंगतदार झाली नाही, तरच नवलच.

तर ठाण्यातली लोकसभा निवडणूक २०२४ साठी अनेक अर्थांनी महत्त्वाची असणार आहे. ठाण्यात सगळ्यांचीच प्रतीष्ठा पणाला लागलेली दिसतेय. मग त्यात शिंदेही आले आणि ठाकरेही आले. शिवाय राष्ट्रवादीच्या मतांमध्येही २०२४ मध्ये फूट पडणार का? हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचंय. आता राज्यात झालेल्या बंडखोरीवरुन ठाणेकर गेल्या दोन वर्षांप्रमाणे युतीच्या बाजूने जातात की यावेळी आघाडीला संधी देतात? हे पाहणं फारच महत्त्वाचं ठरणार आहे.

Thane Lok Sabha Constituency
Hingoli Crime News : हिंगोलीत अल्पवयीन मुलीची छेड; दोन गटांत तुफान राडा, घरांवर दगडफेक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com