शिरूर लोकसभा (Shirur Loksabha Election) मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव अढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहेत. दोघेही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशामध्ये आज या मतदारसंघामध्ये काहीसे वेगळेच चित्र पाहायला मिळाले. दोन्ही नेते एकमेकांच्या पाया पडले. एकामेकांवर टीका करणाऱ्या या नेत्यांना असं पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यापासून अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील हे एकमेकांना टीका करताना दिसले. सध्या ज्या ज्याठिकाणी या नेत्यांच्या सभा होत आहेत त्याठिकाणावरून ते एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. अशामध्येच खेड तालुक्यातील वाडा येथे अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमात शिवाजीराव आढळराव पाटलांच्या भाषणाानंतर अमोल कोल्हेंचे आगमन झाले. दोन्ही नेते या कार्यक्रमानिमित्त एकत्र आले.
अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील या दोन्ही नेत्यांनी समोर येताच सुरूवातीला हस्तांदोलन करत चरण स्पर्श केला. या कार्यक्रमात आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे शेजारी शेजारी बसले होते. यावेळी दोन्ही नेते एकमेकांशी संवाद साधताना दिसले. या दोन्ही नेतांना एकमेकांशी हसत हसत गप्पा मारताना पाहून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वजण पाहतच राहिले. तसंच, या कार्यक्रमात अमोल कोल्हेंचे धडाकेबाज भाषण ऐकण्याची वेळ आढळराव पाटील यांच्यावर आली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हेनी 'आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर फार काही बोलत नाही.', अशी खोचक टीका केली होती. अमोल कोल्हेंच्या या टीकेला शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील सडेतोड उत्तर दिलं होतं. 'मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे.' असं म्हणत आढळराव पाटलांनी पलटवार केला होता. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभेत छगन भुजबळांना तिकीट देणार होते. त्यामुळं आढळराव पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते.', अशी देखील खिल्ली अमोल कोल्हेंनी उडवली होती. त्यावेळी 'अशी विधानं करण्यात कोल्हे अन संजय राऊतांमध्ये साम्य आहे.', असं म्हणत आढळरावांनी देखील अमोल कोल्हेंवर टीका केली होती.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.