माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जाणारे अभिजित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. माढ्यात आज देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी अभिजित पाटील फडणवीसांची भेट घेणार असल्याचं कळतंय.
अगदी दोन दिवसांपूर्वीच अभिजित पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची सर्व गोदामं राज्य सहकारी बँकेने सील करत ताब्यात घेतली होती. या गोदामांमध्ये जवळपास १ लाखापेक्षा जास्त साखर पोत्यांचा साठा आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे बँकांचे तब्बल ४५० कोटी रुपये थकलेले आहेत.
दरम्यान, कारखाना वाचवण्यासाठी अभिजित पाटील यांना निकटवर्तीयांनी भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. दुसरीकडे भाजपात प्रवेश केल्यास तुमच्या अडचणी दूर करू, असा शब्द काही नेत्यांनी अभिजित पाटील यांना दिला असावा, अशा चर्चा सुरू आहेत.
त्यामुळेच शरद पवार यांच्याशी चर्चा करून अभिजित पाटील भाजपमध्ये जाण्याच्या मानसिकतेत असल्याची माहिती आहे. अभिजित पाटील यांची माढा आणि सोलापूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे. जर त्यांनी भाजपात प्रवेश केला, तर याठिकाणी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसू शकतो.
माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना देखील मोठा फटका बसू शकतो. दरम्यान, माढ्यात ३० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे अभिजित पाटील आता नेमका काय निर्णय घेणार, याकडे सोलापूरकरांचं लक्ष लागून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.