Palghar Lok Sabha 2024 : पालघरमध्ये यंदा कुणाची जादू चालणार? बविआ फॅक्टर ठरणार निर्णायक

Loksabha Election 2024 : पालघर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडतो. त्यामध्ये डहाणू , विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, आणि वसई हे एकूण सहा मतदारसंघ येतात.
Palghar Loksabha
Palghar Loksabha Saam TV

पुनीत कुलकर्णी

Palghar Lok Sabha 2024 :

पालघर लोकसभा मतदारसंघाची 2008 मध्ये स्थापना झाली. सागरी, डोंगरी आणि नागरी असा हा लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघांचं राजकारण जवळून पाहिलं तर आपल्याला भाजप, शिवसेना, आणि काँग्रेस या तीन पक्षाचं वर्चस्व दिसतं. याबरोबरच या मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडी पक्षाची ताकद जास्त असल्याचं दिसून येतं. पालघर लोकसभेतील विधानसभेचा विचार करता विद्यमान आमदारांपैकी 3 आमदार बहुजन विकास आघाडीचे आहेत. यावरुन या पक्षाची ताकद आपल्याला समजते.

पालघर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडतो. त्यामध्ये डहाणू , विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, आणि वसई हे एकूण सहा मतदारसंघ येतात. यातील डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर हे मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.

मागील दोन निवडणुकीतील निकाल

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या चिंतामन वनगा यांनी बाजी मारली होती. त्यांना 5 लाख 32 हजार 996 इतकी मतं मिळाली होती. तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांना 2 लाख 93 हजार 569 मतं मिळाल्याच दिसतं. 2014 च्या निवडणुकीतील मतांच मार्जिन पाहता चिंतामन वनगा यांनी 2 लाख 39 हजार 427 मतांच्या फरकाने जाधवांचा पराभव केला. त्यामुळे भाजपच्या चिंतामण वनगा यांचं राजकीय वजन जास्त दिसतंय. आता 2018 मध्ये चिंतामण वनगा यांचं निधन झाल्याने पालघरमध्ये पोटनिवडणूक लागली होती.

2018च्या पोटनिवडणुकीमुळे या भागातले राजकाराणचं बदललं. भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांना २ लाख ७२ हजार ७८२ मतं पडली. तर  शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना 2 लाख 43 हजार 210 मतं पडली. अवघ्या २९ हजार ५७२ मतांनी शिवसेनेच्या वनगा यांचा पराभव झाला. २०१४ प्रमाणे इथे बहुजन विकास आघाडीची भुमिका फार महत्त्वाची ठरली. कारण या पोटनिवडणुकीत बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव यांनीही निवडणूक लढवली होती. त्यांना २ लाख २२ हजार ८३८ मतं पडली. हीच मतं जर शिवसेनेच्या पारड्यात पडली असती तर मोठ्या फरकाने त्यांचा उमेदवार जिंकला असता. पण तसे न होता मत विभाजन झालं आणि भाजप उमेदवाराचा विजय झाला.

Palghar Loksabha
Kalyan Lok Sabha Constituency : कल्याणमध्ये शिंदेंविरोधात मित्रपक्षांचीच फिल्डिंग?; श्रीकांत शिंदे हॅटट्रिक साधणार का?

2019 मध्ये भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांना 5 लाख 80 हजार 479 मतं मिळाली. तर विरोधात असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या बळीराम जाधव यांना 4 लाख 91 हजार 596 मत मिळाली आहेत. ८८ हजार ८८३ मताधिक्क्यांनी बहुजन विकास आघाडीच्या जाधव यांचा पराभव झाला.

पालघर पोटनिवडणुकीमुळे इथली समीकरणं आणि राजकारण बदलंल. त्याचं कारण ज्या चिंतामन वनगा यांचं निधन झालं त्यांच्या कुटुबियांनी इथून पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पण भाजपने त्यांना तिकीट दिलं नाही. त्यामुळे वनगा मातोश्रीवर गेले. मग शिवसेनेने वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना तिकीट दिलं. यामुळे शिवसेना आणि भाजप युतीमध्ये दुरावाही निर्माण झाला. पण भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांना 2 लाख 72 हजार 782 मतं मिळाली. आणि अवघ्या 29 हजार 572 मतांनी वनगा यांचा पराभव झाला.

2014 च्या निवडणुकीतील मतांची टक्केवारी

2014 मध्ये भाजपला 53 टक्के मतं मिळाली होती. तर बहुजन विकास आघाडीला 29 टक्के मतं मिळाली होती. 2018 च्या पोटनिवडणुकीत भाजपला 30.76 टक्के, शिवसेनेला 27.42 टक्के तर बहुजन विकास आघाडीला 25.13 टक्के मतं मिळाली होती. 2019 मध्ये शिवसेना उमेदवाराला 48 टक्के मतं होती. तर बहुजन विकास आघाडीला 46.90 टक्के मतं मिळाली. 2014 च्या तुलनेत 2019 ला बहुजन विकास आघाडीच्या मतांमध्ये कमालीची वाढ झाली होती.

2014 मध्ये बहुजन विकास आघाडीने 3 जागा जिंकून मैदान मारलं होतं. तर भाजपचा दोन तर शिवसेनेने एका ठिकाणी विजय झाला होता. 2019 मध्ये भाजपला एकाही जागेवर यश मिळाले नाही. तर बहुजन विकास आघाडीने 3 जागा जिंकून आपली जागा स्थिर ठेवली. तर शिवसेना, काँग्रेस, माकपने प्रत्येकी 1 जागा जिंकली होती.

2014 ची राजकीय ताकद पाहिली तर या लोकसभेतील राजकारण फारच रंजक झालं होतं कारण. यामध्ये पालघरमधून शिवसेना शिंदे गटाचे एकमेव आमदार श्रीनिवास वनगा होते. वनगा यांचा लोकसभेतून पराभव झाल्यानंतर शिवसेनेने त्यांना पालघर विधानसभेतून तिकीट दिलं होतं. त्यात वनगा यांचा विजयही झाला होता. तर विक्रमगडमधून राष्ट्रवादी सुनील भुसारा निवडून आलेत आणि त्यांनी शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेतलाय. डहाणूचे माकपचे आमदार विनोद निकोले हे निवडून आलेत तर बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार निवडून आले होते. त्यामध्ये बोईसरचे राजेश पाटील, नालासोपारातून क्षितीज ठाकुर, तर वसईचे हितेंद्र ठाकूर निवडून आले होते. त्यामुळे इथे बहुजन विकास आघाडीच पारडं जड असल्याचं दिसतं.

एकनाथ शिंदे यांनी बंड करत सूरत गाठली तेव्हा ते पालघर मार्गानेच गुजरातला गेले होते. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने तिकीट देऊन आमदार केलं, तरी त्यांनी बंडखोरीत शिंदे गटाला साथ दिली म्हणून ठाकरे गटातले अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेला सुटली होती त्यामुळे ठाकरे गट इथून दावा करू शकतो.

Palghar Loksabha
Raigad Lok Sabha Constituency : राय'गड' कोण राखणार? पक्षफुटीचा फटका कुणाला आणि फायदा कुणाला?

शिवसेनेचे दोन्ही गट आणि भाजप यांच्या बहुजन विकास आघाडी फॅक्टर महत्त्वाचा ठरतो. कारण एक उमेदवार पाडण्यासाठी त्यांची मतं महत्त्वाची ठरता. जर त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला तर महायुतीचा इथला विजय सोपा होईल, असे सांगितले जाते. पण त्यांनी उमेदवार उभा केला तर गणित बिघडू शकतं. या लोकसभा क्षेत्रावर प्रभाव असलेल्या बहुजन विकास आघाडीने पालघर निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले असले तरी हितेंद्र ठाकूर यांनी अजून यावर कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे बविआ निवडणूक लढविणार की,कुणाला पाठिंबा देणार हे अजूनही गुलदस्त्यातच राहिले आहे.

2024 च्या निवडणुकीत महत्वाचा मुद्दा म्हणजे विकासाचा. पालघर लोकसभा मतदारसंघात अधिकांश भाग हा आदिवासी बहुल आहे. त्यामुळे या भागात आदिवासी समाजाच्या समस्यांबाबत चर्चा होण गरजेच असल्याने सगळेच राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचारात याचा समावेश करतील यात शंका नाही. वाढवण बंदराचा मुद्दाही या लोकसभा निवडणुकीचा प्रमुख मुद्दा बनू शकतो. कारण बंदरामुळे केवळ जमीन संपादनाचा आणि पुनर्वसनाचाच प्रश्न निर्माण झाला नाहीय, तर मच्छिमारांच्या उपजीविकेचीही समस्या निर्माण झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com