Kalyan Lok Sabha Constituency : कल्याणमध्ये शिंदेंविरोधात मित्रपक्षांचीच फिल्डिंग?; श्रीकांत शिंदे हॅटट्रिक साधणार का?

Lok Sabha Election 2024 : कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र डॉ. श्रीकांत शिंदे दोन टर्म खासदार आहेत. मात्र या जागेवर भाजप दावा करत असल्याची चर्चा आहे.
Kalyan Loksabha Election
Kalyan Loksabha Election Saam TV

चिन्मय जगताप

महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सर्वात इंटरेस्टिंग जर कोणता लोकसभा मतदारसंघ असेल तर तो म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र डॉ. श्रीकांत शिंदे दोन टर्म खासदार आहेत. मात्र या जागेवर भाजप दावा करत असल्याची चर्चा आहे.

कल्याण सुरुवातीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला असला तरी देखील यंदा म्हणजेच 2024 या लोकसभेच्या निवडणुकीआधी शिवसेनेमध्ये फूट पडली. याचा फायदा भारतीय जनता पक्ष या मतदारसंघांमध्ये घेऊ पाहतोय, असं चित्र आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गात मोडतो. या लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण, कळवा-मुंब्रा या मतदारसंघांचा समावेश आहे.

श्रीकांत शिंदे यांचा 2014 आणि 2019 चा विजय

2014 साली श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात प्रकाश परांजपे यांनी NCP कडून निवडणूक लढवली. ज्यात तब्बल 2 लाख 50 हजार 568 मतांच्या फरकाने श्रीकांत शिंदे विजयी झाले. आता 2019च्या लोकसभेत कोण किती मतांनी निवडून आलं, तेही पाहुयात.

2019 साली श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेकडून पुन्हा एकदा निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात बाबाजी पाटील यांनी NCP कडून निवडणूक लढवली. ज्यात तब्बल ३ लाख ४४ हजार ३४३ मतांच्या फरकाने बाबाजी पाटील पराभूत झाले. मागच्या दोन निवडणुकांमध्ये कोण जिंकलं, हे आपण पाहिलं. पण लढत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशीच झाल्याचं दिसतं. त्यामुळेच मग आता या दोन पक्षांना मागच्या दोन निवडणुकांमध्ये नेमकं मतदान किती झालं, त्याचीही आकडेवारी पाहुयात.

Kalyan Loksabha Election
Raigad Lok Sabha Constituency : राय'गड' कोण राखणार? पक्षफुटीचा फटका कुणाला आणि फायदा कुणाला?

या वेळी दोन्ही निवडणुकांचा जर आभ्यास केला तर एक गोष्ट नक्की लक्षात येते की, शिवसेनेने कल्याणमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. २०१४ साली सेनेला तब्बल 53.5 टक्के मतं मिळाली. तर 2019 मध्ये 62.9 टक्के इतकी मतं मिळाली.

विधानसभेतील पक्षांची ताकद

आता कल्याण लोकसभेत मोडणाऱ्या एकून 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये मागच्या दोन टर्मध्ये कुणाची किती ताकद होती, ते पाहुयात. 2014 साली भाजप एक, अपक्ष एक तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन-दोन आमदार इथून निवडणूक आले होते. तर २०१९ साली भाजपने इथे मोठी उसंडी घेतली. भाजपचे ३ आमदार इथे निवडून आले. तर शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे यांचा प्रत्येकी एक खासदार इथे निवडून आला. मात्र सध्याची स्थिती काहीशी वेगळी आहे.

कारण 2019 नंतर महाराष्ट्राने 4 राजकीय भूकंप पाहिले आहेत. याचे पडसाद लोकसभा मतदारसंघातही पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर कल्याणमध्ये नेमकं चित्र कसंय? कोण कोणत्या गटात आहे? हे पाहणंही तितकंच महत्त्वाचंय. सध्या भाजपचे इथे ३ आमदार आहेत. तर शरद पवार गट एक, शिवसेना शिंदे गट एक तर मनसेचा एक आमदार इथे आहे.

2019 नंतरची राजकीय स्थिती

2019 साली शिवसेनेने भारतीय जनता पक्षासोबत फारकत घेतली. महाविकास आघाडीमध्ये जाण्याच्या निर्णय घेतला. त्यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण सहा आमदारांपैकी तीन आमदार हे भारतीय जनता पक्षाचे, एक आमदार शिवसेनेचा, एक आमदार मनसेचा आणि एक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडून आला होता. उल्हासनगरचे आमदार गणपत गायकवाड हे दोनवेळा अपक्ष म्हणून निवडून आले होते. २०१९ ला गायकवाड भाजपमध्ये सामील झाले आणि भाजपच्या तिकीटावर आमदार झाले.

शिवसेनेचे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर. याचबरोबर कल्याण ग्रामीण मधून मनसेचे आमदार राजू पाटील. मुंब्रा कळवा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड तर उल्हासनगरमधून कुमार इलानी, डोंबिवलीमधून रवींद्र चव्हाण तर कल्याण पूर्वमधून गणपत गायकवाड आमदार आहेत. तेच गणपत गायकवाड ज्यांचा पोलीस स्टेशन मधला गोळीबार हा प्रचंड गाजला होता. गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांचे खास असलेल्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता.

कल्याण लोकसभेचा पेपर महायुतीसाठी अतिशय सोपा जाईल, असं आपल्याला वरच्या-वर पहायला मिळत आहे. मात्र आता मतदारसंघाचं वातावरण चांगलच बदलंल आहे. याठिकाणची लढाई ही शिंदे विरुद्ध समोरचे सर्व पक्ष अशी झाल्याचे पहायला मिळत आहे .कारण प्रत्येक पक्षातील नेता हा शिंदेंच्या कार्यशैलीवर नाराज असल्याची कुजबूज ऐकायला मिळते. फेब्रुवारी २०२२मध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक अनुराग ठाकूर यांनी दुसऱ्यांदा कल्याणचा दौरा केला होता. या दौऱ्यावरुनही वेगवेगळ्या राजकीय चर्चा ऐकायला मिळाल्या होत्या.

Kalyan Loksabha Election
Thane Lok Sabha Constituency : शिवसेनेचा गड कोण सर करणार? CM शिंदेंच्या होम पीचवर ठाकरेंची फिल्डिंग?

दरम्यान, एकीकडे महाराष्ट्राने पाहिलेले राजकीय भूकंप. त्यानंतर नुकताच झालेला कल्याणमधला बहुचर्चित गोळीबार, अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी केलेली बंडखोरीची भाषा. ठाकरे करत असलेला जोरदार प्रचार, या सगळ्याचा नक्की कल्याणच्या लोकसभेवर कसा परिणाम होणार? कल्याण राखण्यात सीएम सुपुत्र श्रीकांत शिंदे यशस्वी ठरतील का? आणि कल्याणची जनता शिंदेंना पुन्हा संधी देवून हॅटट्रिक करु देईल का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com