Mumbai North Central Lok Sabha : मुंबई उत्तर-मध्य भाजप कोणता डाव टाकणार? काँग्रेस कमबॅक करणार का?

Loksabha Election 2024 : भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना पक्षाने २०१४ ला तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत महाजन यांना ४ लाख ७८ हजार ५३५ मतं मिळाली होती.
Mumbai North Central Lok Sabha
Mumbai North Central Lok Sabhasaam Tv

तुषार ओव्हाळ | मुंबई

मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून गेली दोन टर्म पूनम महाजन खासदार आहेत. काँग्रेस, कम्युनिस्ट, शिवसेना, आरपीआय अशा एक ना अनेक पक्षांना इथल्या मतदारांनी साथ दिलीये. २०१४ साली विद्यमान खासदार असलेल्या प्रिया दत्त यांचा पूनम महाजन यांनी पराभव केला आणि त्या लोकसभेत पोहोचल्या.

मुंबई उत्तर मध्य लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात विले पार्ले, चांदिवली, कुर्ला, कालिना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या जागांचा समावेश आहे. त्यापैकी कुर्ला हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे.

२०१४ ला भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना पक्षाने तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत महाजन यांना ४ लाख ७८ हजार ५३५ मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या विद्यमान खासदार प्रिया दत्त २ लाख ९१ हजार ७६४ मतं मिळाली होती. तब्बल १ लाख ८६ हजार ७७१ मतांनी महाजन यांनी दत्त याचा पराभव केला.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत साली भाजप आणि काँग्रेसने आपले उमेदवार बदलले नाहीत. २०१९ च्या निवडणुकीत महाजन यांना ४ लाख ८६ हजार ६७२ मतं मिळाली. तर दत्त यांना ३ लाख ५६ हजार ६६७ मतं मिळाली. २०१४ च्या तुलनेत दत्त यांना ६० हजार मतं जास्त मिळाली होती. तर २०१४ च्या तुलनेत मताधिक्य हे ५० हजरांनी घटलं होतं.

दोन्ही वेळेला भाजपचा विजय झाला तरी पक्षाला मिळणारी आकडेवारी महत्त्वाची ठरते. २०१४ आणि २०१९मध्ये कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळालीत ते जाणून घेऊया.

कुणाला किती टक्के मतदान?

२०१४ साली भाजपला ५६.६१ टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसला ३४.५२ टक्के मतं मिळाली होती. २०१९ ला भाजपला ५३.९७ टक्के तर काँग्रेसला ३९.५५ टक्के मतं मिळाली होती. २०१४ च्या तुलनेत भाजपला मिळालेली मते घटली होती. तर काँग्रेसचा मतांचा टक्का वाढला होता. भाजपच्या टक्केवारीत २.६४ मते कमी पडली. तर काँग्रेसची टक्केवारी ५.०३ टक्क्यांनी वाढली होती.

Mumbai North Central Lok Sabha
Satara Lok Sabha: उदयनराजेंचं राजकीय भवितव्य ठरवणारी निवडणूक ठरणार? शरद पवारांची जादू चालणार?

2019 मध्ये मुंबई उत्तर मध्यच्या सहा विधानसभा मतदारसंघात भाजपचे दोन, शिवसेनेचे तीन आणि काँग्रेसचा एक आमदार निवडून आला होता. २०१४ मध्ये हीच आकडेवारी होती. वांद्रे पूर्वमध्ये २०१४ ला शिवसेनेचा आमदार होता. तिथे २०१९ ला काँग्रेसचा उमेदवार निवडून आला. तर चांदिवली मतदारसंघात २०१४ ला काँग्रेसचा उमेदवार निवडून आला होता, तिथे २०१९ मध्ये शिवसेनेचा उमेदवार जिंकला.

२०१४ आणि २०१९नंतर आता २०२४ मध्ये काय चित्र आहे?

मुंबई उत्तर मध्यमधील सहापैकी तीन जागांवर शिवसेनेचे आमदार निवडून आलेत. त्यापैकी दिलीप लांडे आणि मंगेश कुडाळकर हे शिंदे गटात गेलेत. त्यामुळे भाजप आणि महायुतीचे पारडे जड झाले आहे.कालिनाचे आमदार संजय पोतनीस हे ठाकरे गटात राहिलेत. पण वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दीकी यांचे वडील आणि माजी खासदार बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस सोडून अजित पवार गटात प्रवेश घेतलाय. इतकंच नाही तर झिशान सिद्दीकीनेही काँग्रेसवर तोफ डागली. झीशान यांनी अजूनतरी कुठला निर्णय घेतलेला नाही. पण आपल्यापुढे अनेक पर्याय आहेत, असं म्हणत झिशान यांनी पक्षाला सूचक इशारा दिलाय.

२०१४ साली भाजपने पहिल्यांदा पूनम महाजन यांना तिकीट दिलं. २००९ साली महाजन यांनी घाटकोपर पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढवली होती. पण मनसे उमेदवार राम कदम यांनी त्यांचा पराभव केला. पुढे २०१४ साली मिळालेल्या संधीचं महाजन यांनी सोनं केलं. गेली दोन टर्म त्या या जागेवरून निवडून गेल्यात. या जागेवरून अजूनतरी कुठल्याच पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नाही. पण विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा जनसंपर्क कमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पक्ष महाजन यांना तिसऱ्यांदा संधी देणार का हे लवकरच स्पष्ट होईल. महायुती सोडून महाविकास आघाडीकडून ही जागा कोण लढवणार यावरूनही अजूनतरी पडदा उठलेला नाही. पण इथे काँग्रेसचं प्राबल्य होतं. त्यामुळे काँग्रेस या जागेसाठी आग्रही असू शकतो, असंही सांगितलं जातं.

Mumbai North Central Lok Sabha
Sangli Politics : ठाकरे गटाच्या सांगलीच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीत धुसफूस; काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून बंडखोरीचे संकेत

पक्षातील फुटीनंतरचं राजकारण कसं?

२०१९ मध्ये विधानसभेच्या निकालानंतर युती तुटली. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं आणि २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. त्यामुळे राज्यासह अनेक मतदारसंघाची गणितं बदललीत. त्यापैकी एक मुंबई उत्तर मध्य हा मतदारसंघ. २०१९ मध्ये या जागेच्या सहापैकी ३ जागा शिवसेनेच्या निवडून आल्यात. पण तीनपैकी दोन आमदार शिंदे गटात गेलेत. त्यात काँग्रेसचा एकमेव आमदारही पक्षाशी नाराज आहे.

त्यामुळे शिवसेनेचा पाय आणखी खोलात गेलाय. सध्या महायुतीकडे सहापैकी चार आमदार आहेत. त्यामुळे सध्यातर येथे भाजपचं राजकीय वजन जास्त आहे. पण युतीकडून कुठला उमेदवार असेल आणि महाविकास आघाडीचा कोण उमेदवार असेल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com