Lok Sabha Election Result : आंबेडकर मतदारांपासून 'वंचित'; वंचितचा 2019 सारखा मविआला फटका नाहीच

Vanchit Bahujan Aghadi Lok Sabha Election Result 2024 : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मविआनं जोरदार मुसंडी मारत महायुतीला जोरदार धोबीपछाड दिलाय. मात्र सुक्याबरोबर ओलंही जळंत या उक्तीप्रमाणे या निवडणुकीत वंचितचाही सुपडा साफ झालाय.
Lok Sabha Election Result
Lok Sabha Election Result Saam Digital

मयुरेश कडव, साम टीव्ही प्रतिनिधी

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचित फॅक्टरचा पुरता धुव्वा उडालाय. वंचितचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. किंबहूना मतदारांनी वंचितला सपशेल नाकारल्याचं चित्र दिसून येतंय. निवडणुकीआधी याच वंचितनं मविआसोबत आघाडी करण्यासाठी अनेक वाटाघाटी केल्या. मात्र त्या यशस्वी होऊ शकल्या नाहीत, मात्र एकला चलो रेची भूमिका घेतल्यानंतर वंचितला अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मविआनं जोरदार मुसंडी मारत महायुतीला जोरदार धोबीपछाड दिलाय. मात्र सुक्याबरोबर ओलंही जळंत या उक्तीप्रमाणे या निवडणुकीत वंचितचाही सुपडा साफ झालाय. वंचितचे केवळ सर्व उमेदवारच पराभूत झाले नाहीत. मतदारांनीही त्यांना साफ नाकारलाय. लोकसभा निवडणुकीच्या सुरूवातीलाच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मविआसोबत येण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यानुसार सुरवातीला प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरेंमध्ये बोलणीही झाली. मात्र प्रकाश आंबेडकर जागावाटपावर अडून बसल्यानं ठाकरेंनी त्यांच्यापासून दूर राहणंच पसंत कलं. त्यानंतर वंचितनं काँग्रेससोबत संधान बांधण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथेही जागावाटपाची बोलणी पूर्ण होऊ शकली नाही. अखेर वंचितनं एकला चलो रेचा नारा दिला. 2019च्या निवडणुकीप्रमाणे याहीवेळी वंचित फॅक्टर मविआसाठी धोक्याचा ठरेल असं वाटत होतं. मात्र मतदारांनी वंचितला स्पष्टपणे नाकारलं.

Lok Sabha Election Result
Manoj Jarange: लोकसभा निवडणुकीत मराठ्यांची भावनिक लाट येणार; तुमचा सुपडा साफ होणार, मनोज जरांगे कडाडले

वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर अकोल्यात तिस-या नंबरवर फेकले गेले. पुण्यात तर वसंत मोरेंना केवळ 25 हजार मतांवर समाधान मानावं लागलं. परभणीतून पंजाबराव डख यांना तर 50 हजार मतांचीही मजल मारता आलेली नाही. धाराशिवमधून भाऊसाहेब आंधळकरांचाही दारूण पराभव झाला. यापेक्षा विदारक परिस्थिती इतर उमेदवारांची आहे. 2019 मध्ये वंचितच्या उमेदवारांनी अनेक जागांवर लाखांची मतं घेतली होती. यात अकोल्यात प्रकाश आंबेडकरांनी तब्बल 2 लाख 75 हजार मतं घेतली होती. सांगलीत वंचितच्या गोपीचंद पडळकरांनी तब्बल 3 लाख मतं मिळवली होती.

गडचिरोली –चिमूरमध्ये वंचितच्या रमेश गजबेंना 1 लाख 11 हजार 468 मतं मिळवली. नांदेडमध्ये यशपाल भिंगे यांनी 1 लाख 66 हजार 196 मतं मिळवत आपली छाप सोडली होती. बुलढाण्यात बळीराम सिरस्कार यांना 1 लाख 72 हजार 627 मतं मिळाली. हातकणंगलेत अस्लम सय्यद यांनी तब्बल 1 लाख 23 हजार 419 मतं घेतली. तर परभणीत आलमगीर खान यांनी 1 लाख 49 हजार 946 मतं मिळवली. अमरावतीत वंचितच्या गुणवंत देवपारे यांनी 65 हजार 135 मतं मिळवली. गेल्यावेळी वंचितला राज्यात तब्बल 42 लाख मतं मिळाली होती. वंचितच्या उमेदवारांमुळे 7 ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीला पराभूत व्हावं लागलं.

प्रकाश आंबेडकरांनी याचच भांडवल करत जागावाटपासाठी मविआवर दबावतंत्र वापरलं. मात्र हेच दबावतंत्र आता प्रकाश आंबेडकरांवर बुमरँग झालं. या निवडणुकीत आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी मतदारांपासून वंचित राहिली हे मात्र नक्की.

Lok Sabha Election Result
Dhule Lok Sabha Election 2024 : धुळ्यात चुरशीच्या लढतीत शोभा बच्छाव विजयी; भाजपच्या सुभाष भामरे यांचा पराभव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com