उत्तर प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अमेठीतून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव झाला आहे. काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा यांनी त्यांचा पराभव केला आहे. इराणी यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला आहे.
मागील लोकसभा निवडणुकीत म्हणजेच 2019 मध्ये अमेठीत राहुल गांधींचा पराभव झाला होता. त्यानंतर काँग्रेसने यावेळी आपली रणनीती बदलली. या निवडणुकीच्या सुरुवातीला राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवतील अशी चर्चा होती, पण अखेरच्या क्षणी ते अमेठीतून आणि बहीण प्रियंका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवतील, अशा चर्चा सुरु झाल्या. मात्र उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसने राहुल यांना रायबरेलीतून आणि अमेठीतून सोनिया गांधींचे काम पाहणाऱ्या किशोरीलाल शर्मा यांना तिकीट दिले.
अमेठी आणि रायबरेलीसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर झाले, तेव्हा रायबरेलीतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. कारण सोनिया गांधींनंतर त्यांना राहुल गांधींच्या रूपाने उमेदवार मिळाला. मात्र अमेठीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अचानक निराशा पसरली.
दमदार उमेदवार न दिल्याने स्मृती इराणी सहज निवडून येईल, अशी भावना अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती, असं बोललं जात आहे. मात्र अमेठीची सूत्र प्रियांका गांधी यांनी हाती घेल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली.
प्रियांका गांधी यांनी अनेक दिवस अमेठीच्या प्रत्येक गावात जाऊन सभा घेतल्या आणि शेवटी किशोरीलाल शर्मा यांना विजय मिळवून दिला. अमेठीतून शर्मा यांना तिकीट देण्यामागे काँग्रेसची रणनीती असल्याचे मानले जात होते. किशोरीलाल शर्मा अमेठीत जिंकले तर मोठी बातमी होईल, अशी काँग्रेसची रणनीती होती, असं सांगितलं जात आहे.
कारण केंद्रीय मंत्र्याचा पराभव काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याने केल्याची चर्चा लोकांमध्ये असेल. त्याचवेळी स्मृती यांच्याकडून किशोरीलाल शर्माचा पराभव झाला तरी स्मृती इराणींसाठी ती मोठी उपलब्धी ठरणार नाही. कारण गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राहुल गांधींसारख्या दिग्गज नेत्याचा पराभव केला होता. मात्र आता अमेठीचे निकाल आले असून किशोरीलाल शर्मा विजयी झाल्याने काँग्रेसची ही रणनीती यशस्वी ठरली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.