लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होत आहे. याआधी 19 एप्रिल ते 25 मे दरम्यान मतदानाच्या सहा फेऱ्या झाल्या आहेत. मतदानाचा सातवा टप्पा संपताच सर्वांच्या नजरा 542 जागांच्या एक्झिट पोलकडे असतील. गुजरातमधील सुरतमधून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. यातच 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत.
याआधी विविध सर्वेक्षण संस्थांकडून एक्झिट पोल 1 जूनला संध्याकाळी जाहीर होतील. देशात कोणता पक्ष सरकार स्थापन करू शकतो शकतो किंवा किती जागा जिंकू शकतो, हे सांगण्याचा प्रयत्न या पोलच्या माध्यमातून केला जाणार आहे. यातच 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि एक्झिट पोलचे आकडे किती खरे ठरले होते? एक्झिट पोलचे आकडे आणि प्रत्यक्षात निकालात काय फरक होता? 2019 आणि 2024 मध्ये मुद्दे आणि परिस्थितीत किती बदल झाला आहे? या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. सोबतच यंदा राज्यात महायुती की मविआ, कोणाची हवा होती? हेही जाणून घेऊ...
लोकसभा निवडणूक 2019 च्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजप सत्तेत येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. एक्झिट पोलमध्ये एनडीएला प्रचंड बहुमत मिळेल, असं सांगण्यात आलं होतं. एक्झिट पोलचे निकाल विशेषत: काँग्रेससाठी अत्यंत निराशाजनक होते. मात्र 2019 मध्ये इंडिया आघाडी अस्तित्वात नव्हती. उलट सर्व विरोधी पक्षांनी युपीए अंतर्गत निवडणुका लढवल्या होत्या. तसेच यात असेचही काही पक्ष होते जे कोणत्याही युतीचा भाग बनले नव्हते.
त्यावेळी दोन एक्झिट पोल वगळता, साधारणपणे प्रत्येक एक्झिट पोलने भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांना 300 पेक्षा जास्त जागा येईल, असा अंदाज व्यक्त केला होता. तर काँग्रेस तिहेरी आकडा गाठतानाही यात दिसली नव्हती. मात्र प्रत्येक एक्झिट पोलने युपीए 100 पेक्षा जास्त जिंकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 2019 च्या सर्व एक्झिट पोलमध्ये यूपीएला 100 ते 120 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. भाजपनंतर सर्वाधिक जागा मिळवणारा काँग्रेस हा दुसऱ्या सर्वात मोठा पक्ष असेल, असा अंदाजही वर्तवण्यात आला होता.
आज तक - माय एक्झिट पोलमध्ये भाजपला 339-365 , काँग्रेसला 77-108 आणि इतरला 79-111 जा मिळेल, आसा अंदाज वर्तवला होता.
एबीपी-निल्सनने भाजपला 267, काँग्रेसला 127 आणि इतरला 148 जागा मिळेल, असं सांगितलं होतं.
इंडिया टीव्ही-सीएनएक्सने भाजपला 300, काँग्रेसला 120 आणि इतरला 122 जागा मिळेल, असा अंदाज वर्तवला होता.
न्यूज 24-चाणक्यने भाजपला 350, काँग्रेसला 95 आणि इतरला 97 जागा मिळेल, असं सांगितलं होतं.
टाइम्स नाऊ-व्हीएमआरने भाजपला 306, काँग्रेसला 132 आणि इतरला 104 जा मिळेल, आसा अंदाज वर्तवला होता.
रिपब्लिक-सी व्होटरने भाजपला 305, काँग्रेसला 124 आणि इतरला 113 जागा मिळेल, असा अंदाज वर्तवला होता.
या निवडणुकीप्रमाणे 2019 मध्ये देशभरात सात टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या. 23 मे 2019 रोजी 542 जागांवर झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. एक्झिट पोलचे अंदाज जवळपास खरे ठरले आणि भारतीय जनता पक्ष सलग दुसऱ्यांदा स्वबळावर सत्तेवर आला. भाजपने सर्वाधिक 303 जागा जिंकल्या. यानंतर काँग्रेसला फक्त 52 जागा मिळाल्या. याशिवाय शिवसेना 18, तृणमूल काँग्रेसचे 22, बसपचे 10, सीपीआयचे 2, सीपीआय(एम)चे 3 आणि राष्ट्रवादीचे 5 खासदार विजयी झाले होते.
भाजप गेल्या दहा वर्षांपासून केंद्रातील सत्तेत विराजमान आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीत मोदी लाट असल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी विरोधी पक्षही स्वबळावर निवडणूक लढवत होते. तसेच अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष स्वबळावर निवडणूक लढवत होते. अशातच या दोन्ही निवडणुका या राष्ट्रीय मुद्द्यावर लढल्या गेल्या. ज्याचा मोठा फायदा भाजला मिळाला आणि काँग्रेसला याचा मोठा फटका बसला. यंदा मात्र चित्र वेगळं आहे.
राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, यावेळी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केल्याने निवडणुकीत याचा मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे. यावेळेच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा स्थानिक मुद्द्यांवर मतदारांचा जास्त भर असल्याचं पहायला मिळालं. ज्याचा फायदा विरोधी पक्षांना काही राज्यांमध्ये होऊ शकतो, असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
लोकसभा निवडणूक 2014 आणि 2019 भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र लढवली होती. ज्याचा मोठा फायदा दोन्ही पक्षांना झाल्याचं पाहायला मिळालं होतं. 2019 च्या निवडणुकीत राज्यातील 48 जागांपैकी भाजपने 23 आणि शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादी 5, काँग्रेस 1, एमआयएम 1 आणि 1 जागा अपक्षला मिळाली होती.
मात्र 2019 च्या तुलनेत 2024 ची परिस्थिती राज्यात पूर्णपणे वेगळी आहे. मागील पाच वर्षात राज्याच्या राजकरणात मोठी घडामोड घडली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेत महाविकास आघाडी स्थापना केली. यानंतर या तीन पक्षांनी मिळू सत्ता काबीज केली आणि उद्धव ठाकरे मुख्यंमत्री झाले. मात्र सरकार स्थापन झाल्याच्या दोन वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेना फोडली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. नंतर शिंदेंनी भाजपसोबत जात सत्ता मिळवली आणि स्वतः मुख्यमंत्री झाले. यानंतर सुरू झालेल्या न्यायालयीन लढाईच्या दरम्यान, शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? याची लढाई निवडणूक आयोगात सुरु होती. ज्याचा निकाल शिंदेंच्या बाजूने लागला आणि त्यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळालं.
असंच चित्र राष्ट्रवादीत पाहायला मिळालं. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी फुटली आणि निवडणूक आयोगात सुरु असलेल्या लढाईचा निकाल अजित पवार यांच्या बाजूने लागला. त्यांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह मिळालं. याचमुळे राज्यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट निर्माण झाली, बोललं जातं. तसेच याचा फटका भाजप आणि महायुतीला या निवडणुकीत बसू शकतो, असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं. यातच येत्या 4 जूनला मतदारराजा देशात आणि राज्यात कोणाच्या बाजूने कल देईल, हे त्याच दिवशी कळणार आहे..
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.