
एग फ्रीझिंग ही अशी वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्यामध्ये महिलेच्या अंडाशयातून निरोगी अंडी बाहेर काढली जातात आणि ती प्रयोगशाळेत अतिशय कमी तापमानात गोठवून ठेवली जातात. भविष्यात जेव्हा त्या महिलेला गर्भधारणा करायची इच्छा असेल, तेव्हा ही अंडी वापरून तिला आई होण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे वाढत्या वयानंतरही मातृत्व शक्य होते.
आज २० ते ३५ वयोगटातील अनेक महिला या प्रक्रियेबद्दल माहिती घेण्यास उत्सुक आहेत. करिअर, शिक्षण, वैयक्तिक कारणं किंवा आरोग्याशी संबंधित कारणांमुळे मातृत्व पुढे ढकलायचं असल्यास एग फ्रीझिंग एक सोयीचा मार्ग ठरतो. यामुळे महिलांना त्यांच्या जीवनशैलीनुसार गर्भधारणेचे नियोजन करता येते.
वैद्यकीय भाषेत एग फ्रीझिंगला oocyte cryopreservation असं म्हणतात. या प्रक्रियेत जमा केलेली अंडी भविष्यात शुक्राणूसोबत फलित करून गर्भाशयात रोपण केली जातात. त्यामुळे ही प्रक्रिया महिलांना प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाची मानली जाते.
कॅन्सरवर उपचार सुरू असलेल्या महिला, प्रजननक्षमतेवर परिणाम करणाऱ्या वैद्यकीय समस्या असलेल्या महिला किंवा वैयक्तिक कारणास्तव मातृत्व पुढे ढकलणाऱ्या महिलांसाठी हा पर्याय उपयुक्त आहे. तज्ज्ञांच्या मते, ३५ वर्षांपूर्वी एग फ्रीझ केल्यास त्याचा परिणाम अधिक चांगला दिसून येतो.
बाणेरमधील नोवा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या स्पेशालिस्ट डॉ. रश्मी निफाडकर सांगतात की, बदलती जीवनशैली, वाढती जागरूकता आणि वैद्यकीय प्रगतीमुळे महिलांना त्यांच्या प्रजनन आरोग्याबाबत येणाऱ्या समस्यांबाबत जागरुक केलं जातं. सोशल मीडिया आणि सेलिब्रिटींच्या जाहिरातींमुळे एग फ्रीझिंगला मुख्य प्रवाहात आणलं जातं. दरमहा, नियमित प्रजनन आरोग्य तपासणीसाठी येणाऱ्या २५ ते ३५ वयोगटातील १० पैकी ६ महिला एग फ्रीझिंग प्रक्रियेबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करतात.
एग फ्रीझिंगशी संबंधित प्रश्नांमध्ये ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी जागरूकतेअभावी दरमहा केळ २ ते ३ महिला या एग फ्रीझिंग तंत्राबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घेत होत्या. मात्र दिवसेंदिवस वाढती जागरूकता आणि गर्भधारणा तसेच कुटुंब सुरू करण्याच्या भविष्यातील आशेमुळे येत्या काळात एग फ्रीझिंगची मागणी देखील वाढण्याची अपेक्षा आहे, असंही डॉ. निफाडकर यांनी सांगितलंय.
मदरहूड हॉस्पिटल्सच्या डॉ. प्रीतिका शेट्टी यांचं मत आहे की, एग फ्रीझिंगबाबत प्रश्न विचारणाऱ्या महिलांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अनेक तरुणी शिक्षण, करिअर किंवा योग्य वेळेच्या प्रतीक्षेमुळे मातृत्व उशिरा पुढे ढकलतात. काहींना कुटुंबात प्रजनन समस्या असतात किंवा अकाली रजोनिवृत्तीचा धोका असतो. अशा महिलांना ही प्रक्रिया सुरक्षित पर्याय ठरतं
अलीकडच्या काळात सोशल मीडिया आणि सेलिब्रिटींच्या अनुभवामुळे एग फ्रीझिंगला मुख्य प्रवाहात महत्त्व मिळालंय. पूर्वी दरमहा २ ते ३ महिला याबाबत चौकशी करत असत, मात्र आता १० पैकी ६ महिला ही प्रक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरून महिलांमध्ये प्रजनन आरोग्याबाबत जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.