अष्टांग योगातील यम म्हणजे काय व त्याचे प्रकार- भाग १

शरीरातील प्रत्येक अंगाप्रमाणेच योगातील अष्टांगाचीही आवश्यकता आहे.
अष्टांग योगातील यम म्हणजे काय व त्याचे प्रकार- भाग १
अष्टांग योगातील यम म्हणजे काय व त्याचे प्रकार- भाग १Saam Tv
Published On

आपण आतापर्यंतच्या लेखांत योगाची प्राथमिक भूमिका, योग का आवश्यक आहे, आहाराबाबत कसा विचार करावा आणि योगाची व्यापकता जी आपल्या आयुष्याच्या सर्व पैलूंवर मार्गदर्शन करू शकते, हे पाहिले. आता विषय थोडा पुढे नेऊ आणि महर्षी पतंजलींच्या मूळ अष्टांग योगदर्शन शास्त्राचा आढावा घेऊ. शरीरातील प्रत्येक अंगाप्रमाणेच योगातील अष्टांगाचीही आवश्यकता आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या पतंजलींनी सांगितलेल्या अष्टांग योगातील पहिले अंग ‘यम’ (Social Code of Conduct) आज आपण पाहू. What is Yama in Ashtanga Yoga and its types

अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या पाच यमांना पतंजलींनी महाव्रते असे संबोधले आहे. त्यापैकी अहिंसा आणि सत्य यांच्याबद्दल समजून घेऊयात..

अहिंसा

मनुष्याचे व्यवहार शरीर, वाणी आणि मनाशी संबंधित असतात. आपल्या वागण्याने, म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक यांपैकी कोणत्याही प्रकारे इतरांना दुःख होणार नाही म्हणजे अहिंसा! इतर म्हणजे मनुष्य, प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष यांना आपल्या शारीरिक हालचालींनी त्रास होईल असे वर्तन म्हणजे त्यांच्याप्रती हिंसा. व्यवहारात असे प्रसंग येतात जेव्हा अहिंसेचे कटाक्षाने पालन होत नाही. उदाहरणार्थ- डास, ढेकूण मारणे. अशा वेळी मनाची ठेवण अशी असावी, की ही हिंसा आपल्याकडून अपरिहार्य कारणाने होत आहे व त्यांना दिलेल्या पीडेने हळहळ वाटत आहे. अशाने दुसऱ्यांच्या दु:खाविषयी आपल्यातील निष्काळजीपणा व निष्ठुरपणा कमी होईल.

आपल्या बोलण्याने दुसऱ्याला दुःख होईल असे कठोर बोलणे किंवा उपहास, निंदा करणे म्हणजे वाचिक हिंसा. कोणाच्या अनुपस्थितीतही अशा प्रकारे बोलणेही हिंसाच! सर्वांत कठीण मानसिक अहिंसा पाळणे, कारण मनात हिंसात्मक विचारच येऊ न देणे अत्यंत कठीण. मागील लेखात पाहिल्याप्रमाणे चित्ताची प्रसन्नता ठेवायचा सराव केल्यास हळूहळू निर्वैर राहण्याचा अभ्यास होऊ शकतो. पतंजली यासाठी काही उपायही सांगतात. त्यासाठी योगसूत्रांचा नक्की अभ्यास करावा.

अष्टांग योगातील यम म्हणजे काय व त्याचे प्रकार- भाग १
कार्यक्षमता वाढवण्यासाठीचे पैलू- भाग २

सत्य

सत्याचे आचरण म्हणजे आपल्या वागण्यात-बोलण्यात खोटेपणा असू नये. मात्र, व्यवहारात खरे बोलण्याने कोणाचे मन दुखावणार असल्यास ती वाचिक हिंसा होईल. महाभारतात सांगितल्याप्रमाणे ‘सत्य आणि प्रिय असेल ते बोलावं, सत्य आणि अप्रिय बोलू नये’. पण प्रिय बोलण्याच्या नादात खोटे बोलले जात असल्यास तेही योग्य नाही. अशा वेळी न बोललेलेच उत्तम! म्हणजेच व्यवहारात तारतम्य बाळगावं.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com