
ओरल कॅन्सर हा असा आजार आहे की जो सुरुवातीला गंभीर लक्षणं न दाखवता हळूहळू शरीरात वाढू शकतो. हा कॅन्सर ओठ, जीभ, गाल, हिरड्या, तोंडाची वरची त्वचा (palate), तोंडाखालचा भाग आणि काही वेळा घसा आणि टॉन्सिल्सपर्यंत पसरू शकतो. हा कोणालाही होऊ शकतो. मात्र जास्त करून तो वयस्कर लोकांमध्ये दिसून येतो. या आजाराची मुख्य कारणं बहुतांश वेळा जीवनशैलीशी जोडलेली असतात.
सिगारेट, सिगार, बीडी, पाईप किंवा चघळण्याचा तंबाखू हा तोंडाच्या कॅन्सरचा सगळ्यात मोठा घटक मानला जातो. ‘कॅन्सर रिसर्च यूके’च्या अहवालानुसार तंबाखूच्या धुरात ७० पेक्षा जास्त कॅन्सर निर्माण करणारे रसायनं असतात जी थेट पेशींच्या डीएनएला नुकसान पोहोचवतात. या नुकसानामुळे पेशींमध्ये बदल होतात आणि कॅन्सर निर्माण होऊ शकतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत सहापट जास्त धोका असतो.
जास्त प्रमाणात आणि वारंवार दारू पिणं हेसुद्धा धोका वाढवतं. अल्कोहोल तोंडाच्या आतल्या आवरणाला त्रासदायक ठरतं. त्यामुळे तंबाखूसारख्या हानिकारक पदार्थांना शरीर जास्त असुरक्षित होतं. जर एखादी व्यक्ती तंबाखू आणि दारू दोन्हीचा वापर करत असेल तर तोंडाचा कॅन्सर होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो.
मानवी पॅपिलोमा व्हायरस (HPV), विशेषतः HPV-16, आता घशाचा कॅन्सर, जीभेचा मागचा भाग आणि टॉन्सिल्सचा कॅन्सर वाढवणारा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. हा प्रकार प्रामुख्याने तरुण वयातील लोकांमध्ये दिसतो आणि तो तंबाखू किंवा दारूपासून वेगळा आहे. मात्र एक चांगली गोष्ट म्हणजे HPVमुळे झालेला तोंडाचा कॅन्सर उपचारांना तुलनेने चांगला प्रतिसाद देतो.
सुपारी किंवा पान-सुपारी चघळण्याची सवय दक्षिण आशिया आणि पॅसिफिक भागात खूप आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुपारीला ‘ग्रुप-१ कार्सिनोजेन’ (कॅन्सर निर्माण करणारा घटक) म्हणून जाहीर केलं आहे. यामुळे फक्त तोंडाचा कॅन्सरच होत नाही तर ओरल सबम्युकस फायब्रोसिस नावाचा एक गंभीर आजार होतो. ज्यामुळे तोंड उघडणं, बोलणं आणि खाणं यात मोठा त्रास होतो.
फळं-भाज्या कमी खाणं किंवा अयोग्य आहारामुळे शरीराला अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं (व्हिटॅमिन A, C, E) कमी मिळतात. ही जीवनसत्त्वं पेशींचं नुकसान भरून काढायला आणि हानिकारक फ्री-रॅडिकल्सना थांबवायला मदत करतात. त्यामुळे आहारात ताज्या भाज्या, फळं आणि वनस्पतीजन्य अन्न पदार्थांचा समावेश करणं आवश्यक आहे.
त्यातप्रमाणे तोंडाची योग्य स्वच्छता न ठेवणं, व्यवस्थित न बसणारं डेंचर, धारदार दात यामुळे सतत होणारी जखम आणि सूज हा सुद्धा धोका वाढवतो. सततचा त्रास आणि जखमांमुळे तोंडाच्या ऊतींमध्ये कॅन्सरचे बदल होऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.