

प्रिय, सोनू
कसा आहेस रे? याचं उत्तर देण्याआधी तू हे पत्र पाहिल्यानंतर म्हणशील या डिजिटलच्या युगात हिने पत्र का लिहिलं? व्हॉट्सअप मेसेज केला असता. कॉल केला असता. पण पत्र? तुला खरं सांगू जर मी कॉल केला तर मला काय बोलायचं हे तू ऐकून घेणार नाहीस. हो नाहीच मला माहितीये तुझा स्वभाव. तू ऐकतोच कुठे कोणाचं? आणि व्हिडिओ कॉल केला असता.. पण मी तुला पाहून रडले असते. मला वाटतं तुझ्याकडे बघून बोलण्याची माझ्यात हिंमत नाहीये. त्यात कदाचित मला काय म्हणायचं आहे, काय सांगायचं आहे, ते बोलता आलं नसतं. कॉल मेसेजपेक्षा पत्रातून मी जास्त मोकळेपणाने माझ्या भावाना व्यक्त करू शकते. त्यामुळे मी हे पत्र पाठवतेय.
मला माहितीये तू माझ्यावर खूप रागावला आहेस. तुला राग येणारच माझा. तो हक्कही आहे आणि मी ते मान्यही करते. सात जन्म तुझ्यासोबत राहण्याची शपथ घेतली. प्रत्येक क्षण तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न पाहिलं आणि तुलाही पाहायला लावलं. तू किती गुंग झाला होतास त्यात. हो, मला आठवतंय सगळं. आणि का नाही आठवणार ते, माझं पहिलं प्रेम होतं. पहिलं आणि शेवटचंही.
पण माझ्या निर्णयामुळे हे शब्द वाचून तुला खरं वाटणार नाही. जिने स्वप्न दाखवली, रंगवली तिची बेवफा निघाली. अशी तक्रार तू करतोस ना तुझ्या मित्रांकडे. पण मला माहितीये काही दिवस. तू त्यातून सावरशील. मला विसरशीलही. मी दुसऱ्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला ते तुला आवडलं नाही. पण तुला माहितीये मी घेतलेला निर्णय हा तुझ्यासाठीच फायद्याचा आहे.
तू नैराश्यात आहेस, दारूच्या आहारीही गेला म्हणे. हे खरं आहे का? खोटू बोलू नकोस. मला मला माहितीये,आईने सांगितलंय सगळं काही. का करतोस हे? माझ्यामुळे? तुला माहितीये मनात अपराधीपणाची भावना तयार होतेय रे. तुझ्या या स्थितीला मी जबाबदार असल्याचं वाटू लागलंय. उगाच तुला प्रेम करायला लावलं. तुला स्वप्ने दाखवली. आपणसोबत असू तर सर्व दु:ख दूर जातील असं म्हणत होते, पण तुला माहितीये तुझ्या आयुष्यात जास्त संकटं आणि दु:ख नसावीत याचमुळे मी दूर गेली रे. तुझ्यापासून दूर गेली हे जितकं खरं तितकंच खरं की, मला तुझी आठवण येते, कायम, हो. अगदी प्रत्येक वेळी. मी एकटी असली ना तुझी आठवण येते. तू अतरंगीपणे केलेला प्रपोज.
त्यादिवशी माझे पप्पा आणि मम्मी मंदिराकडे जाऊ देत नव्हते. पण मी क्लासचं नाव करून तेथे आले होते. त्यावेळी मला गुलाबाचं फूल देत विचारलं होतं. जर मी थोडी हिंमत दाखवली असती तर आपण एकत्र राहिलो असतो. जर आपण पळून जाण्याचा विचार केला असता तर ते शक्य होतं.
'बड़ा गजब किरदार है मोहब्बत का
अधूरी हो सकती है मगर खत्म नहीं'
पण मला माहितीये तुला तसं काही आवडतं नाही, ना की मलाही. आपल्याला घराच्यांच्या परवानगीनेच करायचं होतं. पण आपल्या प्रेमात समाज अडसर ठरत होता. तुझ्या आणि माझ्यात भिंत होती जातीची. तुझ्या जातीमधील लोकांनी मला स्वीकारलं नसतं. माझ्या पप्पांनी ही तुला आपलं मानलं नसतं.
'सुनी एक भी बात उसने न मेरी
सुनी मैंने सारे ज़माने की बातें'
आपल्याला नव्या ठिकाणी पळून जावं लागलं असतं. पण ते तुला मान्य नव्हतं. आपण या जन्मात एकत्र येऊ शकलो नसलं तरी पुढच्या जन्मात आपण नक्की येऊ. त्यावेळी आपल्याला कोणीच वेगळं करू शकत नाही. मी देवाकडे ही प्रार्थना करते,मला पु्ढच्या जन्मी तुझी साथ, तुझं प्रेम मिळावं. आता तुझ्या करिअरवर फोकस कर, आयुष्यात मोठा माणूस हो, तुला यशस्वी झालेलं पाहायचं आहे.
तुझीच
श्वेता
तालुका- चाळीसगाव, जळगाव
मनात दडलेल्या भावना व्यक्त करण्याची हिंमत होत नाहीये?
जवळच्या व्यक्तीला काही मनातलं सांगायचंय, पण भीती वाटतेय. तुमच्या भावनेला आम्ही व्यासपीठ देऊ!
प्रिय व्यक्तीला पत्र लिहा. आम्ही ते प्रसिद्ध करू!
आई-वडील, नवरा-बायको, मित्र किंवा प्रियजनाला आजच पत्र लिहा...
भावना तुमच्या, व्यासपीठ आमचं...
तुमचं पत्र saamtextdigital@gmail.com या मेलवर पाठवा अथवा DM करा! आम्ही ते saamtv.esakal.com संकेतस्थळावर प्रसिद्ध करू.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.