
पावसाळा सुरू होताच डोंगरदर्यांच्या अंगावर हिरवळ चढवलेली असते आणि निसर्गसौंदर्य मनाला मोहवून टाकते. अशा वेळी जर तुम्ही पुण्याजवळ कुठे फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी खास टॉप १० हिल स्टेशन्सची माहिती घेऊन आलो आहोत. ही ठिकाणं फक्त थंड हवामानासाठीच नव्हे, तर नयनरम्य दृश्ये, धबधबे, जंगलातील वाटा, ऐतिहासिक स्थळे आणि आरामदायक शांततेसाठीसुद्धा प्रसिद्ध आहेत. तुम्ही येणाऱ्या विकेंड किंवा १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करु शकता.
लोणावळा हे सर्वात प्रसिद्ध ठिकाण असून, ते पुण्यापासून केवळ ६५ किमी अंतरावर आहे. हिरवाई, धबधबे, चिक्की आणि थंड हवामान यामुळे हे पर्यटकांचे पहिलं पसंतीचं ठिकाण आहे. त्याचप्रमाणे महाबळेश्वर हे स्ट्रॉबेरी फार्म्स, व्ह्यूपॉइंट्स आणि जंगलवाटा यांसाठी प्रसिद्ध असून, कुटुंब किंवा कपल्ससाठी एक उत्तम पर्याय आहे.
महाबळेश्वरच्या वाटेवरच असलेले पंचगणी हे जुन्या वसाहतीच्या आठवणी जागवणारे, निसर्गरम्य वातावरणातले शहर आहे. टेबल लँडची भव्य दृश्ये आणि शाळांचे गूढ आकर्षण यामुळे हे ठिकाण एक वेगळा अनुभव देते.
थोडं वेगळं आणि कार शिवाय प्रवासाचे वातावरण अनुभवायचं असेल तर माथेरान हे हिल स्टेशन नक्कीच तुमच्यासाठी आहे. येथे नेरळहून टॉय ट्रेनने जाता येते, आणि लाल मातीचे रस्ते व घोडेस्वारीचा अनुभवही घेता येतो.
शांतता आणि ट्रेकिंगचा आनंद घ्यायचा असेल तर भंडारदरा हे उत्तम ठिकाण आहे. धबधबे, तलाव आणि रतनगडचा किल्ला या परिसरातल्या प्रमुख आकर्षणांमध्ये येतात. पुढे लवासा हे एक नियोजित शहर असून, युरोपियन शैलीची रंगीबेरंगी घरे, तलाव आणि सायकलिंगसाठी सुंदर रस्ते यामुळे तुम्ही एक वेगळा अनुभव घेऊ शकता.
इगतपुरी हे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले, ध्यानधारणा केंद्रांसाठी प्रसिद्ध आहे. धबधब्यांमुळे येथे आल्यानंतर तुमचा मूड लगेचच फ्रेश होतो. दूरवर असलेलं पण निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग ठरणारं आंबोली, गोव्याच्या सीमेजवळ असून, पावसाळ्यात धुक्यात हरवलेले रस्ते आणि प्रचंड धबधबे पाहायला मिळतात.
पन्हाळा हे थोडंसं ऐतिहासिक आणि थोडंसं हवेशीर! कोल्हापूरजवळ असलेलं हे ठिकाण पन्हाळा किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे आणि मराठा इतिहासात याला मानाचं स्थान आहे. शेवटी, तोरणमाळ हे खूप कमी लोकांना माहित असलेलं ठिकाण असून, उत्तर महाराष्ट्रात आहे. तलाव, मंदिरं आणि निसर्गाच्या सान्निध्यात काही काळ निवांत राहायचं असेल तर या ठिकाणाला जरूर भेट द्या. पुण्याजवळचे ही सर्व हिल स्टेशन्स तुमच्या शरीरालाच नव्हे, तर मनालाही आराम देणारी आहेत. सहकुटुंब, मित्रपरिवार किंवा एकट्याने प्रवास करायचा असो, ही ठिकाणं तुम्हाला एक नवा अनुभव देतील, याची खात्री आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.