Well Conservation Campaign: 'बारव संवर्धन मोहीम' राबवणारा रोहन काळे, ज्याचं कौतुक पंतप्रधानांनीही केलं...

Well Conservation Campaign Latest News: पंतप्रधानांनी कौतुक केलेला रोहन काळे कोण आहे? मुंबईतल्या रोहन काळेची 'बारव संवर्धन मोहीम'
Well Conservation Campaign By Rohan Kale (बारव संवर्धन मोहीम' राबवणारा रोहन काळे)
Well Conservation Campaign By Rohan Kale (बारव संवर्धन मोहीम' राबवणारा रोहन काळे)Facebook/ Rohan Kale
Published On

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमादरम्यान रोहन काळे या युवकाचं खास कौतुक केलंय. मुंबईतल्या परळमध्ये राहणारे रोहन काळे (Rohan Kale) पेशाने एच. आर (मनुष्यबळ व्यवसायिक) असून खासगी कंपनीत कार्यरत आहेत. त्यांनी आपली 'बारव बचाव मोहीम' सध्या राज्यभरात राबवलीय आणि त्यांच्या याच मोहिमेचं कौतुक करत हा आदर्श इतरांनी घेण्याचं पंतप्रधानांनी (PM Modi) आवाहन केलंय. त्यामुळे रोहन काळे यांची बारव (Well conservation campaign) संवर्धन मोहीम, आणि त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. (Rohan Kale, who is implementing 'Well Conservation Campaign', which was also appreciated by the Prime Minister Modi...)

हे देखील पहा -

टाळेबंदी आणि सुरू झालेली मोहीम -

'कणखर सह्याद्री पर्वत रांगा लहानपणापासून खुणावत होत्या', असं रोहन काळे सांगतात. त्यामुळे सातत्याने राज्यभरात फिरणं आणि पुरातन वास्तू पाहणं हा रोहन यांचा छंदच होता. त्याला सोबत मिळाली ती नोकरीतल्या परराज्यात कामानिमित्त जाण्याच्या संधीमुळे. रोहन यांना कामानिमित्त गुजरात राज्यात सातत्याने जावं लागत होतं, तिथे गेल्यानंतर फिरणंही व्हायचंच, या पर्यटनादरम्यान गुजरातमधल्या 'बारव' रोहन यांना आकर्षित करू लागल्या आणि तेव्हा रोहन यांना ध्यास लागला तो महाराष्ट्रातल्या बारव शोधून त्या पाहण्याचा आणि जतन करण्याचा. रोहन यांनी नोकरीचा राजीनामा दिला, पण त्या दिवशी देश ठप्प झाला, कारण मार्च २०२० या वर्षी टाळेबंदी ज्या दिवशी लागू झाली त्या दिवशी रोहन यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. मग टाळेबंदी लागू झाल्यामुळे रोहन यांनी काही महिने घरीच राहण्याचा निर्णय घेतला आणि ऑक्टोबरमध्ये टाळेबंदीचे नियम शिथिल झाले तेव्हा आपली बाईक घेऊन ते निघाले आणि संपूर्ण महाराष्ट्र १४ हजार किमीचा प्रवास करून त्यांनी पिंजून काढला.

या प्रवासादरम्यान गावागावांमध्ये असलेल्या बारव शोधणे, त्या सुस्थितीत नसल्यास गावकऱ्यांच्या सहकार्याने ते बारव उत्खनन करून त्यांचं संवर्धन करणे, त्याचं एरियल मॅपिंग करणे, या बारवांना गुगल इंडिकेशन देणं अशी काम त्यांनी सुरू केली आणि या प्रवासात साडे सहाशे बारवांवर त्यांनी कामं केली. त्याचबरोबर एकूण १६५० बारवांचा शोध घेऊन त्याचं संवर्धन लोकसहभागातून त्यांनी आतापर्यंत केलंय.

देशाच्या नकाशावर बारवांचं महत्व पटवून द्यायचं आहे -

बारव म्हणजे विहिर. पण अश्या विहिरी ज्या विहिरींना पायऱ्या आहेत, ज्या विहिरी पूर्वी पाण्याचा साठा करण्यासाठी खास शैलीत बांधल्या जात होत्या असं रोहन म्हणतात. या बारव ऐतिहासिक आहेत, काही तर २ हजार वर्षांपूर्वीच्या देखील आहेत. कारण या बारवांची निर्मिती सातवाहन काळापासून सुरू झाली, ती अगदी मराठा साम्राज्यापर्यंत निर्मिल्या गेल्या. त्यामुळे या ऐतिहासिक ठेव्याचं जतन करण्यासाठी लोक सहभागातून पुढाकार घेणं गरजेचं होतं. देशाच्या नकाशावर बारवांचं महत्व पटवून द्यायचं होतं, म्हणून ही मोहीम राबवल्यानंतर आता त्याला येणारं व्यापक रूप पाहून समाधान वाटतं, असं रोहन सांगतात. राज्यात ५० हजार बारव वेगवेगळ्या काळात निर्मिल्या गेल्यात, पण त्यातील काही बुजल्या वा बुजवल्या गेल्या, तरीही सध्याच्या घडीला २० हजार बारव आहेत आणि याची नोंद इंग्रज अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलीय, त्यामुळे या बारव पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न रोहन यांचा सुरू आहे.

बारव दीपोत्सवाला परवानगीची मागणी -

शिवरात्रीला यंदा महाराष्ट्रात १६० बारवांवर बारव दीपोत्सव साजरा झाला, हा दीपोत्सव दरवर्षी अधिकृतपणे साजरा व्हावा अशी रोहन यांची मागणी आहे. त्यासाठी ते महाराष्ट्र पर्यटन विभागाला पत्र देखील देणार आहेत. तसेच महाराष्ट्र पर्यटन विभागाने या बारवांना पर्यटन स्थळांमध्ये स्थान द्यावं यासाठी देखील रोहन यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी या बारवांची माहिती गुगल लोकेशन, फोटो, एरियल मॅपिंग, आपल्या अधिकृत साईटवर टाकण्याची मागणी केली होती, ज्याची पूर्तता सध्या पर्यटन विभागाकडून केली जातेय.

रोहन काळे यांच्या या मोहिमेला आता व्यापक स्वरूप येतंय. हजारो लोक या बारव संवर्धन मोहिमेत सहभागी होतायत. खुद्द देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मोहिमेचं कौतुक केलंय. रोहन यांच्या या मोहिमेमुळेचं काळाच्या पडद्याआड जाऊ पाहणाऱ्या इतिहासाला आता उजाळा मिळतोय. आता खरी गरज आहे, ती शासनाने स्वतः पुढाकार घेऊन या ऐतिहासिक ठेव्याचं संवर्धन करण्याची आणि जागतिक स्तरावर स्थान देण्याची.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com