Relationship Tips : नात्यात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री तर झाली नाही ना? जोडीदाराच्या 'मंकी ब्रँचिंग'ची ही ५ लक्षणे वेळीच ओळखा

5 signs your partner is monkey branching : नातं कायम ठेवून दुसऱ्या व्यक्तीसोबत जवळीक वाढवण्याचा नवा डेटिंग ट्रेंड चर्चेत आला आहे. जोडीदाराच्या वागण्यात होणारे हे बदल देऊ शकतात धोक्याचा इशारा
5 signs your partner is monkey branching
5 signs your partner is monkey branchingsaam tv
Published On: 

आजच्या बदलत्या नातेसंबंधांच्या जगात डेटिंगचे अनेक नवे ट्रेंड समोर येत आहेत. यातीलच एक प्रकार म्हणजे 'मंकी ब्रँचिंग'. या प्रकारात एखादी व्यक्ती सध्याचे नाते संपवण्यापूर्वीच दुसऱ्या व्यक्तीसोबत भावनिक किंवा प्रेमसंबंध निर्माण करू लागते. म्हणजेच, सध्याचे नाते कायम ठेवत दुसऱ्या नात्याचा पर्याय तयार केला जातो. नवीन नात्यात स्थिरता मिळाल्यानंतरच ती व्यक्ती जुन्या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेते.

अशा प्रकारामुळे जोडीदाराचा विश्वास दुखावला जाऊ शकतो आणि नात्यात भावनिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. पण आपल्या जोडीदाराच्या वागण्यात असे बदल दिसत असतील, तर ते मंकी ब्रँचिंगचे संकेत असू शकतात.

5 signs your partner is monkey branching
Diabetes Diet : मधुमेहाचा त्रास आहे? मग रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी निवडा योग्य पर्याय

काय आहे 'मंकी ब्रँचिंग'?

माकड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडी मारताना आधी दुसरी फांदी घट्ट पकडते आणि त्यानंतरच पहिली फांदी सोडते. याच उदाहरणावरून 'मंकी ब्रँचिंग' ही संकल्पना तयार झाली आहे. नातेसंबंधांमध्ये याचा अर्थ असा की, एखादी व्यक्ती सध्याचे नाते संपवण्याआधीच दुसऱ्या व्यक्तीसोबत जवळीक वाढवते. नवीन नात्याची खात्री होईपर्यंत ती जुन्या जोडीदारासोबतचे नाते कायम ठेवते. यामागे एकटेपणाची भीती, सध्याच्या नात्यातील कंटाळा किंवा ब्रेकअपची जबाबदारी टाळण्याची मानसिकता असू शकते.

जोडीदाराच्या वागण्यात दिसणारी मंकी ब्रँचिंगची ५ लक्षणे

अचानक एखाद्या नव्या व्यक्तीशी वाढलेली जवळीक

तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात अचानक एखाद्या नव्या व्यक्तीची एन्ट्री झाली आहे का? त्या व्यक्तीसोबत सतत चॅटिंग करणे, फोनवर बोलणे किंवा बराच वेळ घालवणे असे प्रकार वाढले असतील, तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबत विचारल्यावर 'आम्ही फक्त चांगले मित्र आहोत' असे सांगितले जात असेल, तर परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा.

मोबाईल फोनबाबत वाढलेली गुप्तता

पूर्वी सहज मोबाईल वापरणारा जोडीदार अचानक फोन लपवू लागला आहे का? फोन नेहमी उलटा ठेवणे, नवीन पासवर्ड लावणे, तुमच्यासमोर फोन वापरणे टाळणे किंवा मेसेजेसबाबत अतिशय गुप्तता बाळगणे असे बदल दिसत असतील, तर त्याबाबत संवाद साधणे आवश्यक आहे.

क्षुल्लक कारणांवरून वारंवार वाद

जोडीदार प्रत्येक छोट्या गोष्टीवरून वाद घालू लागला आहे का? सतत मला थोडी स्पेस हवी आहे किंवा मला एकटे राहू द्या असे सांगत असेल, तर नात्यातील भावनिक अंतर वाढत असल्याची शक्यता असू शकते. मात्र, प्रत्येक वेळी स्पेस मागणे म्हणजे नात्यात तिसरी व्यक्ती आहेच, असे समजणे योग्य नाही.

5 signs your partner is monkey branching
Neck Pain Relief : उशीमुळे मान आखडतेय? कापसासारखी उशी मऊ करण्यासाठी ट्राय करा 3 सोप्या ट्रिक्स

भविष्यातील योजनांबाबत टाळाटाळ

पूर्वी लग्न, सहली, घर किंवा भविष्यातील आयुष्याबाबत तुमच्यासोबत उत्साहाने चर्चा करणारा जोडीदार अचानक या विषयांपासून दूर राहू लागला आहे का? भविष्यातील योजनांबाबत स्पष्ट उत्तर न देणे किंवा प्रत्येक वेळी विषय बदलणे हे नात्यातील बदलाचे एक लक्षण असू शकते.

भावनिक जवळीक कमी होणे

एकाच घरात किंवा खोलीत असूनही दोघांमध्ये भावनिक अंतर जाणवू लागते. तुमच्या भावना, दैनंदिन घडामोडी किंवा अडचणी यांमध्ये जोडीदाराला पूर्वीसारखा रस वाटत नाही. संवाद कमी होतो आणि एकमेकांसोबत वेळ घालवण्याची इच्छाही कमी होते. हा बदल नात्यातील दुराव्याचा संकेत असू शकतो.

मंकी ब्रँचिंगचा संशय आल्यास काय करावे?

  • सर्वप्रथम घाईघाईने निष्कर्ष काढू नका. केवळ फोन लपवणे, स्पेस मागणे किंवा नवीन मित्र बनवणे म्हणजे मंकी ब्रँचिंग असे नाही.

  • जोडीदाराशी शांतपणे आणि स्पष्टपणे संवाद साधा. नात्याबद्दल त्यांच्या अपेक्षा आणि भविष्यातील विचार समजून घ्या.

  • तुमच्या भावनांना महत्त्व देत नसेल किंवा विश्वासाला तडा जाणारे वर्तन करत असेल, तर स्वतःच्या आत्मसन्मानाचा आणि मानसिक शांततेचा विचार करा.

  • नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा संशय घेण्यापेक्षा स्पष्ट संवाद साधणे महत्त्वाचे आहे. स्वतःचा आत्मसन्मान गमावून कोणतेही नाते टिकवण्याचा प्रयत्न करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.