

हृदय निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉलची तपासणी महत्त्वाची मानली जाते. अनेकजण लोक रिपोर्टमध्ये एलडीएल, एचडीएल आणि ट्रायग्लिसराइड्स यांच्या आकड्यांकडेच जास्त लक्ष देतात. हेल्थ चेकअपमध्येही प्रामुख्याने याच गोष्टींची तपासणी केली जाते. मात्र हार्टच्या तज्ज्ञांच्या मते, एक महत्त्वाचा घटक अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे लाइपोप्रोटीन (a) किंवा Lp(a).
लाइपोप्रोटीन (a) हा देखील कोलेस्ट्रॉलचा एक प्रकार आहे. साधारण लिपिड प्रोफाइलमध्ये त्याची तपासणी करण्यात येत नाही. मात्र तरीही हार्ट अटॅकचा धोका वाढवण्यात याची भूमिका मोठी असू शकते.
भारतातील डॉक्टरांना एक गंभीर बाब लक्षात आली. अनेक लोकांचा कोलेस्ट्रॉल रिपोर्ट सामान्य असतानाही त्यांना 30 ते 40 व्या वर्षात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढल्याचं त्यांच्या लक्षात आहे. काही तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, यामागे शरीरातील Lp(a) चं वाढलेलं प्रमाण कारणीभूत असू शकतं.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या माहितीनुसार, हा घटक प्रामुख्याने आनुवंशिकतेशी जोडलेला असतो. त्यामुळे आहार किंवा व्यायाम केल्याने त्यावर फारसा परिणाम होत नाही.
Lp(a) हे दिसायला एलडीएल कोलेस्ट्रॉलसारखाच असतो. मात्र त्यात एक अतिरिक्त प्रोटीन असतं. याच प्रोटीनमध्ये बदल झाला किंवा शरीरात त्याचं प्रमाण जास्त झाले तर धमन्यांमध्ये प्लाक तयार होण्याची प्रक्रिया वेगाने होते. त्याचबरोबर रक्तवाहिन्यांमध्ये सूज निर्माण होण्याची शक्यता वाढते आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याचाही धोका निर्माण होतो. त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका अधिक वाढतो.
डॉक्टरांच्या मते, भारतात अकाली हार्ट अटॅकच्या घटना झपाट्याने वाढताना दिसतायत. विविध रिपोर्ट्सनुसार, देशातील एकूण मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू हे हृदयाशी संबंधित आजारांमुळे होतात. पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतात हार्ट अटॅक 10 ते 15 वर्षे लवकर येताना दिसतो. आनुवंशिक घटक, मधुमेह, उच्च रक्तदाब, चुकीची जीवनशैली आणि Lp(a) सारखे लपलेले लिपिड मार्कर्स हे सगळे घटक मिळून हा धोका वाढवू शकतात.
विशेष म्हणजे साधारण कोलेस्ट्रॉल तपासणीत Lp(a) ची चाचणी केली जात नाही. त्यामुळे अनेकांच्या रिपोर्टमध्ये सगळं काही नॉर्मल दिसतं पण हार्ट अटॅकचा धोका कमी झालेला नसतो. डॉक्टरांचं म्हणणं आहे की, ज्या लोकांच्या कुटुंबातील व्यक्तींना कमी वयात हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा त्रास झालाय त्यांनी Lp(a) ची तपासणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.