देशात अद्यापही कोरोना विषाणूचा कहर कायम असून देश या महामारीशी लढत आहे. अनेक देश कोरोना विषाणूवर संशोधन करत आहे. अशातच आता राज्यातून एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गुहेत दोन वेगवेगळया प्रजातीच्या वटवाघळांमध्ये निपाह व्हायरस आढळून आला आहे. पुण्यातील इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ऑफ इंडिया (NIV) या संस्थेने केलेल्या क्रॉस-सेक्शनल संशोधनात वटवाघळांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे.
- क्रॉस-सेक्शनल संशोधनात निपाह विषाणूचे पुरावे
जर्नल ऑफ इन्फेक्शन अँड पब्लिक हेल्थ'मध्ये याबाबत संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ऑफ इंडिया वटवाघळांमध्ये असलेल्या निपाह व्हायरस (एनआयव्ही) च्या व्याप्तीचा अभ्यास करण्यासाठी क्रॉस-सेक्शनल संशोधन करत होते. यासाठी ते सातारा जिल्ह्यातील एका थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या गुहेत गेले होते. यावेळी संशोधकांनी या गुहेतून 10 वेगवेगळ्या प्रजातीच्या वटवाघळांची तपासणी केली. यातील रौसेट्स लेशेनॉल्टुली (मध्यम आकाराचे फळ खाणारे ) आणि पी पिपिस्ट्रेलस (लहान आकाराचे कीटक खाणारे), या दोन प्रजातीच्या वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने धोकादायक रोगांच्या यादीत निपाह विषाणूला पहिल्या 10 रोगांमध्ये स्थान आहे.
- दोन प्रजातीच्या विषाणूंमध्ये आढळून आला निपाह
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी महाबळेश्वरच्या गुहेतून एकूण 10 वेगवेगळ्या प्रजातीची वटवाघळे पकडली होती. नमुने गोळा करण्यासाठी त्यांना भूल देण्यात आली होती. संशोधनासाठी पकडण्यात प्रत्येक प्रजातीच्या दहा वटवाघळांचे नेक्रप्सी करण्यात आले. त्यातील प्रत्येक प्रजातीच्या वाटवाघळाच्या घशातील आणि मलाशयातील नमुने गोळा करण्यात आले. गोळा केलेल्या नमून्यामधून आरएनए काढण्यात आला. त्यात अँटी-निव्ह आयजीजी अँटीबॉडीज आढळून आले. रौसेट्स लेशेनॉल्टुली आणि पी पाइपिस्ट्रेलस प्रजातीच्यावटवाघळांमध्ये एनआयव्ही आरएनए आणि एनआयव्ही एनजी आयजीजी अॅंटीबॉडी आढळून आलेले हे पहिलेच प्रकरण असल्याचे डॉ. प्रज्ञा यादव यांनी म्हटले आहे.
- अधिक संशोधन करणे गरजेचे
या संशोधनाचे प्रमुख लेखक मंगेश गोखले आणि एनआयव्हीचे माजी संचालक डॉ. डी. टी. मौर्य यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे. भारतात निपाह विषणूच्या व्याप्तीचा अभ्यास करण्यासाठी रौसेट्स लेशेनॉल्टुली आणि पी पिपिस्ट्रेलस या वटवाघळांचे अनेक नमुने गोळा करण्यात आले. रौसेट्स लेशेनॉल्टुली आणि पी पाइपिस्ट्रेलस प्रजातीच्या वटवाघळांच्या प्रजनन क्षमतेत बदल होत असल्यामुळे त्याचा विषाणूच्या प्रसारावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी बॅट आणि मानवांचा अधिक अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी नोंदवले आहे.
- यापूर्वी भारतात चार वेळा निपाहचा उद्रेक
आतापर्यंत भारतात चार वेळा निपाह विषाणू आढळून आला आहे. पश्चिम बंगालच्या सिलिगुडी जिल्ह्यात 2001 मध्ये आणि त्यानंतर 2007 मध्ये सिलीगुडी जिल्ह्यात संसर्गाचे पुरावे आढळून आले आहेत. त्यानंतर आसामच्या म्यानागुरी आणि दुबरी जिल्ह्यात आणि पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये दोन्ही ठिकाणी एनआयव्ही प्रतिपिंडे आढळून आले. ही दोन्ही ठिकाणे बांगलादेशच्या सीमेवर वसलेले आहे. दरम्यान तीन वर्षापूर्वी म्हणजे 2018 मध्ये आणि 2019मध्ये केरळ राज्यातील कोझीकोड जिल्ह्यात निपाहचा उद्रेक झाला होता. यावेळी केरळात निपाहच्या 18 केसेस आढळून आल्या होत्या. अभ्यासानुसार एनआयव्ही रोगाचे संभाव्य आकर्षण केंद्र म्हणून भारतीय राज्यांसह अनेक दक्षिण-पूर्व आशियाई देशांची ओळख झाली आहे. धक्कादायक म्हणजे निपाह व्हायरसमध्ये मृत्यूदर हा 65 ते100 टक्के इतका आहे.
Edited By - Anuradha Dhawade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.