
monsoon tips for home: पावसाळ्यात बाल्कनी किंवा खिडकीतून येणाऱ्या पाण्याने फ्लोअर खराब होत आहे?, घरात सतत ओलावा राहतो, किचनमधील डाळी, धान्य-कडधान्य बुर्शी लागून खराब होतात, घरात किड्या-मुंग्याचे प्रमाण वाढतं, अस्वच्छ पाण्यामुळे अॅलर्जी होते, धुतलेल्या कपड्यांना कुबट वास येतो, ओले कपडे सुकत नाहीत अशा समस्यांना पावसाळ्यात तुम्हाला सामोरं जावं लागत असेल तर तुम्ही पुढील सोप्या टिप्स फॉलो करू शकता.
बऱ्याचदा पावसाळ्यात घरात स्वच्छता राखणे कठीण होऊन जाते. बाल्कनीतून येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे घराच्या बाहेरील फ्लोअरवर पाणी साचून राहते. यामुळे बाहेरून येताना तेच पाण्याचे पाय घरात येतात. आणि घरातला फ्लोअर सुद्धा ओला होतो. अशावेळी तुम्ही पर्याय म्हणून डोअर मॅटचा वापर करू शकता. दाराच्या बाहेर-आत दोन्हीकडे मॅट ठेवल्याने घरात येताना पायही स्वच्छ होतात आणि फ्लोअरवर ओल्या पायांचे ठसेही येत नाहीत. तसेच चपला ठेवण्यासाठी बंद शू-रॅक वापरण्याऐवजी खुला शू-रॅक वापरला तर, ओल्या चपला सुक्या राहतात आणि उग्र वासही येत नाही. बाल्कनीच्या खुल्या भागाला प्लस्टिकने कवर करावे जेणेकरून पावसाचे पाणि आत शिरणार नाही.
तुमच्या घरी आऊटडोअर प्लॅन्ट्स असतील तर, एका स्प्रे-बॉटल मध्ये पाण्यात कडूलिंबाचे तेल मिसळून कुंड्यांच्या आजुबाजूला आणि रोपांच्या पानांवर स्प्रे केल्यास ते एका किटकनाशकाचे काम करते. शिवाय कडूलिंबामध्ये अॅन्टीबॅक्टेरीअल गुणधर्म असतात. पावसाळ्यात बऱ्याचदा वापरण्यासाठी सोडले जाणारे पाणी गढूळ आणि अस्वच्छ असते, त्यात जंतू असण्याची शक्यता असते म्हणून अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने घातली असता त्वचेला अॅलर्जी होत नाही. तसेच घरी इनडोअर प्लॅन्ट्स असतील तर त्यामुळे घरात ओलावा राहतो म्हणून त्यांना शक्यतो बाहेर ठेवावे.
किचनमध्ये सतत पाण्याचा वापर होत असल्याने ओलावा राहतो. यावर उपाय म्हणून तुम्ही भांडी घासून झाल्यानंतर ओल्या भांड्यांचा ट्रे ठेवण्याआधी खाली एखादा कपडा ठेवा. म्हणजे ट्रे मधून पडणारे पाणी कपडा शोषून घेतो आणि ती जागा सुकी राहते. शिवाय थंड वातावरणामुळे डाळी-कडधान्यांना बुर्षी लागून ते खराब होतात. त्यामुळे ते एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवावे. किचन ट्रॉलीज खोलून तासभर तरी पंखा सुरू ठेवावा. कपडे धुताना सुगंधीत क्लोथ कन्डीश्नरचा वापर करावा. यामुळे कपड्यांना कुबट वास येणार नाही.