
ऑगस्ट महिना हा गॅस्ट्रोपेरेसिस जागरूकता महिना म्हणून पाळला जातो. गॅस्ट्रोपेरेसिसविषयी बहुतांश व्यक्तींना पुरेशी माहिती नसल्याने या विकाराबद्दल जागरूकता वाढवणं ही काळाची आहे. गॅस्ट्रोपेरेसिस हा एक आजार असून यात अन्नाचे पचन नीट होत नाही किंवा जेवल्यानंतर पोट व्यवस्थितरित्या रिकामं होत नाही आणि पोटाची हालचाल मंदावते.
गॅस्ट्रोपेरेसिस किंवा पोट उशिरा रिकामं होणं, सतत पोटफुगी, मळमळ, लवकर पोट भरणं आणि पौष्टिक घटकांची कमतरता हे जीवनाच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम करतात.
ॲसिडीटी किंवा अपचन समजून बऱ्याचदा गॅस्ट्रोपेरेसिसच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं, विशेषतः महिलावर्ग आणि मधुमेहींकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचं आढळून येतं. ही स्थिती समजून घेणं आणि त्यावर वेळीच वैद्यकीय मदत घेणे गरजेचं आहे. या स्थितीचं मॅनेजमेंट करण्यासाठी त्वरीत वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे.
पोटाचे स्नायू योग्यरित्या कार्य करत नसल्यामुळे, लहान आतड्यातील अन्नाची हालचाल मंदावते किंवा थांबते तेव्हा गॅस्ट्रोपेरेसिस होतो. पोट रिकामं होण्यास वेळ लागणं आणि हा विलंब एखाद्याच्या पचनक्रियेत अडथळा निर्माण करतो, अस्वस्थता आणतो आणि कुपोषण तसेच रक्तातील साखरेची पातळी अस्थिर होण्यास कारणीभूत ठरू शकतो.
अनियंत्रित मधुमेह, व्हॅगस नर्व्हवर परिणाम करणाऱ्या शस्त्रक्रिया आणि काही ठराविक औषधं ही त्यामागची कारणं आहे. मळमळ आणि उलट्या, पोटदुखी, वजन कमी होणं, थोडेसं अन्न खाल्ल्यानेही पोट भरल्यासारखे वाटणं आणि भूक न लागणं ही लक्षणे दिसून येतात. बरेच लोक या लक्षणांना पचनाच्या समस्या समजून त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत, ज्यामुळे निदान आणि व्यवस्थापनात विलंब होतो.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे डॉ. विशाल शेठ म्हणाले की, महिला आणि मधुमेहींमध्ये गॅस्ट्रोपेरेसिसचे ५०% प्रकरणांचं वर्षानुवर्षे निदान होत नाहीत कारण त्यांची लक्षणं अॅसिडिटी किंवा गॅस सारख्या पचनाच्या तक्रारींशी जुळतात. महिला आणि मधुमेही रुग्णांमध्ये याचं निदान आव्हानात्मक आहे. हार्मोनल बदल किंवा साखरेचे योग्य नियंत्रण न झाल्यास ही स्थिती आणखी गंभीर ठरु शकते. याकरिता जागरूकता महत्त्वाची असून वेळीच निदानाने दीर्घकालीन गुंतागुंत टाळता येऊ शकते.
डॉ. शेठ पुढे म्हणाले की, मधुमेह आणि गॅस्ट्रोपेरेसिस यांच्यात एक परस्परसंबंध आहे. उच्च रक्तातील साखरेची पातळी पोटाच्या स्नायूंना नियंत्रित करणाऱ्या नसांना नुकसान पोहोचवतं, ज्यामुळे पोट रिकामं होण्यास उशीर होतो. गॅस्ट्रोपेरेसिसमुळे मधुमेहाचं व्यवस्थापन करणं कठीण होते आणि रक्तातील अनियंत्रित साखर आतड्यांचे कार्य बिघडवतं.
रक्तातील ग्लुकोजचे योग्य व्यवस्थापन हे आतड्यांचे आरोग्य राखण्याचा सर्वात महत्वाचा मार्ग आहे. गॅस्ट्रोपेरेसिसवर कायमस्वरूपी उपचार नाहीत. परंतु आहारातील बदल, औषधं आणि रक्तातील साखरेवर योग्य नियंत्रणाने लक्षणं व्यवस्थापित केली जाऊ शकतात. एकाच वेळी भरपेट न जेवता थोड्या थोड्या अंतराने खाणं, जास्त चरबीयुक्त आणि जास्त फायबरयुक्त पदार्थांचे सेवन टाळा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधांचे सेवन करा, असंही डॉक्टरांचं म्हणणं आहे.
मधुमेहाच्या रुग्णांमध्ये, वेळीच चाचण्या करून रक्तातील ग्लुकोजचे व्यवस्थापन हे गॅस्ट्रोपेरेसिसची लक्षणे कमी करतात आणि यामुळे आतड्यांचे कार्य सुधारण्यास मदत होते. रक्तातील साखरेची नियमित तपासणी केल्यास तुम्ही निरोगी जीवन जगु शकतात आणि गॅस्ट्रोपेरेसिसचे व्यवस्थापन करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.