
पूर्वी धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या सवयींमुळे पुरुषांमध्ये महिलांच्या तुलनेने कॅन्सरचं प्रमाण अधिक होतं. मात्र बदलत्या काळानुसार आता महिलांमध्ये व्यसनाचं वाढतं प्रमाण, जीवनशैलीतील बदल, आहारातील बदल, व्यायामाच्या अभावामुळे कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत चालली आहे. चुकीच्या जीवनशैलीच्या निवड, पर्यावरणीय घटकांमुळे महिलांमध्ये स्तन, फुफ्फुस, गर्भाशय मुख, यकृत आणि थायरॉईड कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे या वाढत्या घटना चिंताजनक असल्या तरी वेळीच निदान, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांमुळे जगण्याचा दर आणि जीवनमान सुधारू शकतात.
द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अहवालात असे आढळून आले आहे की गेल्या दशकात पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कर्करोगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि भविष्यात हा दर वाढतच राहील. या आकडेवारीवरून असेही दिसून आले आहे की जरी महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा सर्वाधिक त्रास होत असला तरी, फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे दोन्ही महिला आणि पुरुषांमध्ये सर्वाधिक प्रमाणात मृत्यू होतात. २०२२ ते २०५० दरम्यान मृत्युदर ६४.७ वरून १०९.६ पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आला आहे.
महिलांमध्ये कर्करोगाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत, त्यामुळे लक्षणांबद्दल जागरूकता निर्माण करणे, गैरसमजूती दूर करणे आणि वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत ३५ ते ६५ वयोगटातील महिलांमध्ये कर्करोगाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून स्तन, थायरॉईड, फुफ्फुस आणि गर्भाशय मुखाचा कर्करोग अधिक सामान्य आहे. महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण चिंताजनकपणे वाढत आहेत आणि तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
पुण्यातील टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरचे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. गौरव जसवाल यांनी सांगितलं की, तळेगावच्या ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या (२०२३-२०२५) आकडेवारीनुसार, २० ते ३० वयोगटातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे एकही रुग्ण आढळलेला नाही. ३० ते ४० वयोगटात १५.९% महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रकरणे आढळून आली आहेत तर ४०-५० वयोगटातील २७.०% महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. या आजाराचे प्रमाण ५० ते ६० वयोगटातील महिलांमध्ये अधिक असून, यामध्ये २८.६% महिलांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. ६० ते ७० वयोगटातील १४.३% महिलांना स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती आहे.
ही प्रकरणं वाढण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत, ज्यात लठ्ठपणा, बैठी जीवनशैली, मद्यपान आणि प्रक्रिया केलेले अन्नाचा वापर, आहाराच्या चुकीच्या सवयींचा समावेश आहे. गर्भधारणेस होणारा विलंब, स्तनपान कमी करणे आणि वाढता ताणतणाव यासारखे घटक प्रजनन आरोग्यावर परिणाम करतात. ग्रामीण भागातही हळूहळू कर्करोगाविषयी जागरूकता केली जात असून आजही अनेक लोकांमध्ये याबाबत भीती, गैरसमजूती आढळून येतात.
डॉ. गौरव जसवाल पुढे सांगतात की, जगण्याचा दर आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेळीच निदान करणे गरजेचे आहे. वेळीच निदान आणि उपचार केल्यास जगण्याच्या दरात लक्षणीयरित्या वाढ होते. सामान्य फुफ्फुसाच्या कर्करोगाचा जगण्याचा दर पाच वर्ष म्हणजेच ६१ टक्के इतका आहे. मात्र तो जेव्हा इतर अवयवांमध्ये पसरतो तेव्हा त्या व्यक्तीचा जगण्याचा दर ७ टक्के इतका कमी होतो. त्याचप्रमाणे, पहिल्या टप्प्यात निदान झालेल्या स्तनाच्या कर्करोगाचा पाच वर्षांचा जगण्याचा दर 90% पेक्षा जास्त आहे, तर चौथ्या टप्प्यात तो 30% पेक्षा कमी होतो.
कर्करोगाच्या उपचारात (शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी किंवा सिस्टेमिक थेरपी) विलंब झाल्यास मृत्युदरात वाढ होते. सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोगांना अनेकदा कमी आक्रमक उपचारांची आवश्यकता भासते, ज्यामुळे दुष्परिणाम कमी होतात आणि जीवनाची गुणवत्ता सुधारते. वेळीच उपचार केल्यास रुग्णाचा जीव वाचविता येऊ शकतो आणि कर्करोगाच्या उपचारांचा शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या परिणाम कमी होत आहे.
कर्करोग रोखण्यासाठी महिलांनी संतुलित आहाराचे सेवन करावे, दररोज व्यायाम करावा, वजन नियंत्रित राखावे, अल्कहोलचे सेवन मर्यादित करावे, तंबाखू आणि इतर कर्करोगजन्य घटक शक्यतो टाळावेत. नियमित तपासणीमुळे कर्करोगाचे वेळीच निदान करता येते व त्याच्या त्यांच्यावर उपचार करता येतात. यामध्ये स्तन, गर्भाशयाच्या मुखाचा आणि कोलन कर्करोगांसाठी तपासणी तसेच रक्तदाब, कोलेस्ट्रॅाल आणि मधुमेहाची तपासणी समाविष्ट आहे. एचपीव्ही (HPV) लसीकरण हे गर्भाशयाच्या कर्करोगापासून बचाव करू शकते. नियमित तपासणी करणे आणि लसीकरणाबाबत जागरुक राहून महिलांनी आपल्या आरोग्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. गौरव जसवाल यांनी व्यक्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.