High blood pressure: फक्त जास्त मीठानेच ब्लड प्रेशर वाढत नाही; साध्या वाटणाऱ्या या 6 सवयीही ठरतायत कारणीभूत

Habits that raise blood pressure: फक्त जास्त मीठ किंवा ताणतणावामुळेच ब्लड प्रेशर वाढत नाही. दिवसभर बसून राहणं, अपुरी झोप, मद्यपान, सततचा ताण आणि वाढतं वजन यांसारख्या रोजच्या सवयींचाही रक्तदाबावर परिणाम होऊ शकतो.
High blood pressure
High blood pressuresaam tv
Published On

ब्लड प्रेशर वाढण्यामागे केवळ जास्त मीठ खाणं किंवा ताणतणाव हेच कारण नसतं. रोजच्या आयुष्यातील काही साध्या वाटणाऱ्या सवयीही तुमचा रक्तदाब वाढवू शकतात. एखाद्या दिवशी जास्त मीठ खाल्लं किंवा एक दिवस अधिक ताण आला म्हणून लगेच रक्तदाब वाढतो असं नाही. अशा सवयी सतत अनेक महिने सुरू राहिल्या तर त्याचा परिणाम रक्तदाबावर होऊ शकतो. विशेष म्हणजे उच्च रक्तदाबाची अनेकदा कोणतीही ठळक लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे काही सवयींकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे.

नकळत जास्त मीठ खाणं

ब्लड प्रेशर वाढण्याचा संबंध मीठाशी आहे हे अनेकांना माहितीये. मात्र फक्त जेवणात वरून टाकलेलं मीठच महत्त्वाचं नसतं. नमकीन, लोणचं, पापड, सॉस, ब्रेड, इन्स्टंट पदार्थ, पॅकेज्ड स्नॅक्स आणि हॉटेलमधील पदार्थांमधूनही शरीरात मोठ्या प्रमाणात सोडियम जाऊ शकतं. ज्यांना आधीपासून उच्च रक्तदाब आहे, किडनीचा आजार आहे. मधुमेह आहे किंवा ज्यांच्या शरीरावर मीठाचा परिणाम अधिक होतो, त्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

दिवसभर जास्त वेळ बसून राहणं

सकाळी अर्धा किंवा एक तास व्यायाम केला म्हणजे उर्वरित दिवस ८ ते १० तास सतत बसून राहण्याचा परिणाम पूर्णपणे भरून निघतो असं नाही. दीर्घकाळ हालचाल न करता बसून राहिल्याने वजन, शरीरातील चयापचय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

अशावेळी फोनवर बोलताना थोडं चालणं, कामाच्या मध्ये उठून उभं राहणं किंवा काही मिनिटं चालणं अशा छोट्या हालचाली उपयोगी ठरू शकतात. फक्त एकदाच मोठा व्यायाम करण्याची वाट पाहण्यापेक्षा दिवसभरात हालचाल वाढवणं महत्त्वाचं आहे.

ताण कमी करण्यासाठी मद्यपान

ताण कमी करण्यासाठी दारू पिण्याची सवय काही लोकांना सामान्य वाटू शकते. मात्र नियमितपणे दारू पिण्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि त्याचा परिणाम कालांतराने अधिक जाणवू शकतो. आधीपासून उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना तो नियंत्रणात ठेवणं दारूमुळे अधिक कठीण होऊ शकतं. त्यामुळे रक्तदाब टाळण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी दारू टाळणं किंवा त्याचं सेवन मर्यादित करणं महत्त्वाचं आहे.

झोपेकडे दुर्लक्ष करणं

रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहणं, कामाच्या डेडलाइन, अनियमित वेळेला झोपणं किंवा कमी झोपण्याची सवय अनेकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनली आहे. मात्र शरीरासाठी झोपेची कमतरता सामान्य गोष्ट नाही. खराब किंवा अपुऱ्या झोपेमुळे रक्तदाबाच्या नेहमीच्या पद्धतीवर परिणाम होऊ शकतो. झोपताना मोठ्याने घोरणं, अचानक गुदमरल्यासारखं होणं, धापा टाकणं किंवा दिवसभर प्रचंड झोप येणं याकडे केवळ 'झोप नीट झाली नाही' म्हणून दुर्लक्ष करू नये.

सतत तणावाखाली राहणं

एखादी तणावपूर्ण मीटिंग, वाद किंवा अचानक आलेली चिंता यामुळे काही काळासाठी रक्तदाब वाढू शकतो. मात्र रोजच्या आयुष्यात सतत तणावात राहणं ही मोठी समस्या ठरू शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सततचा ताण असल्यास अॅड्रेनालिन आणि कॉर्टिसॉल या हार्मोन्सची पातळी वाढलेली राहू शकते. त्याचा परिणाम झोप, भूक आणि शारीरिक हालचालींवर होतो. कालांतराने हृदय आणि रक्तवाहिन्यांवर त्याचा ताण येऊ शकतो. परिणामी तुमचा रक्तदाब वाढू लागतो.

वाढत्या वजनाकडे दुर्लक्ष करणं

आपलं वजन हे हळूहळू वाढतं. त्यामुळे वजनकाट्यावरचे काही अतिरिक्त किलो सहज लक्षात येत नाहीत. मात्र सतत वाढणारं वजन रक्तदाब वाढण्यास कारणीभूत ठरू शकतं. वाढलेल्या वजनाचा परिणाम रक्तवाहिन्या, किडनी आणि शरीरातील पाणी आणि रक्तदाब नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर होऊ शकतो. त्यामुळे वजनात थोडीशी घट झाली तरी त्याचा फायदा होऊ शकतो.

कोणत्या लोकांनी अधिक काळजी घ्यावी?

कुटुंबात उच्च रक्तदाबाचा इतिहास असलेले लोक, किडनीचा आजार किंवा मधुमेह असलेले रुग्ण, लठ्ठपणा असलेले लोक, स्लीप अॅप्नियाचा त्रास असलेले आणि यापूर्वी रक्तदाब वाढलेला आढळलेले लोक यांनी या सवयींकडे विशेष लक्ष द्यावं.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com