
आजकाल कामाचा वेग तर वाढलाच आहे वेळही वाढली आहे. अशात सकाळी संपूर्ण नाश्ता करण्याचा सुद्धा वेळ मिळत नाही. यावेळी अनेकजण नाश्त्यासाठी ब्रेड बटर, ब्रेड चहा किंवा ब्रेड अंडी हा पर्याय निवडतात. ब्रेड खाल्ल्याने पोटही भरलेले राहते आणि शरिराला उपयुक्त पोषणही मिळतं. पण तुम्ही मधुमेहाचे रूग्ण असाल तर, कोणत्या प्रकारचा ब्रेड खाताय यावर लक्ष केंद्रीत करणे महत्त्वाचे आहे. नाहीतर, ते तुमच्या रक्तातील साखर वाढीचे कारण बनू शकते.
ब्रेड बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धान्यांच्या पिठामध्ये नैसर्गिक स्टार्च असतो. ब्रेड बनवताना तो फुगवण्यासाठी यीस्टचा वापर केला जातो. यीस्ट पिठामधील स्टार्चचे विघटन करून साखर तयार करतो. साधारणतः सर्वच प्रकारचे ब्रेड बनवण्यासाठी यीस्टचा वापर केला जातो. त्यामुळे ब्रेडमध्ये ग्लुकोजचे थोडेफार प्रमाण असतेच. पण काही ब्रेडमध्ये चव सुधारण्यासाठी अतिरिक्त साखरेचा वापर केला जातो. जसे की, पांढारा ब्रेड.
पांढऱ्या ब्रेडमध्ये फायबर कमी आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. शिवाय फायबरच्या कमी प्रमाणामुळे ग्लुकोज रक्तामाध्ये जलद गतीने मिसळतं. यामुळेच तुम्ही मधुमेहाचे रूग्ण असाल तर पांढरा ब्रेड खाणे टाळले पाहिजे. त्याऐवजी तुम्ही सॉडो किंवा पूर्ण धान्याचा ब्रेड खाऊ शकता. या प्रकारच्या ब्रेडमध्ये नैसर्गिकरित्याच साखरेचे प्रमाण कमी असते. आणि ब्रेड फुगवण्यासाठीही अतिरिक्त साखर न वापरता पिठातील साखरेचाच वापर केला जातो.
मधुमेहाचा धोका वाढण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही ब्रेड सोबत हिरव्या भाज्या, अळशीच्या बिया, अॅव्होकाडो, अंडी, चिकन किंवा इतर प्रथिनेयुक्त पदार्थ खाऊ शकता. यांसारख्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात उपयुक्त फॅट्स असतात. ज्यामुळे शरिराला सतत ऊर्जा मिळत राहते आणि प्रथिनांद्वारे रक्तातील साखरेमध्ये वाढ किंवा घट होत नाही. यामुळे कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.