बदलते हवामान, वाढते प्रदूषण आणि चुकीच्या आहाराचा परिणाम केसांच्या आरोग्यावर होत आहे. केस गळणे, कोरडे होणे आणि कोंड्याची समस्या अनेकांना सतावत आहे. अशा वेळी महागड्या हेअर केअर उत्पादनांऐवजी जास्वंदाच्या फुलांपासून आणि पानांपासून घरच्या घरी तेल तयार करता येते. जाणून घ्या हे तेल बनवण्याची सोपी पद्धत आणि वापरण्याची योग्य वेळ.
आजकाल केसांच्या समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. बदलती जीवनशैली, प्रदूषण, पोषणाचा अभाव आणि हवामानातील बदल यामुळे केसांचे आरोग्य बिघडू शकते. काही जणांना केसगळतीचा त्रास होतो, तर काहींचे केस कोरडे आणि निस्तेज होतात. या समस्यांवर उपाय म्हणून अनेक जण महागडे सीरम, शॅम्पू आणि हेअर मास्क वापरतात.
मात्र, घरात सहज उपलब्ध असणाऱ्या जास्वंदीच्या फुलांचा आणि पानांचा वापर करूनही केसांची काळजी घेता येऊ शकते. जास्वंदीचा वापर पारंपरिक पद्धतीने केसांच्या निगेसाठी केला जातो. त्यापासून तयार केलेले तेल केसांना आणि टाळूला मॉइश्चर देण्यासाठी मदत करू शकते.
१ कप खोबरेल तेल, ८ ते १० जास्वंदीची फुले, ८ ते १० जास्वंदीची पाने
सर्वप्रथम जास्वंदची ८ ते १० फुले आणि तेवढीच पाने स्वच्छ करून घ्या. त्यानंतर ती उन्हात किंवा पंख्याखाली साधारण २४ तास वाळवून घ्या.
फुले आणि पाने पूर्णपणे वाळल्यानंतर मिक्सरमध्ये टाकून त्यांची बारीक पावडर करून घ्या.
गॅसवर एका भांड्यात एक कप खोबरेल तेल गरम करण्यासाठी ठेवा. खोबरेल तेलाऐवजी ऑलिव्ह ऑईल किंवा बदामाचे तेलही वापरू शकता.
तेल कोमट झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेली जास्वंदाची पावडर घाला. हे मिश्रण मंद आचेवर साधारण १० मिनिटे गरम होऊ द्या.
त्यानंतर गॅस बंद करून तेल पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झाल्यावर स्वच्छ कपड्याने किंवा गाळणीने तेल गाळून काचेच्या स्वच्छ बाटलीत भरून ठेवा.
जास्वंदाचे तेल वापरण्यापूर्वी एका वाटीत साधारण दोन चमचे तेल घ्या. कापसाच्या मदतीने हे तेल केसांच्या मुळांशी आणि टाळूवर लावा.
त्यानंतर बोटांच्या मदतीने हलक्या हाताने ५ ते ६ मिनिटे मसाज करा. तेल साधारण ४० ते ४५ मिनिटे केसांवर राहू द्या. त्यानंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.
आठवड्यातून एकदा या तेलाचा वापर करता येऊ शकतो. मात्र, रात्रभर तेल लावून ठेवणे प्रत्येकासाठी आवश्यक नाही. आपल्या केसांच्या आणि टाळूच्या प्रकृतीनुसार त्याचा वापर करावा.
जास्वंदाचे तेल हा केसांच्या निगेसाठी वापरला जाणारा पारंपरिक घरगुती उपाय आहे. मात्र, यामुळे केसगळती थांबते किंवा टक्कल पडण्याची समस्या दूर होते, याचे ठोस वैज्ञानिक पुरावे मर्यादित आहेत. तेल वापरण्यापूर्वी त्वचेच्या छोट्या भागावर चाचणी घ्या. खाज, जळजळ किंवा ॲलर्जी जाणवल्यास वापरणे थांबवा. केसगळती जास्त होत असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
टीप : ही माहिती सामान्य माहितीसाठी आहे. कोणत्याही घरगुती उपायाला वैद्यकीय उपचारांचा पर्याय समजू नये.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.