शरीर निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी काही प्रकारचे नट आणि बिया खूप फायदेशीर मानल्या जातात. चिया सीट्स, अंबाडीच्या बिया, भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे याबद्दल बरीच चर्चा झाली आहे. या लेखात आपण अंबाडीच्या बिया आणि त्याच्या तेलाचे फायदे जाणून घेणार आहोत. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अंबाडीच्या बियांचा आहारात समावेश केल्यास अनेक प्रकारच्या आजारांपासून तुमचे संरक्षण होऊ शकते.
अंबाडीच्या अनेक फायद्यांसोबतच त्याचे तेलसुद्धा औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. फ्लॅक्ससीड तेलाचे दररोज सेवन केल्याने बद्धकोष्ठता आणि हृदयाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो. या बियांचे दररोज सेवन केल्याने कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबाचा धोका कमी होतो, जे हृदयविकारांचे मुख्य घटक मानले जातात.
चला जाणून घेऊया अंबाडीच्या बियांचे फायदे.
अंबाडीच्या बियांमध्ये प्रथिने, फायबर आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व पोषक घटक आपल्याला नियमितपणे आवश्यक असतात. काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि कोलेस्टेरॉल तसेच रक्तदाब यांसारख्या समस्या कमी करण्यासाठी या बियांचे सेवन फायदेशीर ठरू शकते.
फ्लेक्ससीड्समध्ये थायमिन असते. जो एक प्रकारचा व्हिटॅमिन बी आहे. हे चयापचय तसेच पेशींच्या कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. फ्लेक्ससीड हे तांब्याचा एक चांगला स्रोत देखील मानला जातो, जो मेंदूच्या विकासासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
अंबाडीच्या तेलाचे फायदे
अंबाडीच्या बिया आणि त्याचे तेल आरोग्यासाठी अनेक बाबतीत फायदेशीर ठरते. विशेषत: ज्या लोकांना संधिवात सारख्या जळजळीशी संबंधित समस्या आहेत त्यांना विशेष फायदे मिळू शकतात. मात्र, त्याच्या अतिसेवनामुळे ऍलर्जी होऊ शकते, म्हणून ते मर्यादित प्रमाणातच सेवन करा. गरोदर आणि स्तनदा मातांनी वैद्यकीय सल्ल्याशिवाय याचे सेवन करू नये.
Written By: Sakshi Jadhav