Women Cancer Symptoms: ‘वय वाढतंय म्हणून...’ महिलांनो या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, शरीर देतंय गंभीर आजाराचे संकेत

महिलांमध्ये मासिक पाळीतील अचानक बदल, रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव, सतत पोट फुगणे, ओटीपोटात दुखणे किंवा असामान्य स्राव याकडे दुर्लक्ष करू नये. प्रत्येक लक्षण कर्करोगाचे नसले तरी वारंवार होणाऱ्या बदलांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि वेळेवर तपासणी करणे महत्त्वाचे आहे.
Women Cancer Symptoms
Women Cancer Symptomssaam tv
Published On: 

महिलांमध्ये मासिक पाळीतील अचानक बदल, रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव, सतत पोट फुगणे, ओटीपोटात दुखणे किंवा असामान्य स्राव याकडे दुर्लक्ष करू नये. प्रत्येक लक्षण कर्करोगाचे नसले तरी वारंवार होणाऱ्या बदलांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि वेळेवर तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

महिलांमध्ये वय वाढल्यानंतर मासिक पाळीतील बदल, पोट फुगणे, ओटीपोटात दुखणे किंवा रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव होणे अशा तक्रारी जाणवू शकतात. अनेकदा या तक्रारींकडे ‘वयामुळे होत असेल’ म्हणून दुर्लक्ष केले जाते. काही वेळा ही लक्षणे साध्या कारणांमुळेही असू शकतात. मात्र, एखादी तक्रार वारंवार होत असेल किंवा नेहमीपेक्षा वेगळी जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण गर्भाशय, गर्भाशयमुख, अंडाशय, योनी आणि बाह्य जननेंद्रियाच्या कर्करोगातही अशी लक्षणे दिसू शकतात.

घर आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना अनेक महिला स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मासिक पाळी अनियमित झाली तर त्यामागे वय वाढणे हेच कारण आहे, असे मानले जाते. सतत पोट फुगत असेल तर गॅस किंवा अपचन असेल असे वाटते. ओटीपोटात दुखत असेल तर ही वयासोबत येणारी सामान्य समस्या आहे, असे समजले जाते. रजोनिवृत्तीनंतर रक्तस्राव झाला तरी तो हार्मोन्समधील बदलामुळे झाला असे मानून त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.

Women Cancer Symptoms
Black Salt Water Benefits: पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या!

पण प्रत्येक वेळी असे असतेच असे नाही. शरीरातील काही बदल हे गंभीर आजाराचे संकेतही असू शकतात. गर्भाशय, गर्भाशयमुख, अंडाशय, योनी किंवा बाह्य जननेंद्रियाच्या कर्करोगात काही लक्षणे साध्या हार्मोनल किंवा पचनाच्या समस्यांसारखी दिसू शकतात. त्यामुळे शरीरात नेहमीपेक्षा काही वेगळे जाणवत असेल, तर तपासणी करून घेणे गरजेचे आहे.

मासिक पाळीत अचानक बदल झाला तर सावध व्हा

पुण्यातील लुल्लानगरमधील मदरहूड हॉस्पिटलच्या स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञ डॉ. पायल नारंग यांनी सांगितलं की, मासिक पाळीच्या रक्तस्रावात अचानक बदल होणं हे महत्त्वाचं लक्षण असू शकतं. नेहमीपेक्षा जास्त रक्तस्राव होणे, पाळी जास्त दिवस सुरू राहणे किंवा दोन पाळींमध्ये रक्तस्राव होणे असे बदल नव्याने जाणवत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

विशेषतः रजोनिवृत्तीनंतर कोणत्याही प्रकारचा रक्तस्राव झाला तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. हा रक्तस्राव केवळ वय किंवा हार्मोन्समधील बदलामुळेच होतो असे नाही. त्यामागे कर्करोगाशिवाय इतर कारणेही असू शकतात. मात्र, नेमके कारण समजण्यासाठी वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.

सतत पोट फुगत असेल तर दुर्लक्ष नको

कधीतरी पोट फुगणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, सतत पोट फुगत असेल, ओटीपोटात दुखत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल, तसेच थोडेसे खाल्ल्यानंतरही पोट भरल्यासारखे वाटत असेल तर या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे नुकतीच सुरू झाली असतील, वारंवार होत असतील किंवा त्यांची तीव्रता हळूहळू वाढत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ओटीपोटातील वेदना वारंवार होत असतील तर तपासणी करा

ओटीपोटात दुखण्यामागे अनेक कारणे असू शकतात. गर्भाशयातील सिस्ट, एंडोमेट्रिओसिस, संसर्ग किंवा पचनाशी संबंधित समस्यांमुळेही वेदना होऊ शकतात. मात्र, कोणतेही स्पष्ट कारण नसताना ओटीपोटात सतत दुखत असेल आणि त्यासोबत मासिक पाळीत बदल, रक्तस्राव किंवा लघवीशी संबंधित तक्रारी असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. वेदना खूप वाढेपर्यंत थांबण्याची गरज नाही. सुरुवातीला तपासणी करून घेतल्यास कारण लवकर समजू शकते.

Women Cancer Symptoms
Ghee Vs Coconut Oil: तूप की नारळाचे तेल, शरीरासाठी काय अधिक फायदेशीर? जाणून घ्या

योनीमार्गातील स्राव आणि बाह्य भागातील बदलही महत्त्वाचे

योनीमार्गातून असामान्य किंवा सतत स्राव होत असेल, त्यामध्ये रक्त दिसत असेल किंवा दुर्गंधी येत असेल, तर त्याची तपासणी करून घ्यावी. तसेच बाह्य जननेंद्रियाच्या भागात सतत खाज येणे, त्वचेच्या रंगात बदल होणे, जखम किंवा व्रण होणे, सिस्ट होणे किंवा झालेली जखम बरी न होणे यांसारखे बदल दिसत असतील तर तेही दुर्लक्षित करू नयेत.

वजन कमी होणे, थकवा आणि लघवी-शौचातील बदलांकडेही लक्ष द्या

कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होत असेल, सतत थकवा जाणवत असेल किंवा लघवी आणि शौचाच्या सवयींमध्ये बदल झाला असेल, तर त्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. विशेषतः ही लक्षणे इतर तक्रारींसोबत दिसत असतील तर डॉक्टरांशी चर्चा करावी.

Women Cancer Symptoms
Ghee With Warm Water: सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात एक चमचा तूप घ्या; शरीराला मिळतील हे 6 मोठे फायदे

प्रत्येक लक्षण म्हणजे कर्करोग नाही

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, वरीलपैकी प्रत्येक लक्षण म्हणजे कर्करोग असं नाही. अनेक वेळा या तक्रारींमागे साधी किंवा कर्करोगाशी संबंधित नसलेली कारणे असू शकतात. त्यामुळे अशी लक्षणे दिसली म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र ती सतत होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणेही योग्य नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com