Health Tips : लाल मिरचीऐवजी हिरवी मिरची खाणे अधिक फायदेशीर? जाणून घ्या, हिरव्या मिरचीचे आरोग्यदायी फायदे

Green chillies health benefits : भारतीय स्वयंपाकघरात चवीसाठी वापरली जाणारी लाल मिरची प्रक्रियेतून गेलेली असते, तर ताजी हिरवी मिरची आरोग्यासाठी अधिक गुणकारी मानली जाते.
IS GREEN CHILLI BETTER THAN RED CHILLI?
IS GREEN CHILLI BETTER THAN RED CHILLI?saam tv
Published On: 

भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये तिखट पदार्थांना विशेष महत्त्व आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी अनेकजण लाल मिरचीचा वापर करतात, तर काहींना हिरवी मिरची आवडते. मात्र, हिरवी मिरची केवळ पदार्थांची चव वाढवत नाही, तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते. डॉक्टरांनी हिरवी मिरची खाण्याचे काही महत्त्वाचे फायदे सांगितले आहेत. त्यांच्या मते, मर्यादित प्रमाणात हिरव्या मिरचीचा आहारात समावेश केल्यास शरीराला अनेक पोषक घटक मिळू शकतात.

हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर

लाइव्ह हिंदूस्तानने दिलेल्या वृत्तानुसार आणि डॉक्टरांच्या मते, हिरवी मिरची ही व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. शरीरात कोलेजन तयार होण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासही मदत करते. याशिवाय शरीरात लोहाचे शोषण होण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक असते. त्यामुळे डाळी आणि भाज्यांसोबत हिरवी मिरची खाल्ल्यास वनस्पतीजन्य पदार्थांमधील लोहाचे शोषण होण्यास मदत मिळू शकते.

IS GREEN CHILLI BETTER THAN RED CHILLI?
Kitchen Hacks : काळाकुट्ट तवा होईल चकाचक! मीठ, लिंबू अन् बेकिंग सोड्याची ही ट्रिक एकदा वापरून पाहाच

कॅप्साइसिनमुळे वाढू शकतो ऊर्जेचा वापर

हिरव्या मिरचीमध्ये 'कॅप्साइसिन' नावाचे एक महत्त्वाचे संयुग असते. यामुळेच मिरचीला तिखट चव येते. हे संयुग शरीरातील TRPV1 रिसेप्टर्स सक्रिय करते. हे रिसेप्टर्स उष्णता आणि वेदनांचे संकेत ओळखण्याचे काम करतात. या प्रक्रियेमुळे शरीरातील ऊर्जेचा वापर काही प्रमाणात वाढू शकतो. मात्र, केवळ हिरवी मिरची खाल्ल्याने वजन कमी होते, असा त्याचा अर्थ नाही.

डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर

हिरव्या मिरचीमध्ये बीटा-कॅरोटीनसारखे कॅरोटिनॉइड्स आढळतात. बीटा-कॅरोटीनचे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर होऊ शकते. व्हिटॅमिन ए डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. विशेषतः कमी प्रकाशात पाहण्याच्या क्षमतेसाठी व्हिटॅमिन ए उपयुक्त ठरते.

IS GREEN CHILLI BETTER THAN RED CHILLI?
Women Health : गर्भवती महिलांमध्ये प्रिमॅच्योर प्रसूतीचा धोका का वाढतोय? कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या

जास्त हिरवी मिरची खाणे टाळा

हिरवी मिरची आरोग्यासाठी फायदेशीर असली, तरी तिचे अतिसेवन करणे टाळले पाहिजे. विशेषतः ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे किंवा ज्यांना अॅसिड रिफ्लक्सचा त्रास आहे, त्यांनी हिरवी मिरची खाताना काळजी घ्यावी. जास्त प्रमाणात हिरवी मिरची खाल्ल्याने अॅसिडिटी, छातीत जळजळ आणि पोटात आग होणे किंवा जळजळ जाणवणे अशा समस्या उद्भवू शकतात.

लाल मिरचीऐवजी हिरव्या मिरचीचा वापर करा

रोजच्या आहारात तिखटपणा आणण्यासाठी लाल मिरची पावडरऐवजी हिरव्या मिरचीचा वापर करता येऊ शकतो. भाजी, डाळ, चटणी आणि सॅलडमध्ये हिरवी मिरची सहज समाविष्ट करता येते. मात्र, तिचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे.

हिरवी मिरची ही व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि कॅप्साइसिन यांसारख्या घटकांचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात तिचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, पचनाशी संबंधित तक्रारी असल्यास मिरचीचे सेवन जपून करावे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. ही माहिती कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणतीही आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.