Uttar Movie: आई-मुलाच्या नात्याची आजच्या काळातील कथा; अभिनय बेर्डेचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Renuka Shahane New Movie: क्षितिज पटवर्धनच्या दिग्दर्शकीय पदार्पणातून साकार झालेला ‘उत्तर’ चित्रपट आई-मुलाच्या भावनिक नात्याची आजच्या काळातील गोष्ट सांगतो. रेणुका शहाणे आणि अभिनय बेर्डे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Zee Studios latest movie
Uttar movie teasersaam tv
Published On

प्रत्येक माणसाचं जन्माच्या आधीपासूनही जे नातं जुळतं ते आपल्या आईशी! जन्मानंतर रूढार्थानं त्याची- आईची नाळ कापली जाते पण तरी ती नाळ आयुष्यभर जोडलीच राहते. जननी, गुरू, अन्नदात्री, सखी, प्रेरणास्रोत अशा विविध भूमिका ती आपल्या मुलांच्या आयुष्यात निभावत राहते. या कित्येक भूमिका बजावत ती लेकराबरोबर प्रत्यक्ष साथ करत राहते…. तर कधी सावली होऊन त्याच्या सतत मागे असते. कारण आपल्या लेकराचं भलं कशात हे फक्त आईलाच माहीत असतं! अशीच आई- मुलाच्या नात्याची आजच्या परिभाषेतली संवेदनशील गोष्ट सांगणाऱ्या उत्तर या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

झी स्टुडिओज आणि जॅकपॉट एंटरटेनमेंट ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाद्वारे सुप्रसिद्ध लेखक क्षितिज पटवर्धन दिग्दर्शकीय पदार्पण करतोय हे विशेष. ‘उत्तर ‘ या अत्यंत संवेदनशील विषयावरील चित्रपटात गुणी आणि चोखंदळ अभिनेत्री रेणुका शहाणे आईच्या भूमिकेत आहे तर अभिनय बेर्डे मुलाच्या भूमिकेत आहे. ऋता दुर्गुळेची सुद्धा यात महत्त्वाची भूमिका आहे. प्रत्येक घराची, नि घरातल्या प्रत्येक मुलांची, तरीही आई- मुलाच्या लडिवाळ नात्याची ही आगळीवेगळी गोष्ट नेमकी आहे तरी काय, याचं ‘उत्तर’ रसिकांना येत्या १२ डिसेंबरला रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Zee Studios latest movie
Famous Singer Concert: मुंबईत प्रसिद्ध गायकाच्या कॉन्सर्टमध्ये चोरट्यांचा डल्ला, २३ लाखांचे मोबाईल लंपास

तंत्रज्ञानाच्या या युगात संवादाची साधने जरी वाढली असली तरी माणसांचा आपआपसांतील संवाद कमी होत चालल्याची चिंता आपण अनेकदा व्यक्त करतो. 'उत्तर'च्या टिझरमध्येही अशाच प्रकारचा आई मुलामधला संवाद बघायला मिळतोय. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलासोबत आईचा फोनवरील खुमासदार संवाद यात ऐकायला मिळतो. ज्यात आईच्या काळजीच्या प्रश्नांना कंटाळलेला मुलगा फोन ठेवू का ? असं विचारतो त्यावर "इनकमिंगला पैसे पडल्यासारखा बोलतोस" अशी आईची प्रतिक्रिया पण दिसते. थोडक्यात, फास्ट फुड, फास्ट वाय फाय, सगळं काही इन्स्टंट, रेडिमेड हवं, असा विचार करणाऱ्या आजच्या पिढीला थोडा ठहराव देणाऱ्या आईची ही गोष्ट असावी , असा अंदाज टिझरवरून येत आहे.

झी स्टुडिओजसोबत आजवर 'डबलसीट', 'फास्टर फेणे', 'धुरळा' सारख्या सुपरहिट चित्रपटांचं लेखन करणाऱ्या शिवाय हिंदीमध्येही 'सिंघम २' सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचं आणि 'ताली'सारख्या संवदेनशील वेबसिरीजचं लेखन करणाऱ्या क्षितिज पटवर्धनने या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली असून या चित्रपटाद्वारे तो दिग्दर्शनात पदार्पण करतोय हे विशेष. उत्तर बद्दल बोलताना तो म्हणाला की, " 'आई' हे सगळ्यात गृहीत धरलेलं, त्यामुळेच जवळचं असूनही दुर्लक्ष होणारं नातं आहे. तिचा फक्त 'व्यक्ती' म्हणून विचार करणारी आणि 'आई आणि मूल' या नात्याचा नव्याने विचार करायला लावणारी कलाकृती करायची, यातून 'उत्तर' हा सिनेमा जन्माला आला."

तर झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणाले की ," उत्तर चित्रपटाची गोष्ट क्षितिजने ऐकवली तेव्हाच त्या विषयाची ताकद आमच्या लक्षात आली होती. आई आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणारी, ही आजच्या पिढीची गोष्ट प्रत्येक प्रेक्षकाला भावणारी आहे. हा चित्रपट मराठी भाषेतला असला तरी यातील भावना ही वैश्विक आहे आणि ती प्रत्येकाला आपलीशी वाटावी अशीच आहे."

झी स्टुडिओजचे उमेशकुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर व जॅकपॉट एंटरटेनमेंटचे मयूर हरदास आणि संपदा वाघ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या १२ डिसेंबरला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Zee Studios latest movie
Bigg Boss 19 : प्रणित मोरेनंतर कोण जाणार घराबाहेर? ५ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com