टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार
अभिनेत्याचा थोडक्यात वाचला जीव
टीमने शेअर केलेल्या व्हिडीओत अभिनेत्याच्या हातावर जखमांच्या खुणा दिसत आहेत.
टायगर श्रॉफच्या गाडीवर १८ ऑक्टोबरला झालेल्या गोळीबारामुळे बॉलिवूडमध्ये सध्या तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता हल्ल्यानंतर काही दिवसांनी टायगर श्रॉफच्या टीमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हल्ल्यानंतर टायगर श्रॉफची प्रकृतीचे अपडेट पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ इंटरनंटवर तुफान व्हायरल होत आहे. टायगर श्रॉफची सुरक्षितता आणखी वाढवण्यात आली आहे.
व्हिडीओमध्ये टायगर श्रॉफच्या हातावर दारूगोळ्यामुळे (गनपावडर) झालेले जळल्याचे व्रण दिसत आहेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, "देव दयाळू आहे..." (God is Kind) टायगरच्या हातावर लहान, लाल ठिपक्यांसारखे व्रण दिसून येतात. घडलेल्या गोळीबारात टायगर श्रॉफचा जीव थोडक्यात वाचला आहे. व्हिडीओ पाहून टायगरचे चाहते चिंतेत पडले आहेत.
टायगरचा हल्ला झाल्यानंतर त्याचा पहिला फोटो समोर आला. फोटोमध्ये टायगरच्या हाताला आणि छातीला पट्ट्या बांधलेल्या दिसत आहेत. मात्र अवघ्या दोन दिवसांतच त्याच्या त्वचेवर कोणतेही व्रण नसलेले फोटो समोर आल्यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली होती. लोकांनी त्याला ट्रोल केले. शर्टलेस फोटोमध्ये त्याच्या शरीरावर कोणतीही खूण दिसत नव्हती. गोळीबारानंतरही त्याच्या शरीरावर कोणतीही खूण कशी नाही, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. यावर सडेतोड उत्तर म्हणून टायगर श्रॉफच्या टीमने हा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्याच्या टीमने डिजिटल प्लॅटफॉर्मवर पसरणाऱ्या चुकीच्या माहिती, बनावट कथानके यांवर आपले स्पष्ट मत मांडले आहे.
१८ ऑक्टोबरला दोन मोटारसायकलवरून आलेल्या तीन व्यक्तींनी श्रॉफच्या कारवर गोळीबार केला. या घटनेत अभिनेता सुखरूप बचावला, परंतु त्याचा चालक जखमी झाला. राजस्थानमधील कोटा पोलिसांनी तीन हल्लेखोरांना अटक केली. ज्यापैकी दोन हरियाणाचे आणि एक बिहारचा रहिवासी आहे आणि नंतर त्यांना पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. लॉरेन्स बिश्नोई टोळीने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली. अमेरिकेतून कारवाया करणारा गँगस्टर अनिल पंडित हा या प्रकरणातील एक मुख्य संशयित म्हणून समोर आला आहे.