साऊथचा सुपरस्टार थलापथी विजयच्या (Thalapati Vijay) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २०२३ मध्ये थलापती विजयच्या 'लिओ' चित्रपटाने बॉक्स ऑफिससह जगभरामध्ये धुमाकूळ घालत दमदार कमाई केली. त्याच्या या चित्रपटाला चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळाली. आता थलापती विजय २०२४ या वर्षामध्ये नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थलापती ६८ ची (Thalapathy 68) सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. निर्मात्यांनी २०२३च्या अखेरीस थलापती ६८ ची फर्स्ट झलक दाखवली. जे पाहून विजय थलापतीचे चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. या चित्रपटामध्ये थलापती विजयचा डबल रोल पाहायला मिळणार आहे.
निर्मात्यांनी ३१ डिसेंबरला 'थलापती ६८'चा फर्स्ट लूक शेअर केला. फर्स्ट लूकसोबत निर्मात्यांनी या चित्रपटाच्या नावाची देखील घोषणा केली आहे. ' द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' (The Greatest Of All Time) असं या चित्रपटाचे नाव आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये दोन थलापथी विजय दिसत आहेत. दोघेही युनिफॉर्ममध्ये दिसत आहे. एका लूकमध्ये थलापथी विजय म्हातारा दिसत आहे तर दुसऱ्या लुकमध्ये तो तरुण दिसत आहे.
'द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम' या चित्रपटाचे दिग्दर्शन व्यंकट प्रभू यांनी केले आहे. त्यांचा आणि थलापथी विजयचा हा पहिलाच चित्रपट आहे. थलापथी विजय व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये मीनाक्षी चौधरी, योगी बाबू, जयराम, लैला, प्रभुदेवा, माइक मोहन आणि प्रशांत हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत.
चित्रपटाचा फर्स्ट लूक पाहून थलापती विजयचे चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका चाहत्याने लिहिले की, 'हे वर्ष 2004 चे परफेक्ट ट्रीट आहे.' तर आणखी एका चाहत्याने लिहिले की,'आता सर्व रेकॉर्ड तोडण्याची वेळ आली आहे' तर आणखी एकाने, 'आम्ही सर्व तयार आहोत. आतुरतेने वाट पाहतोय.', अशी कमेंट्स केली आहे.
थलापती विजयच्या या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्याचे चाहते या चित्रपटाच्या प्रत्येक अपडेट्ससाठी आतुर असतात. हा चित्रपट टाईम ट्रॅव्हलवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटामध्ये थलापथी विजय १९ वर्षांच्या मुलाची एक भूमिका साकारणार असून दुसरी भूमिका वृद्ध व्यक्तीची असेल. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये थलापथी विजय त्याच्या शरीराच्या 3D स्कॅनसाठी लॉस एंजेलिसला गेला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.