
Shiv Chhatrapati Movie Set In Satara: सातारा जिल्ह्यातील संगम माहुली येथे रितेश देशमुखच्या "राजा शिवाजी" या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरु असताना एक हृदयद्रावक घटना घडली. चित्रपटाच्या सेटवरील एका डान्सर कलाकाराचा कृष्णा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे चित्रपट युनिटमध्ये आणि स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात रितेश देशमुख मुख्य भूमिका साकारत असून शूटिंगदरम्यानच ही घटना घडली आहे.
ही घटना मंगळवारी दुपारी घडली असून, शूटिंग संपल्यानंतर काही कलाकार नदीलगत गेले होते. त्यावेळी डान्सर पाण्यात उतरला असता अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. त्याच्या इतर सहकाऱ्यांनी आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली, परंतु तोपर्यंत तो पाण्यात पूर्णपणे बुडाला होता. काही वेळातच या घटनेची माहिती पोलिस व आपत्ती व्यवस्थापन पथकाला देण्यात आली.
घटनेनंतर अभिनेता रितेश देशमुख स्वतः काही काळ नदीकाठी उपस्थित होता. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण टीम खूपच हादरलेली आहे. स्थानिक प्रशासन व बचाव पथकांनी तातडीने शोध मोहिम सुरु केली, मात्र अंधार पडू लागल्यामुळे रात्री उशिरा ही शोध मोहीम थांबवावी लागली. बुधवारी सकाळपासून पुन्हा शोध कार्य सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
या घटनेमुळे चित्रपटसृष्टीत दुःखाचं वातावरण आहे. स्थानिक पोलीस तपास करत असून, प्रशासनाने सर्व शूटिंग थांबवून परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मृत डान्सरच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना आवश्यक मदत करण्यात येणार आहे. "राजा शिवाजी" हा ऐतिहासिक चित्रपट असून त्याचे चित्रिकरण सातार्यात सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.