Raja Shivaji: अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखने त्याच्या आगामी ऐतिहासिक चित्रपट 'राजा शिवाजी' ची अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत असून, दिग्दर्शनाची धुरा देखील त्याने सांभाळली आहे. चित्रपटाचा मोशन पोस्टर २१ मे २०२५ रोजी प्रदर्शित करण्यात आला आणि चित्रपट १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
'राजा शिवाजी' हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा संपूर्ण भारतात पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. चित्रपटाची निर्मिती जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी यांनी केला आहे.
या चित्रपटात रितेश देशमुखसोबत संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जेनेलिया देशमुख यांचा समावेश आहे. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अजय-अतुल या प्रसिद्ध संगीतकार जोडीने घेतली आहे, तर छायाचित्रण संतोष सिवन यांनी केले आहे.
'राजा शिवाजी' हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून, त्यांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी प्रवासाचे चित्रण करतो. रितेश देशमुखने या चित्रपटाला 'मनापासून केलेला प्रयत्न' असे संबोधले असून, हा चित्रपट प्रेक्षकांना इतिहासाची नव्याने ओळख करून देईल अशी आशा व्यक्त केली आहे.