'रामायण: पार्ट १' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी सुरूच
रणबीर कपूर आणि यश यांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
'रामायण' लवकच ओलांडणार ८०० कोटींचा टप्पा
'रामायण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. दुसऱ्या आठवड्यातही, भगवान रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी आणि रावणाच्या भूमिकेत यश असलेला हा पौराणिक महाकाव्यपटाने देशभरातील चित्रपटगृह हाउसफुल केले आहेत. 'रामायण' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने सर्वात जास्त कलेक्शन केले आहे. चित्रपट रिलीज होऊन आता १२ दिवस पूर्ण झाले आहे. रणबीर कपूरच्या कारकिर्दीतील हा (रामायण) सुपरहिट चित्रपट ५ नोव्हेंबर २०२६ ला रिलीज झाला आहे.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार 'रामायण'ने १२ व्या दिवशी भारतात २२,३६५ शोजच्या माध्यमातून ३२ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. यात हिंदी आवृत्तीचा वाटा २३.७५ कोटी रुपये इतका आहे. त्यानंतर मल्याळम आवृत्तीने १,०६१ शोजमधून २.८५ कोटी रुपये, तर कन्नड आवृत्तीने ८९२ शोजमधून २ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तमिळ आवृत्तीने १,१५८ शोजमधून १.९० कोटी रुपये आणि तेलुगू आवृत्तीने १,५१२ शोजमधून १.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.'रामायण'ची भारतातील एकूण नेट कमाई आता ७९२.६० कोटी रुपयांवर पोहोचली आहे तर जगभरात ₹1,437.25 कोटींचा व्यवसाय चित्रपटाने केला आहे.
नितीश तिवारी दिग्दर्शित 'रामायण: भाग १' ('रामायण: राईज ऑफ अ लेजेंड') चे लेखन नितीश तिवारी आणि श्रीधर राघवन यांनी केले आहे. चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रा आणि यश यांनी केली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्यासोबत रवी दुबे, आदिनाथ कोठारे, लारा दत्ता, विवेक ओबेराय, रकुल प्रीत सिंग, इंदिरा कृष्णन आणि अरुण गोविल यांसारखे मोठे कलाकार झळकले आहेत. 'रामायण' चित्रपट वाल्मीकी रामायणावर आधारित आहे.या चित्रपटाचा पुढचा भाग, ज्यामध्ये सनी देओल भगवान हनुमानाची भूमिका साकारणार आहेत, तो २०२८ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
'रामायण' चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रामायण: राईज ऑफ अ लेजेंड' चित्रपट जिओहॉटस्टार (JioHotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. तसेच त्यांनी सांगितले की, चित्रपटगृहांमधील प्रदर्शनाचा कालावधी संपल्यानंतर, प्रेक्षक 'जिओहॉटस्टार'वर 'रामायण' चित्रपट स्वतंत्रपणे पैसे देऊन पाहू शकतील. हे पाहण्यासाठी त्यांना नेहमीच्या ओटीटी सबस्क्रिप्शनची गरज भासणार नाही. या 'पे-पर-व्ह्यू' मॉडेलमुळे प्लॅटफॉर्मला थेट प्रेक्षकांच्या खरेदीतून महसूल मिळण्यास मदत होऊ शकते. मात्र अद्याप रिलीज डेटबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.