Ramayana Movie Collection: 'रामायण'ची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात! पहिल्याच दिवशी छफरफाड कमाई, 'या' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला

Ramayana Movie Collection: रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात ६४.८५ कोटींची कमाई केली. मात्र, प्रभासच्या आदिपुरुषचा विक्रम मोडण्यात अपयश आले.
Ramayana Movie Collection
Ramayana Movie CollectionSaam Tv
Published On: 

रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित 'रामायण' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. अखेर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली असून, पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई केली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या भव्य पौराणिक चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी भारतात ६४.८५ कोटी रुपयांची कमाई करुन भव्य सुरुवात केली.

पहिल्याच दिवशी ६४.८५ कोटींची कमाई

बॉक्स ऑफिसची आकडेवारी देणाऱ्या 'सॅकनिल्क'च्या (Sacnilk) अहवालानुसार, 'रामायण'ने पहिल्या दिवशी भारतात ६४.८५ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. तर सर्व भाषांमधील एकूण ग्रॉस कमाई ७७.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चित्रपटाचे देशभरात जवळपास २५,२०० शो लावण्यात आले होते. यामध्ये हिंदी व्हर्जनला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. हिंदी व्हर्जनने २०,६७८ शोमधून ४७.५० कोटी रुपये कमावले. तर कन्नड व्हर्जनने ७.२५ कोटी, तेलुगूने ६ कोटी, तमिळने २.६० कोटी आणि मल्याळम व्हर्जनने १.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आकडेवारीवरून हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची क्रेझ अधिक असल्याचे दिसून येते.

आदिपुरुषचा रेकॉर्ड नाही मोडला

पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत 'रामायण'ने अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकले आहे. २०२६ मधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणाऱ्या चित्रपटांच्या यादीत 'धुरंधर: द रिव्हेंज'नंतर 'रामायण' दुसऱ्या क्रमांकावर आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज'ने पहिल्या दिवशी १०२.५५ कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र, प्रभासच्या 'आदिपुरुष'ने पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये ८६.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे 'रामायण'ला हा रेकॉर्ड मोडण्यासाठी आणखी मोठी झेप घेण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, 'रामायण'ने 'पठाण' आणि 'ॲनिमल'सारख्या चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या कमाईलाही मागे टाकले आहे.

वीकेंडमध्ये कमाई वाढणार की घटणार?

भारतात दमदार सुरुवात केल्यानंतर आता चित्रपटाच्या परदेशातील कमाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरुवातीच्या अंदाजानुसार, परदेशात २० ते ४० कोटी रुपयांची कमाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, अधिकृत आकडेवारी समोर आल्यानंतरच जागतिक कमाई किती झाली ते कळेल. दिवाळीच्या सणामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा फायदा होऊ शकतो. मात्र, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळच्या शोवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतील कमाई चित्रपटासाठी महत्त्वाची ठरेल.

४ हजार कोटींचे भव्य बजेट

'रामायण' हा दोन भागांमध्ये प्रदर्शित होणारा भव्य चित्रपट आहे. दोन्ही भागांचे एकत्रित बजेट जवळपास ४ हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. रणबीर कपूर प्रभू श्रीराम, साई पल्लवी माता सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसत आहेत. याशिवाय सनी देओल हनुमान, तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे. चित्रपटाला ए. आर. रहमान आणि हॉलिवूडचे संगीतकार हॅन्स झिमर यांनी संगीत दिले आहे. चित्रपटाचा दुसरा भाग २०२८ च्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.