Prasad Oak: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुआयामी कलाकार प्रसाद ओकने आपल्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. आपल्या मेहनतीच्या, सातत्यपूर्ण कामगिरीच्या आणि वैविध्यपूर्ण अभिनयाच्या जोरावर त्याने नुकताच आपला शंभरावा चित्रपट पूर्ण केला. "अष्ट रूपा वैभवी लक्ष्मी माता" या पहिल्या चित्रपटापासून ते सध्याच्या "वडापाव" या शतकी चित्रपटापर्यंतचा प्रवास हा त्याच्यासाठी अत्यंत खडतर, पण तेवढाच शिकवणारा आणि प्रेरणादायी ठरला आहे.
प्रसाद ओकने फक्त अभिनेता म्हणूनच नव्हे तर दिग्दर्शक, निर्माता, लेखक, गीतकार अशा विविध भूमिकांमधून मराठी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. टेलिव्हिजन, रंगभूमी आणि सिनेसृष्टी या तिन्ही माध्यमांत त्याने आपली छाप सोडली असून प्रेक्षकांचा अपार पाठिंबा मिळवला. लोकप्रिय मालिका, सुपरहिट चित्रपट आणि दर्जेदार नाट्यकृती यामुळे तो आज घराघरात पोहोचला आहे.
या विशेष प्रवासाबद्दल बोलताना प्रसाद ओक म्हणतो, "शंभर चित्रपटांचा टप्पा गाठणं माझ्यासाठी अतिशय रोमांचक आहे. या प्रवासात मला अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. अशोक सराफ, विक्रम गोखले, मोहन जोशी यांच्यासोबतचे अनुभव हे अमूल्य ठरले. मोहन जोशींनी एकदा मला सांगितलं होतं की अभिनेता किती बहुआयामी आहे हे तेव्हा दिसतं जेव्हा निर्माता आणि दिग्दर्शक त्याला पुन्हा पुन्हा काम देतात. त्या शब्दांनी मला खूप प्रेरणा दिली आणि आज या प्रवासाचा आढावा घेताना मला समाधान वाटतं की अनेकांनी मला पुन्हा कामाची संधी दिली.”
प्रसाद ओक याच्या कारकिर्दीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सतत नवीन प्रयोग करण्याची तयारी. गंभीर भूमिका असो वा हलकीफुलकी कॉमेडी, गेस्ट अपीयरन्स असो वा व्हिलनचा सशक्त अभिनय त्याने प्रत्येक वेगळ्या भूमिकेला न्याय दिला. त्यामुळेच रसिक प्रेक्षकांनी त्याच्यावर कायम प्रेमाचा वर्षाव केला.
शतकी टप्पा गाठूनही प्रसाद ओकचा प्रवास येथेच थांबणारा नाही. आगामी काळात तो प्रेक्षकांसाठी नवे आणि उत्कंठावर्धक प्रोजेक्ट्स घेऊन येणार असल्याचीही त्याने यावेळी सांगितले. प्रसाद ओकच्या शतकी प्रवासाचे खरे शिल्पकार म्हणजे रसिक प्रेक्षक असे तो स्वतः मान्य करतो. त्यांच्या प्रेम आणि पाठिंब्यामुळेच आज तो या स्थानापर्यंत पोहोचला आहे, आणि आपल्या 100 व्या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले.