
‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘फू बाई फू’ अशा अनेक वेगवेगळ्या कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या भाऊ कदमचा आज वाढदिवस आहे. कॉमेडीवीर भाऊ कदमने आपल्या कॉमेडीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केले आहे. साधी भाऊची स्टेजवर जरी एन्ट्री झाली तरीही चाहत्यांच्या चेहऱ्यावर आपसुकच हसू येतं.
भाऊने आजवर अनेक मालिका, नाटक आणि चित्रपटात काम केले आहे. आज भाऊ घराघरात पोहोचला असला तरी त्यांचं स्ट्रगल खूप मोठं आहे. कायमच कॉमेडीमुळे चर्चेत राहणाऱ्या भाऊच्या वाईट काळामध्ये त्याला त्याच्या परिवाराने खूप मोठी साथ दिली आहे. आज अभिनेता भाऊ कदमच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया...
विनोदाचा बादशहा म्हणून सर्वत्र फेमस असलेल्या भाऊला त्याच्या खासगी आयुष्यात फारच घाव सोसावे लागले होते. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे भाऊला फारच वाईट दिवसांचा सामना करावा लागला होता.
एका पुरस्कार सोहळ्यासाठी त्याला दुबईला जायचं होतं, पण हातात पैसे नव्हते. त्यावेळचा किस्सा त्याने शेअर केला होता. “एका पुरस्कार सोहळ्यासाठी मला दुबईला जायचं होतं आणि त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. दुबईला जायचं म्हणून माझा पासपोर्ट किंवा इतर सर्व खर्च दिग्दर्शक आणि अभिनेते महेश मांजरेकर करणार होते. मला फक्त जायचं होते. पण तरी सुद्धा मी माझ्या मित्रांकडून पैसे मागितले होते. माझ्या मित्रांना म्हणालो, मला ५ किंवा किमान १-२ हजार रूपये तरी द्या...” असं अभिनेता आपला मुलाखतीत म्हणाला.
पुढे आपल्या मुलाखतीत भाऊ कदम सांगतो, “पण, त्यांचे पैसे मी पैसे परत करेन, याचा त्यांना विश्वास नव्हता. पण मी त्यांचे काहीही करून परत देणारच होतो. पण कुणीही मला पैसे दिले नाही. शेवटी माझ्या मदतीला माझे घरातील लोकंच धावून आले. घरच्यांनी मला काही पैसे दिले आणि म्हणाले हे घे, हे ठेव. त्यावर मी विचारलं की हे पैसे कुठून आले. तर ते म्हणाले की अंगठी विकली. आणि, वरुन म्हणाले यातून काहीही पैसे परत आणू नका. तुम्ही वापरा. पण हे पैसे खर्च करायची माझी डेरिंगच झाली नाही. फक्त मुलांसाठी काही गोष्टी घेऊन आलो.”
भाऊने आपल्या सुरूवातीच्या काळात अनेक वाईट दिवसांचा सामना केला होता. पण त्याच्या उत्कृष्ट विनोदामुळे आणि अचूक विनोदाच्या पंचिंगमुळे तो इतक्या उंचीवर गेला की त्याला कशाचीही कमी नाही. त्याचा चाहतावर्ग मोठा आहेच, पण चाहत्यांनी दिलेल्या प्रेमामुळे तो आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहे.