Vaalvi Completed 50 Days: मराठी चित्रपटांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड केली आहे. जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वाळवी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ‘पठान’ चित्रपटासमोर न डगमगता यशस्वी कामगिरी केली आहे. झी स्टुडिओजने आपल्या लाडक्या प्रेक्षकांना ‘वाळवी’ चित्रपटाने ५० दिवस पुर्ण झाल्याबद्दल खास भेट दिली आहे.
दिग्दर्शक परेश मोकाशी आणि झी स्टुडिओज यांनी एकत्र येत केलेली कलाकृती ही नेहमीच अनोखी असते. ‘वाळवी’च्या माध्यमातून हटके विषय देत प्रेक्षकांना त्यांनी थ्रिलकॉमची मेजवानी दिली होती. झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित, परेश मोकाशी यांची कथा, पटकथा आणि संवाद लाभलेल्या ‘वाळवी’ या चित्रपटाने सिनेमागृहात यशस्वी अर्धशतक साजरे केले आहे. स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.
नुकतंच निर्मात्यांनी ‘वाळवी’च्या ५० दिवसांची पोस्ट शेयर केलीय. प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रेमामुळे #Thrillcom ‘वाळवी’चे ५० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने वाळवी प्रेक्षकांना ९९ रुपयात पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी आठवडाभर ऑफर असणार आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना ‘वाळवी’ थिएटरमध्ये पाहायचा असेल त्यांच्यासाठी ही खास पर्वणी म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
‘वाळवी’च्या यशस्वी वाटचालीबद्दल झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, " ‘वाळवी’ ओटीटीवर प्रदर्शित होऊनही प्रेक्षक हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहात आहेत. मुळात मराठी प्रेक्षक हा आपल्या मातृभाषेसाठी चोखंदळ आहे. त्यामुळे चांगल्या विषयांना, कथानकाला ते भरभरून दाद देतात. अनेक चित्रपट स्पर्धेत असतानाही वाळवीने आपले स्थान कायम ठेवले आहे. या सगळ्यासाठी सर्व प्रेक्षक, मराठी सिनेसृष्टी आणि सहकार्य केलेल्या सर्व चित्रपटगृहांचे मनापासून आभार. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळेच आम्ही शतकाच्या दिशेनेही वाटचाल करू."
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केल्यामुळे निर्मात्यांनी चित्रपटाच्या सिक्वेललाही मंजुरी दिली आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘वाळवी २’ येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.