Jabrata Marathi Movie: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेमधून घराघरांत पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे ही जोडी आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. मालिकेनंतर ही जोडी पुन्हा कधी एकत्र दिसणार, याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये होती. अखेर ही प्रतीक्षा संपत असून, ‘जब्राट’ या आगामी मराठी चित्रपटातून आयुष–अनुष्काची लव्हेबल जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
तारा करमणूक निर्मित आणि प्रगती कोळगे दिग्दर्शित ‘जब्राट’ या चित्रपटात आयुष संजीव प्रिन्स, तर अनुष्का सरकटे निशा या प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. कॉलेज विश्वाच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही कथा प्रेम, मैत्री, संगीत आणि नृत्य यांचा सुंदर मिलाफ घडवणारी आहे. नुकतेच या चित्रपटाचे शानदार पोस्टर प्रदर्शित झाले असून, त्यासोबतच ‘तू आणि मी’ हे रोमँटिक गाणेही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
‘लव्ह, म्युझिक, मस्ती आणि डान्स’ असा जबरदस्त मनोरंजनाचा मसाला असलेला ‘जब्राट’ हा संगीतमय चित्रपट कॉलेज जीवनातील वेगळ्या, पण तितक्याच भावस्पर्शी गोष्टी मांडणार आहे. तरुणाईची स्वप्ने, नाती, मैत्री आणि प्रेमातील चढ-उतार यांचा हलकाफुलका, तरीही भावनिक प्रवास या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
मुख्य जोडीसोबतच या चित्रपटात वनिता खरात, श्रेया शंकर, राहुल चव्हाण, पुण्यकर उपाध्याय, आयली घिया, हिंदवी पाटील, मंदार मोकाशी, डॉ. ऋषभ गायकवाड, सोहम कांबळे, विक्रम आल्हाट, प्रगती कोळगे यांसारखे कलाकार दिसणार आहेत. तसेच संजय मोने, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर आणि गणेश यादव ही ज्येष्ठ कलाकार मंडळीही महत्त्वाच्या भूमिकांत झळकणार आहेत.
चित्रपटाचे निर्माते अनिल अरोड़ा, गोविंद मोदी आणि प्रगती कोळगे आहेत. छायांकनाची जबाबदारी अनिकेत खंडागळे यांनी सांभाळली असून, नृत्यदिग्दर्शन आशिष पाटील यांचे आहे. संगीताची धुरा डॉ. जयभीम शिंदे यांनी सांभाळली असून, बेला शेंडे, आर्या आंबेकर, वैशाली माडे यांसह अनेक नामवंत गायक-गायिकांनी गाण्यांना आवाज दिला आहे. नवीन वर्षात येत्या ६ फेब्रुवारीला ‘जब्राट’ हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, आयुष–अनुष्काच्या चाहत्यांसाठी ही एक मोठी मेजवानी ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.