Baipan Bhaari Deva Film Total Budget: गेल्या वर्षापासून मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत, असे बोलले तरी वावगे ठरणार नाही. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या अनेक मराठी चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.
दमदार कमाईच्या यादीत आपण ‘वेड’, ‘धर्मवीर’, ‘पावनखिंड’, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटांची प्रेक्षकवर्ग आवर्जुन नावं घेतात. आजही मराठीतील सर्वाधिक कमाईचा रेकॉर्ड सैराटच्या नावावरच कायम आहे. दरम्यान या यादीमध्ये लवकरच आणखी एका चित्रपटाचं नाव घेतलं जाणार आहे. तो म्हणजे, केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’. अवघ्या काही कोटींमध्ये निर्मित झालेल्या या चित्रपटाने खूप कमी दिवसात कोट्यावधींचा पल्ला गाठलाय. चला तर जाणून घेऊया, चित्रपटाच्या बजेटविषयी...
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ची सध्या बॉक्स ऑफिसवर कमालीची चर्चा सुरू आहे. अवघ्या काही दिवसातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. २०२३ या वर्षात प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद देणारा हा दुसरा चित्रपट ठरला आहे. सध्या या चित्रपटाच्या बजेटची चर्चा सुरू आहे. महिला वर्गाकडून या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंतची चित्रपटाची एकूण कमाई ३४ कोटींच्या आसपास आहे.
बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळत असलेल्या चित्रपटाबद्दल सध्या रोज नवनवीन विविध किस्से समोर येत आहेत. नुकतंच चित्रपटाचे बजेट किती होते, याचा आकडा समोर आला आहे. ‘बाईपण भारी देवा’या चित्रपटाचे एकूण बजेट ५ कोटी होते, अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे. पण या चित्रपटाने बजेटच्या तुलनेत पाचपट कमाई केली आहे. सोबतच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ३० ते ३५ कोटींचा गल्ला सहज जमवेल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र १५ दिवसांच्या आतच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३४ कोटींच्या आसपास एकूण कमाई केली आहे.
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्या आठवड्यात १२.५० कोटींची कमाई केली असून रविवारी या चित्रपटाने ६.५० कोटींचा गल्ला जमावला आहे. मराठी चित्रपटसृष्टीत एकाच दिवसात सर्वाधिक कमाई करणारा ‘बाईपण भारी देवा’हा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडित काढले आहेत.
चित्रपटाविषयी बोलायचे तर, जिओ स्टुडिओ निर्मित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने प्रत्येक स्त्रीला जगायलं शिकवलं आहे. या चित्रपटात ६ गुणी अभिनेत्रींनी अभिनय केला आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या अभिनेत्री आहेत. माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.