मराठमोळा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave), मुक्ता बर्वे (Mukta Barve), उमेश कामत (Umesh Kamat) आणि श्रृती मराठे (Shruti Marathe) हे त्यांचा आगामी चित्रपट 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' मुळे चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांच्या मनामध्ये या चित्रपटामध्ये नेमकं असणार तरी काय हे जाणून घेण्यासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या पोस्टर, मोशन पोस्टरनंतर आता टीझर रिलीज झाला आहे. मजेशीर सहस्यांनी दडलेल्या 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर'च्या टीझरने प्रेक्षकांच्या मनातील उत्सुकता आणखी वाढवली आहे.
'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' या नावातच आपल्याला कळतेय की हा चित्रपट 'चाळीशी'भोवती फिरणारा आहे. मात्र यात काही रम्य रहस्ये दडलेली आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये मध्यभागी लिपस्टिकचे चिन्ह असलेले एक निशाण दिसत होते. या निशाणाबाबत तर्कवितर्क काढत असतानाच आता या चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये चाळिशीतील मित्रमैत्रिणी पार्टी एन्जॉय करताना दिसत असून अचानक लाईट जातेय आणि अचानक कसलातरी आवाज ऐकू येतोय. लिपस्टिकचे निशाण, संशयास्पद आवाज, त्यात या वयाबाबत असलेला प्रत्येकाचा दृष्टिकोन पाहाता हे काहीतरी धमाल मनोरंजन असणार असे दिसून येत आहे.
सध्यातरी चाळीशीतील या चोरांबद्दलचे हे गूढ अधिकच वाढत आहे. ते जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २९ मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृद् गंध फिल्म्स एल. एल. पी निर्मित या चित्रपटाचे आदित्य इंगळे हे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, श्रुती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर आणि अतुल परचुरे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. विवेक बेळे लिखित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे निर्माते आहेत.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी सांगितले की, 'हल्ली चाळीस हा वयाचा फक्त आकडा आहे. परंतु चाळीशीनंतरच जगण्याची खरी मजा सुरु होते. हे असे वय आहे जिथे आपण तरुणही नसतो आणि वयस्करही. त्यामुळे या वयात एक वेगळीच भावना असते. चाळीशीतील हीच भावना या चित्रपटात मजेशीररित्या दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल. विशेषतः चाळीशीतील प्रेक्षकांना हा चित्रपट जास्त जवळचा वाटेल.' हा चित्रपट येत्या २९ मार्चला प्रदर्शित होणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.