Guru Thakur Won Best Lyricist Award: 'मालिका नाटक चित्रपट' लेखक संघटनेचा ८ वा वर्धापनदिन सोहळा संपन्न: गंगाराम गवाणकर यांना ‘लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार’ प्रदान

MaNAChi Writer Awards: गंगाराम गवाणकर यांना 'लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.
MaNAChi Writer Awards
MaNAChi Writer AwardsSaam TV

Writers Award Function: मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये लेखन करणाऱ्या लेखकांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या 'मालिका नाटक चित्रपट' संघटना अर्थात मानाचि लेखक संघटनेचा आठवा वर्धापन दिन नुकताच रवींद्र नाट्य मंदिरमध्ये संपन्न झाला. या सोहळ्याला मालिका, नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील नामवंत लेखक मंडळी उपस्थित होती. या सोहळ्यात ज्येष्ठ नाटककार व पटकथाकार गंगाराम गवाणकर यांना 'लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.

जाहिरात क्षेत्रात कार्यरत असलेले भरत दाभोळकर या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गतवर्षीचे 'मानाचि'चे लेखन कारकीर्द सन्मान पुरस्कार विजेते ज्येष्ठ लेखक-दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी गंगाराम गवाणकर यांना सन्मानपूर्वक रंगमंचावर आणले. 'मानाचि'चे अध्यक्ष विवेक आपटे यांच्या उपस्थितीत दाभोळकरांच्या हस्ते गवाणकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार वितरणानंतर विवेक आपटे यांनी मुलाखत घेताना गवाणकरांना बोलतं केलं. गवाणकरांनी आपला बालपणापासूनचा संपूर्ण प्रवास गंमतीशीर पद्धतीने सांगितला. गवाणकरांच्या मिश्किल शैलीत तो ऐकताना उपस्थितांच्या हसून-हसून पोटात अक्षरश: गोळा आला. (Latest Entertainment News)

यात गावापासून मुंबईपर्यंतच्या प्रवासात विमानतळावरील बिगारी काम, जेजे स्कूल आॅफ आर्टसमधल शिक्षण, नाईट हायस्कूलमधील शालेय शिक्षण, फुटपाथवरील जगणं, जीपीओमध्ये नोकरी, साईन बोर्ड रंगवणं, 'वस्त्रहरण' नाटकाचे सुरुवातीचे फसलेले प्रयोग, पु. ल. देशपांडेंनी दाद दिल्यानंतर नाटकाने घेतलेली गरुडझेप सर्व काही सांगितलं.

'मानाचि'ने केलेला गौरव म्हणजे लेखकांनी लेखकाचा केलेला सन्मान असल्याची भावना व्यक्त करताना ही खूप मोठी दाद असल्याचेही गवाणकर म्हणाले. गवाणकरांवर पहिलं प्रेम करणाऱ्या मैसम्मावर रचलेल्या कवितेने त्यांनी आपल्या मुलाखतीची सांगता केली.

याखेरीज 'प्रस्थान' या प्रायोगिक नाटकासाठी मकरंद साठे, '३८ कृष्ण व्हिला' या व्यावसायिक नाटकासाठी श्वेता पेंडसे, 'कुर्रर्र...' या नाटकातील गीतासाठी तेजस रानडे, 'फनरल' चित्रपटाच्या कथेसाठी रमेश दिघे, 'वाय' चित्रपटाच्या पटकथेसाठी अजित वाडीकर व स्वप्नील सोज्वळ, 'मीडियम स्पायसी' चित्रपटातील संवादांसाठी इरावती कर्णिक, 'चंद्रमुखी' चित्रपटातील गीतांसाठी गुरू ठाकूर यांना पुरस्कार देण्यात आला.

'जीवाची होतीया काहिली' मालिकेच्या कथेसाठी सुबोध खानोलकर, 'भाग्य दिले तू मला' मालिकेच्या पटकथेसाठी अमोल पाटील, 'तुमची मुलगी काय करते' व 'आई कुठे काय करते' या मालिकांच्या संवादलेखनासाठी मुग्धा गोडबोले, 'तू तेव्हा तशी' मालिकेच्या गीतासाठी अभिषेक खणकर, लोकसत्तातील 'कस्तुरीगंध' या स्तंभलेखनासाठी प्रा.विजय तापस यांना मानाचि पुरस्कार प्रदान करण्यात आले. खालिदा शेख, अभिराम रामदासी, रूपाली चेऊलकर, संदीप गचांडे व ईश्वरी अतुल यांना लक्षवेधी लेखनासाठी सन्मानित करण्यात आले.

नेहमीच आपल्या अनोख्या शैलीत विनोदाचे चौकार-षटकार मारणाऱ्या भरत दाभोळकरांनी 'वस्त्रहरण'बाबत आपला अनुभव सांगितला. ते म्हणाले की, मी आजवर इंग्रजीमध्ये ३२ नाटकं लिहिली आहेत. यात इंग्रजीमध्ये तमाशा, लावणी, पोवाडा, कव्वाली केली. त्याचा मला खूप अभिमान होता. पॅरडीच्या या अभिमानात मी खूप वर्षे जगलो. कोणीतरी कारण नसताना मला 'वस्त्रहरण' बघायला घेऊन गेलं आणि त्या दिवशी मला पॅरडीची लेव्हल काय असते हे समजलं.

त्यानंतर गवाणकरांचं कोणतंही नाटक बघितलं नाही. कारण मला आणखी इन्फेरीआॅरीटी कॅाम्प्लेक्स (न्यूनगंड) वाढवायचा नव्हता. गवाणकरांची एक मुलाखत बघितली होती. ज्यात ते म्हणाले होते की, त्यांच्या नाटकाला पु.ल.देशपांडे आले होते. पुलं म्हणाले होते की 'वस्त्रहरण' नाटक बघण्यापेक्षा काम करायला मला जास्त आवडेल. तो अनुभव मलाही आला. एका प्रयोगात मी, विजू खोटे, विहंग नायक या सर्वांनी गेस्ट अपिरीयन्स केला होता. गवाणकरांनी यापुढेही खूप वर्षे लिहित राहावं असंही दाभोळकर म्हणाले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर गुरू ठाकूर म्हणाले की, इथे बसल्या-बसल्या दोन ओळी डोक्यांत आल्या. एखाद्या अस्सल गवयाने दुसऱ्याच्या गाण्याला दाद देणं हे जितकं दुर्मिळ आहे तितकंच लेखकानेही लेखकाचं कौतुक करणं आहे. मला काही लेखकांचे कॅाल्स येतात. मला एखादी हुकलाईन आवडली तर सांगतो की हे हिट आहे गाणं...

यातून मला सुचलं की, आपण सर्व लेखणीची लेकरं असल्यानं बहिणाबाई म्हणाल्या की, माझी माय सरस्वती... त्यामुळे आपली माय एकच असल्याने सहोदर भेटल्याची भावना आता या क्षणी माझ्या मनात आहे. 'भेटी लागी आले शब्दांचे सोयरे, कौतुकाची दारे उघडली... गुरू म्हणे मानू कुणाचे आभार, सारे सहोदर भोवताली...' अशा शब्दांतून आपल्या भावना व्यक्त केल्या.

'कस्तुरीगंध' या स्तंभलेखकाचे लेखक प्रा.विजय तापस आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की, 'कस्तुरीगंध' या सदरामुळे पुन्हा वृत्तपत्राच्या ताकदीचं कन्फर्मेशन मिळालं. जुन्या नाटकांवरचं हे सदर होतं. दर रविवारी सकाळी साडे दहा-अकरा वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या अत्यंत ग्रामीण भागातूनही प्रचंड प्रमाणात ईमेल्स यायचे. इतकं लोकं वाचतात याचं आश्चर्य वाटतं. वृत्तपत्राची ताकद पुन्हा एकदा कळली.

शाहिर अमर शेख यांच्या पहिला बळी या नाटकावर लिहिल्यावर गडचिरोलीतून एका नाटक मंडळाच्या सेक्रेटरीचा कॅाल आला. त्याने मला या नाटकाचं पुस्तक कुठे मिळेल असं विचारलं. तुम्ही लिहिलेलं वाचल्यावर आम्हाला हे नाटक ६५ वर्षांनी राज्य नाट्य स्पर्धेसाठी करायचं ठरवलं आहे. याद्वारे आम्हाला शाहीर अमर शेख यांना नाट्यकृतीद्वारे श्रद्धांजली वहायची असल्याचं ते म्हणाले ते आपल्याला अतिशय विलक्षण वाटल्याचंही ते म्हणाले.

गतवर्षीचे पुरस्कार विजेते पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले की, गवाणकरांना पुरस्कार देण्यासाठी रंगमंचावर आणताना मला खूप आनंद झाला. ते जिथून आले तिथूनच मी देखील आलो आहे. ते म्हणजे जेजे इन्स्टिट्यूट आॅफ आर्टस... गवाणकर आम्हाला खूप खूप सिनीयर आहेत. त्या काळात जेजेमध्ये नोकरी करून चित्रकला शिकता यावी असा कोर्स होता. अशाप्रकारे जी मंडळी शिकली त्यातील आदर्श गवाणकर आहेत. ते जीपीओमध्ये कामाला होते आणि जवळच असलेल्या जेजेमध्ये शिकले.

१९६२ मध्ये त्यांनी डिप्लोमा घेतला आणि माझा १९७५ मधला म्हणजे मला किती सिनीयर होते ते समजेल. माझे गुरू दामू केंकरे हे त्यांचेही गुरू होते. त्यानंतर त्यांनी एकांकीका आणि नाटकांकडे झेप घेतली आणि 'वस्त्रहरण' हे माईलस्टोन नाटक मराठी रंगभूमीला दिल्याची भावना बेर्डे यांनी व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com