कोल्हापूरचे ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरूवारी रात्री भीषण आग लागली. या आगीमध्ये हे नाट्यगृह जळून खाक झाले. १०० वर्षांची परंपरा असलेले आणि अजरामर नाटके झालेले हे नाट्यगृह जळून खाक झाल्यामुळे नाट्यसृष्टी आणि सिनेसृष्टीतील कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. हे नाट्यगृह जळताना पाहून मराठी सेलिब्रिटींच्याही आपसूकच डोळ्यात पाणी आले आहे. काही मराठी सेलिब्रिटींनी माध्यमांसोबत बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नाट्यगृहाला आगीच्या भक्ष्यस्थानी पाहून अनेक मराठी सेलिब्रिटींना अश्रू अनावर झाले. अभिनेता भरत जाधवनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे, तो म्हणाला की, "अतिशय दुःखद घटना... संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे माझ्या सर्वात आवडत्या नाट्यगृहांपैकी एक. नुकत्याच माझ्या "अस्तित्व" नाटकाला "महाराष्ट्र राज्य मराठी व्यवसायिक नाट्य स्पर्धेची" भरपूर बक्षिसे मिळाली. या नाटकाची रंगीत तालीम मी याच नाट्यगृहांमध्ये काही महिन्यांपूर्वी केली होती. नाट्यगृह जळणे ही घटना अत्यंत क्लेशदायक आणि मनाला चटका लावून जाणारी घटना आहे. आजपर्यंतच्या या नाट्यगृहाच्या आठवणी हृदयाच्या कोपऱ्यात चिरंतर राहतील."
यासोबतच अभिनेता जितेंद्र जोशीनेही प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला की, "आपल्या घरातला एखादा व्यक्ती गेल्यानंतर आपली काय भावना असते ? तशीच भावना सध्या माझी आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह जळालं याबद्दल मी आणखी काय बोलू... संगीत सूर्य केशव भोसले नाट्यगृह पुन्हा उभारणीत मी पण असेल..." घटनेबद्दल माहिती कळताच कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घटनास्थळाला भेट दिली. आगीच्या भक्ष्यस्थानी आलेल्या नाट्यगृहाची पाहणी केल्यानंतर तेथील दृश्य पाहून त्यांना प्रचंड दु:ख झाले.
घटनेबद्दल हसन मुश्रीफ म्हणाले की, "संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीत जळून भस्मसात होणे ही हृदयाला चटका लावणारी गोष्ट आहे. आगीचे दृश्य मनाला अस्वस्थ करणारी आणि वेदना देणारी होती. दोन दिवसांतच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. दुर्घटनेबद्दल त्यांच्याशी चर्चा करून नाट्यगृहाच्या नवीन उभारणीसाठी जास्तीत- जास्त निधीसाठी प्रयत्नशील राहू आणि हे वैभव पुन्हा मोठ्या ताकदीने उभारण्यासाठी प्रयत्न करू.', अशी ग्वाही त्यांनी मराठी कलाकारांना आणि नाट्य रसिकांना दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.