Kapil Sharma Cafe: कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर, भितीचे वातावरण आहेत. त्यानंतर कपिलने इन्स्टा स्टोरीवर पोस्ट केली आहे. यामध्ये, त्याने गोळीबाराच्या घटनेनंतर काळजी व्यक्त करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्याने कॅनेडियन पोलिसांचेही आभार मानले आहेत. या हल्ल्यामागे खलिस्तानी हात असल्याचे वृत्त आहे.
कॅफेकडून निवेदन
कपिल शर्मा आणि त्यांची पत्नी गिन्नी चतरथ यांच्या कॅप्स कॅफेचे काही दिवसांपूर्वी कॅनडातील सरे येथे उद्घाटन झाले होते. गुरुवारी, तेथे अचानक गोळीबाराची घटना घडली, ज्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. कॅफेच्या इन्स्टा स्टोरीवर या घटनेशी संबंधित एक संदेश आहे. त्यात लिहिले आहे की, 'आम्ही कॉफी आणि मैत्रीपूर्ण संभाषणांद्वारे आनंद वाढवू या आशेने कॅप्स कॅफे उघडले. हिंसाचाराने हे स्वप्न मोडण्याचा प्रयत्न केला. आम्ही हा धक्का सहन करण्याचा प्रयत्न करत आहोत.'
पोलिस आणि ग्राहकांचे आभार
यानंतर त्याने लिहिले आहे की, 'तुम्ही लोकांनी दाखवलेल्या विश्वासामुळेच हे कॅफे अस्तित्वात आहे. तुम्ही हिंसाचाराच्या विरोधात ठामपणे उभे राहिलात यासाठी कॅप्स कॅफेमधील आमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद, लवकरच भेटू.' दुसऱ्या पोस्टमध्ये, सरे पोलिसांचेही आभार मानले आहेत.
खिडक्यांवर १० गोळ्यांचे निशाण
गुरुवारी स्थानिक वेळेनुसार रात्री १.३० वाजता कॅप्स कॅफेबाहेर गोळीबार झाला. सरे पोलिसांचे म्हणणे आहे की त्यावेळी काही कर्मचारी कॅफेमध्ये होते. खिडक्यांवर किमान १० गोळ्यांचे निशाण आढळले आहेत. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, या घटनेशी खलिस्तानी फुटीरतावाद्यांचा संबंध आहे.