Khal Khal Goda Song: 'गोदावरी' चित्रपटातील 'खळ खळ गोदा' हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. नदी जशी सगळं काही पोटात सामावून वर्षानुवर्षे वाहतच राहते, तसेच काहीसं आपल्या आयुष्याचे होताना दिसत आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे परंपरागत चालत आलेला वारसा आणि त्यात गुंतणारे भावविश्व यांचे उत्तम वर्णन ह्या गाण्यातून होताना दिसते.
मन प्रसन्न करणारे 'खळ खळ गोदा' हे गाणे श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करून आयुष्याच्या नागमोडी प्रवाहात वाहताना दिसून येत आहे. गाण्याचे बोल नदीला संबोधून असले तरीही मनुष्याच्या व्यक्तिगत जीवनातील घडामोडीचा उत्तम आरसा आहे. ऐन दिवाळीत घरबसल्या रसिक प्रेक्षकांना गोदावरीचे दर्शन घडवून, मनात नवचैतन्य निर्माण करणारे हे गाणे उत्सवासाठी परिपूर्ण आहे.
जगभरातील नामांकित राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात खळखळून वाहणाऱ्या गोदावरी या चित्रपटातील "खळ खळ गोदा" या गाण्याचे बोल जितेंद्र जोशी यांचे असून, संगीत दिग्दर्शनाची धुरा एव्ही प्रफुल्लाचंद्रा यांनी सांभाळली आहे.
राहुल देशपांडे यांना या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक म्हणून पुरस्कारही मिळाला आहे. गाण्याबद्दल आपल्या भावना व्यक्त करत राहुल देशपांडे म्हणतात की, ''या गाण्याचे बोल खूप खोलवर विचार करायला लावणारे आहेत. नकळत हे गाणे आपल्या आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी, भावना सांगून जातात. मला आशा आहे, हे गाणे श्रोत्यांनाही नक्कीच भावेल.''
गीतकार जितेंद्र जोशी म्हणतात की '' हे गाणे खूप प्रेरणा देणारे आहे. बऱ्याच भावना या गाण्यातून व्यक्त होत आहेत. त्यात राहुल देशपांडे यांचा आवाज आणि एव्ही प्रफुल्लाचंद्रा यांचे संगीत लाभल्याने या गाण्याला चारचाँद लागले आहेत. दिवाळीही काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यानिमित्ताने हे खास स्फूर्तिदायी गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.''
जिओ स्टुडिओज प्रस्तुत, ज्योती देशपांडे, ब्लू ड्रॉप फिल्म्स आणि जितेंद्र जोशी पिक्चर्स निर्मित या चित्रपटात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नात्यांची मूल्य सांगणारा, रुढी, परंपरा आणि भावनांचे उत्तम मिश्रण असलेला, असा हा कौटुंबिक चित्रपट येत्या ११ नोव्हेंबरला रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.